बिद्री : धनाजी पाटील
काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या राधानगरी विधानसभा मतदार संघातील तिरंगी लढतीत आमदार प्रकाश आबिटकरांनी तिसऱ्यांदा विजय मिळवत मोठ्या दिमाखात विजयाची हॅट्ट्रिक साधली. या विजयाने मतदारसंघात नवा अध्याय नोंदला गेला. इतिहास घडविणारे आबिटकर एकमेव तरुण आमदार ठरले. महाआघाडीचे के. पी. पाटील यांना तिसऱ्यांदा पराभवाला सामोरे जावे लागले. ते पराभवाची हॅट्ट्रिक रोखू शकले नाहीत. अपक्ष ए. वाय. पाटील यांची उमेदवारी ‘केपीं’च्या पराभवास अंशतः कारणीभूत ठरली.
मतदारसंघातील ऐंशी हजार लाडक्या बहिणींनी आमदार आबिटकरांचा विजय सुकर केला. आजपर्यंत कुणीही विजयाची हॅट्ट्रिक केली नव्हती. साहजिकच आता संभाव्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत याचे पडसाद उमटतील.
सुरवातीला दोन्ही गटाला विजयाची खात्री होती. टपाली मतमोजणीत आमदार आबिटकरांना १२५० ची आघाडी मिळाली. पहिल्या फेरीत श्री.आबिटकर यांना ३९२५ के. पी. पाटील यांना २२४९ तर ए. वाय. पाटलांना १३२५ मते मिळाली.
पहिल्या फेरीतच आबिटकरांना १६७६ मतांची आघाडी मिळाली. त्यानंतर फेरीगणिक आबिटकरांची आघाडी कायम राहीली. ‘केपीं’चे लीड कमी होत गेले. ‘एवाय’ तिसऱ्यास्थानी राहिले. प्रत्येक फेरीत ‘एवाय’ यांची मते ‘केपीं’ना आघाडी मिळविण्यात अडसर ठरल्याचे निकालावरून दिसते.
आमदार प्रकाश आबिटकर यांची निर्णायक आघाडी कायम राखली. विसाव्या फेरीअखेर आबिटकरांनी निर्णायक २६,०७४ मतांनी आघाडी घेत विजयाकडे आगेकूच केली.एकतिसाव्या शेवटच्या फेरीत आबिटकर (१,४४,३५९), के. पी. पाटील(१,०६,१००) आणि ए. वाय. पाटील (१९११७) मते मिळाली. आमदार प्रकाश आबिटकरांना ३८, २५९ आघाडी मिळाली व त्यांनी आपला विजय नोंदवला.
तसे पाहिले तर राधानगरी मतदारसंघ काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. पण येथे शिवसेना सलग तीन वेळा विजयी झाली. यावेळची लढत अटीतटीची झाली. मतदार संघातून ठाकरे गटाचे माजी आमदार के. पी. पाटील यांनी प्रारंभी आबिटकरांपुढे तगडे आव्हान निर्माण केले. राधानगरी भुदरगड व आजरा तालुक्यातील काँग्रेस के. पी. पाटील यांच्या मागे भक्कमपणे उभी राहिली. उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत आमदार सतेज पाटील यांच्यावर केपींच्या विजयाची धुरा दिली. आदमापूरच्या मेळाव्यात केपींनी मोठी वातावरण निर्मिती केली. भव्य मेळावा पहाता ते एकतर्फी मैदान मारतील, असे चित्र होते. परंतु कोल्हापूर उतरमधील उमेदवारीच्या घोळात त्यांना सतेज पाटील यांची रसद वेळेवर मिळाली नाही. येथेच पारडे फिरले.
संपर्क आणि विकासकामांचे बळ
मतदारसंघातील झाडून सर्व नेते केपींच्या मागे होते. आबिटकरांच्या सोबत प्रचारासाठीही नेता राहिला नाही. मात्र आमदार आबिटकर सुरुवातीपासूनच नेते कुणाकडेही असले तरी जनता माझ्यासोबत आहे, यावर ठाम होते. मतपेटीतून तसेच चित्र मिळाले. आमदार आबिटकर यांनी केलेली विकासकामे, उत्तम संपर्क, तरुणाईला भावणारे व्यक्तिमत्व, सुखदु:खाला धावून येणारा आमदार अशी त्यांची प्रतिमा यामुळेच जनतेने त्यांना मतपेटीतून बळ दिले.
के. पी. पाटील यांना उशीरा उमेदवारी जाहीर झाली. तोपर्यंत आबिटकरांनी निम्मा मतदारसंघ पिंजून काढला. केपी कडवे शिवसैनिक होऊ शकत नाहीत, असा संदेश लोकांपर्यंत पोहोचला. तसेच केपी सहकारात तज्ज्ञ आहेत यामुळे त्यांनी बिद्री कारखाना चांगला चालवला. त्यांनी त्याकडेच लक्ष द्यावे अशी धारणा बनली. दुसरीकडे अपक्ष उमेदवार ए. वाय. पाटील यांनी ‘गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली,’ म्हणत बंडखोरी केली. मतदारांनी ती नाकारली. मात्र मेव्हुण्याच्या पराभवास कारणीभूत ठरल्याचा डाग मात्र त्यांची माथी लागला.
के. पी. पाटील यांनी शेवटपर्यंत विजयासाठी संघर्ष केला. पण ते शिष्याला पराभूत करु शकले नाहीत. शिष्यापुढे राजकीय डावपेच आखण्यात ते निष्प्रभ ठरले. त्यांना सलग तिसऱ्यांदा पराभवाला सामोरे जावे लागले.
निवडणुकीतील मुद्दे
- ‘केपीं’च्या प्रचारात कार्यकर्त्यांपेक्षा नेत्यांचीच मांदीयाळी
- स्थानिक नेत्यांचे अंदाज ‘केपीं’ना नडले.
- सर्वसामान्य जनतेने हातात घेतली निवडणूक
- आजरा शहर आणि काही मोजक्याच गावांमध्येच ‘केपीं’ना अल्पशी आघाडी
- अपक्ष ए. वाय. पाटील यांची उमेदवारी केंपींना ठरली अडसर
- विषारी प्रचारापेक्षा विकासकामांना कौल
- ‘केपीं’ना बिद्री साखर कारखाना व आबिटकरांनी विधानसभा मतदारांचे सूञ
- ‘केपीं’शी थेट संपर्क करण्यात मतदारांना कार्यकर्ते ठरले अडसर