- विजय चोरमारे
अभिनेता सुशांतसिंग राजपूतची मॅनेजर दिशा सालियन मृत्यूची चौकशी सीबीआयकडे सोपवल्यामुळे पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांच्या बदनामीच्या मोहिमेला गती मिळणार आहे. यासंदर्भात आदित्य ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट केली असली तरी या संपूर्ण तपास काळात त्यांना अग्निपरीक्षेला सामोर जावे लागणार आहे. सुरुवातीपासून या प्रकरणाला राजकीय रंग देताना त्यात आदित्य ठाकरे यांचे नाव गोवण्यात आले. अर्णब गोस्वामीसारख्या पत्रकाराच्या माध्यमातून सातत्याने ठाकरेंवर शिंतोडे उडवण्याचे प्रयत्न झाले. दिशा सालियनच्या पालकांची बदललेली भूमिकाही चर्चेचा विषय बनली.
आपल्या मुलीच्या मृत्यूबद्दल दिशा सालियनच्या पालकांना काही शंका असतील तर न्यायालयीन प्रक्रियेच्या माध्यमातून त्यांचे निरसन झाले पाहिजे. परंतु त्यांचा वापर करून राजकारण केले जात असल्याचे आरोप झाले. परंतु तसा आरोप करणा-या आदित्य ठाकरे आणि अनिल देशमुख यांना नोटिस बजावून दिशाच्या वडिलांनी आपल्यावर कुणी राजकारणाचा आरोप करू नये, याची तजवीज केली आहे.
घटनाक्रम काय सांगतो
या प्रकरणातील घटनाक्रम समजून घेतला तर अनेक गोष्टी स्पष्ट होऊ शकतील.
दिशा सालियनच्या मृत्यूची घटना ८ जून २०२० रोजी घडली होती. मुंबईतील मालाड येथील एक इमारतीवरून उडी मारून दिशाने आत्महत्या केल्याचे सांगितले जात होते. दिशा ही पूर्वाश्रमीची अभिनेता सुशांत सिंगची मॅनेजर होती.
हेही वाचाः Disha Salian Case: दिशाच्या वडिलांबाबत क्लोजर रिपोर्टमध्ये काय?
दिशाच्या मृत्यूनंतर सहा दिवसांनी सुशांतसिंग राजपूतनेही आत्महत्या केली होती. आणि सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर दिशा सालियनची आत्महत्या अधिक चर्चेत आली. या दोन्ही आत्महत्यांचा संबंध जोडण्याचेही प्रयत्न झाले. त्या काळात महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत होते. त्यावेळी मुंबईपासून बिहारपर्यंत अत्यंत घाणेरडे राजकारण झाल्याचे संपूर्ण देशाने पाहिले होते.
हेही वाचाः Disha salian death: दिशा सालियन मृत्यूची निष्पक्ष चौकशी करा
आत्महत्येच्या या दोन्ही घटनांच्या निमित्ताने भारतीय प्रसारमाध्यमांचा विद्रूप आणि विकृत चेहरा समोर आला होता. अर्णब गोस्वामी आणि कंपूने सुपारी घेतल्याप्रमाणे आदित्य ठाकरेंविरोधात मोहीम चालवली होती. भारतीय जनता पक्षाचे अमित साटम आणि अतुल भातखळकर यांनीही या बदनामीच्या मोहिमेत पुढाकार घेतला होता. आता नव्याने प्रकरण सुरू होताना भाजपने राम कदम यांना मैदानात उतरवलेले दिसते.
दिशाच्या पालकांची पहिली तक्रार
दिशाच्या मृत्यूनंतर १८ महिन्यांनी म्हणजे २३ फेब्रुवारी २०२२ रोजी दिशाच्या आई आणि वडिलांनी राज्य महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची भेट घेवून एक निवेदन दिले होते. त्याद्वारे त्यांनी नारायण राणे, नितेश राणे यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. ही मंडळी आपल्या मुलीची मरणोत्तर बदनामी करीत आहेत. या बदनामीमुळे आमचे जगणे अवघड झाले असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी दिशाच्या पालकांनी केली होती. आमच्या मुलीच्या मृत्यूचे राजकारण करू नका, असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले होते. यावेळी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर होते. त्यानंतर चार महिन्यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले होते. महिला आयोगाकडे केलेल्या तक्रारीचे पुढे काय झाले, हे स्पष्ट होऊ शकले नाही.
पालकांची भूमिका बदलली
त्यानंतर तीन वर्षानंतर म्हणजे २० मार्च २०२५ रोजी दिशाच्या पालकांनी आपली भूमिका बदलली. ज्या राणे पितापुत्रामुळे बदनामी होते, असे त्यांना वाटत होते. त्यांनी केलेल्या आरोपांच्या आधारेच दिशाच्या वडिलांनी न्यायालयात याचिका दाखल केली. दिशा सालियनच्या वडिलांची भूमिका संशयास्पद असल्याचे त्यामुळे स्पष्ट झाले आणि तसा आरोपही झाला. मुलगी गेली हा त्यांच्यासाठी मोठा धक्का होता. परंतु मुलीच्या मृत्यूचे राजकारण करू नका, असे म्हणणारे गृहस्थ त्याच राजकारणाचा भाग नंतरच्या काळात कसा काय बनले, याचे उत्तर मिळालेले नाही.
सहा वर्षांनी प्रकरण सीबीआयकडे
दिशाच्या वडिलांनी केलेल्या याचिकेच्या आधारे या संपूर्ण प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला. तब्बल सहा वर्षांनंतर केस सीबीआयकडे सोपवण्यात आली. त्यामुळे पुन्हा एकदा आदित्य ठाकरे आणि ठाकरे कुटुंबाची बदनामी करण्याची संधी त्यांच्या विरोधकांना आणि गोदी मीडियालाही मिळाली आहे. सुशांत सिंग प्रकरणावेळी अर्णब गोस्वामी आणि गोदी मीडियातील काही पत्रकारांनी तशी बदनामीची मोहीम चालवली होती, तशी ती पुन्हा नव्याने चालवली जाईल. सीबीआयच्या सूत्रांच्या हवाल्याने खोट्या नाट्या बातम्या पेरून बदनामी केली जाईल. जशी ती रिया चक्रवर्ती प्रकरणातही केली गेली होती.
आदित्य ठाकरे यांची भूमिका
या सगळ्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदाच स्पष्टपणे भूमिका मांडली आहे.
आदित्य ठाकरे यांनी समाजमाध्यमांवर केलेल्या स्पष्टीकरणामध्ये म्हटलं आहे की,
अफवांचा धुरळा उडवणं बंद करण्यासाठी पुन्हा एकदा फक्त आणि फक्त तथ्य सांगतो!
मी दिशा सालियन ह्यांना कधीही भेटलेलो नाही किंवा त्यांच्याशी माझी ओळखही नव्हती.
राजकीय हेतूने, वैयक्तिक द्वेषापायी, चारित्र्यहनन करण्याच्या हेतूने काही लोकांकडून गेल्या ६ वर्षांपासून वारंवार ह्या दुर्दैवी घटनेशी कुठलाही पुरावा वा संबंध नसतानाही माझं नाव जोडण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न सुरु आहे.
कुठलंही तथ्य आणि सत्य नसलेलं हे सततचं खोटं कॅंपेन दुर्दैवी आहे. बोंबाबोंब करुन केल्या जाणाऱ्या टिव्ही चॅनल्सवरच्या खोट्या चर्चा आणि मिडिया ट्रायल्स सत्य बदलू शकत नाहीत.
अधिकृत यंत्रणांना कुठल्याही व्यत्ययाशिवाय, राजकीय हस्तक्षेपाशिवाय, चारित्र्यहननाशिवाय आणि निःपक्षपातीपणे पुन्हा एकदा नव्याने ही चौकशी करु द्या.
परत एकदा सांगतो, ज्यांना वाटत असेल की अश्या चारित्र्यहननाच्या आणि खोट्या प्रचाराच्या मार्गाने तुम्ही आम्हाला शांत बसवू शकाल तर तो तुमचा भ्रम आहे.
सत्यासाठी, अन्यायाविरुद्ध, देशवासीयांना सोबत घेऊन आमचा लढा सुरुच राहील!
राणे पिता-पुत्रांची आघाडी
खरंतर आदित्य ठाकरे यांनी यापलीकडं या प्रकरणी अधिक बोलण्याची आवश्यकता नाही. कारण राणे पिता-पुत्रांच्या षड्.यंत्रातून दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव आले आहे, हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. आपल्याकडे यासंदर्भातील अनेक पुरावे असल्याचे दावे राणे पितापुत्रांनी वेळोवेळी केले होते. मधल्या काळात सगळ्या तपास यंत्रणा त्यांच्या पक्षाच्या ताब्यात होत्या. तरीसुद्धा त्यांच्याकडच्या पुराव्यांचा आधार घेऊन कुणी ठाकरेंवर कारवाई केलेली नाही. सहा वर्षे काही कारवाई झालेली नाही. काहीच निघत नाही म्हटल्यावर दिशा सालियनच्या वडिलांना हाताशी धरलेले दिसते. त्यांचा तो डाव पुढे सरकला आणि न्यायालयाच्या माध्यमातून प्रकरण सीबीआय तपासापर्यंत गेले.
म्हणजे आता मागील पानावरून पुढे संशयाचा धुरळा उडवत ठेवला जाईल. अर्णब गोस्वामी आणि कंपूने त्यासंदर्भातील विशेष वार्तापत्रे आणि चर्चेचे कार्यक्रम सुरू केले आहेत. आदित्य ठाकरे यांची मीडिया ट्रायल सुरू झाली आहे.
आणखी एक नाट्यमय घटना
दिशाचे वडील सतीश सालियन यांनी आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांना ५०० कोटींच्या नुकसान भरपाईची नोटिस बजावली आहे. दोन्ही नेत्यांनी सतीश सालियन यांचा न्यायासाठीचा लढा हा राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप करून बदनामी केल्याचे नोटिसीत म्हटले आहे.
हेही वाचाः Nitesh Rane’s jibe : ‘आदित्य ठाकरे बुरखा घालतील…’ : नितेश राणेंची टीका
सतीश सालियन आणि त्यांचे वकील देवकृष्ण एस. भांब्री १९ सप्टेंबरला सायंकाळी ४ वाजता वांद्रे येथील मातोश्री निवासस्थानी यासंदर्भातील नोटिस आदित्य ठाकरे यांना सुपूर्द करण्यासाठी जाणार आहेत. त्यावेळी पोलीस संरक्षण मिळावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
वेगवेगळ्या प्रकारे प्रकरण सतत धुमसत ठेवायचे. माध्यमांमध्ये चर्चा घडवून आणायची. ही रणनीती यामागे दिसते आहे. ठाकरे यांच्याविरोधात पूर्वी फक्त राणे कंपनी होती. आता त्यांना एकनाथ शिंदे यांची साथ मिळणार आहे. त्यामुळे वकिलांपासून प्रसारमाध्यमांपर्यंत सगळ्या यंत्रणा नीट मॅनेज करणे जमणार आहे.
म्हणजे एकीकडे ठाकरे कंपनीचे माध्यमांशी फटकून वागणे आणि दुसरीकडे त्यांच्या विरोधकांचे अनेक मार्गांनी माध्यमांशी जुळवून घेणे असाही फरक आहे. ठाकरे स्वतःच्या कोषात राहिल्याने शिवसेना फुटली. आता ठाकरेंच्या त्याच वृत्तीचा फायदा त्यांचे विरोधक आदित्य ठाकरे यांची बदनामी करण्यासाठी घेताना दिसतील.
ठाकरेंना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न
प्रकरणाताच तपास कुठल्याही यंत्रणेने केले तरी ज्यात मुळातच काही नाही, तिथे कितीही कसेही कुठूनही धागे जुळवून आणले तरी काही हाती लागण्याची शक्यता कमीच आहे. ठाकरे यांना ब्लॅकमेल करण्यासाठीच या प्रकरणाचा वापर होत आहे. ठाकरे यांना सतत दबावाखाली ठेवणे, त्यांच्याभोवती अत्यंत घाणेरड्या आरोपाच्या संशयाचे धुके टिकवून ठेवणे आणि त्याद्वारे चारित्र्यहनन करणे एवढाच विरोधकांचा उद्देश आहे. आणि तो सफल होताना दिसतो आहे.
आदित्य ठाकरे यांच्या राजकारणाचा हा उमेदीचा काळ आहे. या प्रकरणातून तावून सुलाखून निघताना ते कणखर बनतील, बनायला हवेत. तेवढाच काय तो ठाकरेंसाठी फायदा राहील. राजकारणातल्या दीर्घ खेळीसाठी कठीण परीक्षा म्हणून या प्रकरणाकडे बघितले तर आदित्य ठाकरे यांच्या राजकीय कारकीर्दीसाठी ते निश्चित फायद्याचे ठरणार आहे.