कितीतरी अपंग माणसांनी आपली व्यस्तता नि जगणं सातत्यानं समोर ठेवून, बोलून समाजमनाचे साचे मोडायचा प्रयत्न केला आहे, करत आहेत. तिकडं बघून बदलायचं ठरवणार की नाही? (Sonali Navangul)
- सोनाली नवांगुळ
काही कामांसाठी घरातच राहाणं व उपलब्ध असणं भाग होतं. त्यामुळं बाहेर जायची संधी नव्हती. शिवाय राहात्या सोसायटीतलं वातावरणही गढूळ झाल्यामुळं कोणाशी बोलायची, कोणात मिसळायची इच्छा नव्हती. मग ऋतूबदलाची किरकोळ कुरबूर, मग कंटाळा, त्यानंतर वळीव, मग थेट पावसाळ्याची सुरुवात असं करता करता पॉवरचेअर घेऊन अजिबातच बाहेर पडले नाही. पडावं लागलं तेव्हा मित्रमैत्रिणींच्या कारमधून गेले नि आले. कारणं खूप होती. तशी सगळ्यांच्याच आयुष्यात असतात. – पण मी (सोनाली नव्हे, अपंगत्व असणारी व व्हीलचेअर वापरणारी व्यक्ती) बराच काळ दिसले नाही की लोकांना सहजच वाटतं, आजारीच असेन. त्यामुळं खूप दिवसांनी भेटलं की एखाददोन अपवाद वगळता सगळे माझ्याकडे किंवा माझ्याशी संबंधितांकडे, “तब्येत बरीय का?” इतकंच विचारतात. (Sonali Navangul)
सर्वसाधारण स्त्रिया किंवा पुरुषांबाबतीत, ते दिसेनासे होतात तेव्हा “कामात होतात वाटतं?”, “बिझी झालाय बरंच.”, “टूरवर होतात काय?”, “पाहुणे बरेच येताहेत आजकाल? दिसत नाही तुम्ही!” यापासून काहीही संवाद होतात. मी किंवा माझ्यासारख्या व्यक्तींची दखल मात्र कायम एकाच प्रश्नानं किंवा उद्गारानं… तब्येत बरीय ना?! – आम्ही कामात किंवा जबाबदाऱ्यांमध्ये किंवा मनोरंजनात किंवा एखाद्या घटनेवरची प्रतिक्रिया/प्रतिसाद म्हणून ‘गायब’ होऊ शकत नाही का?
– कुठलीही अपंग किंवा वेगळ्या शारीर/मानसिक अवस्थेतली व्यक्ती कायम आजारी, मरणासन्न अवस्थेत तळमळत असते असं का वाटतं? बरं ‘का?’चं जाऊ दे. कितीतरी अपंग माणसांनी आपली व्यस्तता नि जगणं सातत्यानं समोर ठेवून, बोलून समाजमनाचे साचे मोडायचा प्रयत्न केला आहे, करत आहेत. तिकडं बघून बदलायचं ठरवणार की नाही? (Sonali Navangul)
पुष्कळदा अपंग व्यक्तींचे पालक/मित्र/हितचिंतकही अशा साचेबद्ध सामाजिक मानसिकतेत आपापली निर्बुद्ध भर टाकतात ती माघारी कायम तब्येतीचीच चर्चा करून. अशा तब्येतीच्या चर्चेनं दोन गोष्टी होतात… चर्चा करणारी व्यक्ती किती काळजीत असते बिचाऱ्या अपंग व्यक्तीच्या हे समाजमनावर बिंबायला मदत होते व त्या माघारी बोलणाऱ्या व्यक्तीला मोठेपणा/दयाळूपणा न कष्टता बहाल होतो. दुसरी गोष्ट होते की अपंग माणसं कष्टाने, बुद्धीने आपलं व भवतालचं जगणं सुंदर करायचा जो प्रयत्न करत असतात तो हुरूप शंभर योजनं मागे जातो. कंटाळा येतो सगळ्यांना तोंड द्यायचा. सतत स्टिरिओटाईप व्हायचा.
खूप दिवसांनी दिसल्यावर तब्येतीची विचारणा झाल्यावर पुढचं वाक्य असतंच, काय गं हे वजन? कमी खात जा. इतकं बोलल्यावरही कमी पडल्यासारखं सोबत असणाऱ्यांना ही ‘काळजी करणारी’ माणसं, “अगं ‘अमुक’, अरे ‘तमुक’ तिला सारखं खायला घालू नका बरं का!” हेही म्हणतात. दहादहा-वीस-तीस वर्षे एकाच जागी बसून असण्याची स्थिती असलेल्या, कमीअधिक प्रमाणात नियमित औषधे-प्रतिजैविके घ्याव्या लागणाऱ्या वेगळ्या अवस्थेतल्या माणसांचा विचार वेगळ्या प्रकारे करायला नको? कधीकधी अपंगत्वाची स्थिती बदलून बॉडी स्ट्रक्चर बदलतं हेही खाजगीत बोलता येऊ शकतंच की! हक्क दाखवायचाच असेल तर उडतं बोलण्यापेक्षा परवानगी घेऊन चौकशी करावी, थेट अपंग व्यक्तीकडे करावी. ती गैरसमजांची जाळीजळमटं काढायला मदत करेल, नक्की! (Sonali Navangul)
असं स्पष्ट करूनही न-अपंग माणसं आपल्या बालवाडीतून बाहेर यायचं बघत नाहीत. त्यांना कुठलीही भाषा सक्तीची करा, संवेदनांचीच कमतरता असेल तर भाषा काय करणार? मी व माझ्यासारखी असंख्य माणसं विवेक नावाची गोष्ट टिकवून धरायचा प्रयत्न करतो व अशांच्या अंगावर वस्कन जावं, चांगला शिगोशीग अपमान करावा असं वाटत असूनही समजून घेतो व समजावत राहातो. एकदा, दोनदा, तीनदा, दहादा! त्यानंतर मात्र समोरच्याच्या राईराईएवढ्या चिंधढ्या कराव्यात ही एकच इच्छा सरसरून वर येते…
अशा सगळ्यांना पुढच्या इयत्तेत जाण्यासाठी शुभेच्छा…. कारण सहनशक्तीची सुद्धा expiry date असते.
हेही वाचा :
गायपट्ट्याच्या राजकारणाला मराठी झटका