मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) २०२४-२५ या वर्षासाठी केंद्रीय करार करण्यात येणाऱ्या खेळाडूंची सोमवारी जाहीर केली. मागील वर्षी या यादीतून वगळण्यात आलेल्या श्रेयस अय्यर व ईशान किशन यांना पुन्हा स्थान देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, यष्टिरक्षक रिषभ पंतला ए श्रेणीमध्ये बढती मिळाली आहे. (BCCI Contracts)
ए प्लस, ए, बी आणि सी अशा चार श्रेणींमध्ये करारबद्ध खेळाडूंचे वर्गीकरण करण्यात आले आहे. ए प्लस श्रेणीमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा हे चारच खेळाडू आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला वगळल्याचा अपवाद सोडल्यास या श्रेणीमध्ये कोणताही बदल नाही. रोहित, विराट व जडेजा यांनी आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती पत्करल्यानंतरही त्यांना या श्रेणीत कायम ठेवण्यात आले आहे. ए श्रेणीमध्ये महंमद सिराज, लोकेश राहुल, हार्दिक पंड्या, शुभमन गिल, महंमद शमी आणि रिषभ पंत हे खेळाडू आहेत. या श्रेणीमध्ये पंत हा नवा खेळाडू असून त्याला बी श्रेणीमधून ए श्रेणीमध्ये बढती मिळाली आहे. बी श्रेणीमध्ये कुलदीप यादव, अक्षर पटेल, यशस्वी पटेल, सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर यांचा समावेश आहे. (BCCI Contracts)
मागील वर्षीच्या करारामधून श्रेयसला वगळण्यात आले होते. त्यानंतर, त्याच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाइट रायडर्सने मागील वर्षी आयपीएलचे विजेतेपद पटकावले. आंतरराष्ट्रीय वन-डेमध्येही त्याने चमकदार कामगिरी केली. भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकण्यात श्रेयसचा महत्त्वाचा सहभाग होता. या स्पर्धेत त्याने भारतातर्फे सर्वाधिक २४३ धावा फटकावल्या होत्या. त्याची पोचपावती म्हणून त्याला या वर्षीच्या करारयादीत समाविष्ट करण्यात आले. ईशानला सी श्रेणीमध्ये स्थान मिळाले आहे. या श्रेणीत एकूण १९ खेळाडू असून त्यामध्ये प्रामुख्याने भारताच्या टी-२० संघातील खेळाडूंचा समावेश आहे. मागील वर्षी या यादीत असणाऱ्या शार्दुल ठाकूर, जितेश शर्मा, श्रीकर भारत आणि आवेश खान यांना मात्र यादीतून वगळण्यात आले आहे. (BCCI Contracts)
बीसीसीआयकडून ए प्लस श्रेणीतील खेळाडूंसोबत सात कोटी रुपयांचा वार्षिक करार करण्यात येतो. ए श्रेणीसाठी ही रक्कम पाच कोटी इतकी असून बी श्रेणीसाठी ३ कोटी, तर सी श्रेणीसाठी एक कोटी आहे. आतापर्यंत बीसीसीआयच्या करारयादीत नसणाऱ्या आठ खेळाडूंशी नव्याने करार करण्यात येणार आहे.
ए प्लस श्रेणी – रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा
ए श्रेणी – महंमद सिराज, लोकेश राहुल, शुभमन गिल, हार्दिक पंड्या, महंमद शमी, रिषभ पंत.
बी श्रेणी – सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, अक्षर पटेल, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर.
सी श्रेणी – रिंकू सिंह, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, रजत पाटिदार, ध्रुव जुरेल, सर्फराझ खान, नितीशकुमार रेड्डी, ईशान किशन, अभिषेक शर्मा, आकाश दीप, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा.
हेही वाचा :
अभिषेक नायर पुन्हा ‘केकेआर’मध्ये दाखल
‘उसका जाने का समय आ गया’