सोलापूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत इलेक्टिव्ह मेरीट लक्षात घेऊन भाजपने दोन ड्रग तस्करांना पक्षात प्रवेश दिल्याने खळबळ उडाली आहे. या गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना ड्रग तस्करीच्या गुन्ह्यात अटक झाली होती. त्यांना जामिन मिळाल्यानंतर पक्षात प्रवेश दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी टीका केली.
भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या उपस्थितीत भाजप कार्यालयात माजी नगराध्यक्ष संतोष कदम परमेश्वर उर्फ मेंबर आणि माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापू केणे यांनी पक्षात प्रवेश केला आहे. तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणी २२जून रोजी माजी नगराध्यक्ष संतोष कदम यांना अकलूज येथून सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली होती. तर माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापू कणे यांना पुणे येथून २१ जुलै रोजी अटक करण्यात आली होती. छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने या दोघांना १० ऑक्टोबर रोजी सशर्त जामीन मंजूर केला आहे. (Drug smugglers join BJP)
विजय वडेट्टीवारांची टीका
माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, ड्रग्ज विकणारा असेल, ड्रग्ज तस्करी करणारा असेल, माफिया असेल, सर्वात मोठा गुंड असेल, अशा लोकांसाठी भाजपाने तीन प्रकारच्या मशीन ठेवल्या आहेत. ते या लोकांना मशीनमध्ये घालतात आणि शुद्ध करून घेतात. भाजपाला जर जनाची आणि मनाची नसेल तर त्यावर बोलण्यात काय अर्थ आहे, अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला. (Drug smugglers join BJP)
खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रात लिहिले आहे की, “ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळत आहे, हे अत्यंत चिंताजनक आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना राजकीय पक्षात स्थान देणे म्हणजे समाजविघातक प्रवृत्तींना प्रोत्साहन देणे होय. लोकशाही व्यवस्थेत पक्ष वाढवण्याचा अधिकार सगळ्यांना आहे, पण गुन्हेगारांना आसरा देणे ही जबाबदार राजकारणाची पद्धत नाही.” अशी टीका सुळे यांनी केली आहे.
सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. खासदार सुप्रिया सुळे यांनी ड्रग्जविरोधी मोहिमेचे महत्त्व अधोरेखित करत सरकारने यावर ठोस भूमिका घ्यावी, असेही सांगितले. महाराष्ट्रात ड्रग्ज तस्करीला राजाश्रय दिला जाणार नाही, असा संदेश सरकारकडून गेला पाहिजे, असं सुळे म्हणाल्या. आपण राज्याचे प्रमुख आहात, आपल्यासमोर अनेक कामे पडलेली असतात. त्यामुळे कदाचित ही बातमी आपल्यापर्यंत पोहोचली नसावी, किंवा सदर व्यक्तीच्या ड्रग्स गुन्हेगारीमधील पार्श्वभूमीबाबत आपल्याला माहिती देण्यात आली नसावी. हे गृहित धरुन मी आपणास हे पत्र लिहित आहे. समाजहित डोळ्यासमोर ठेवून ड्रग्जविरोधी लढ्यात आम्ही सर्वजण आपल्यासोबत आहोत. या संदर्भात मी यापूर्वीही आपणांस पत्राद्वारे कळविले होते, असेही त्या पुढे म्हणाल्या. (Drug smugglers join BJP)