महाराष्ट्राच्या राजकारणातील व्हायब्रंट म्हणून ओळखल्या जाणा-या कागल तालुक्यात घडलेल्या धक्कादायक घडामोडींची राज्याच्या पातळीवर चर्चा आहे. कागल नगरपालिकेच्या निवडणुकीत इथले कट्टर विरोधक राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू समूहाचे प्रमुख समरजितसिंह घाटगे यांच्यातच युती झाली आहे. कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता नेत्यांच्यात अचानक झालेल्या युतीमुळे सगळ्यांनाच कोड्यात टाकले आहे. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे माजी खासदार संजय मंडलिक यांच्यासाठी या युतीने संधी निर्माण केलीय की संकट, माजी आमदार संजय घाटगे यांचे राजकीय भवितव्य काय, याचाच ऊहापोह करणार आहोत.
विजय चोरमारे
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुका राजकीयदृष्ट्या जागरूक तालुका म्हणून ओळखला जातो. शंभर टक्के राजकियीकरण झालेल्या या तालुक्यातला प्रत्येक माणूस कुठल्यातरी गटाचा असतो. कुठल्या गटाचा नसलेला माणूस सापडणं इथं कठीण. गटासाठी डोकी फोडून घेणारे कार्यकर्ते इथं शेकड्यानं सापडतील. अशा परिस्थितीत दोन पिढ्यांचे पारंपरिक राजकीय विरोधक कागल नगरपालिकेच्या निमित्ताने अचानक एकत्र आलेत. त्यामुळे कार्यकर्त्यांना बसलेला धक्का विलक्षण आहे. कारण या दोघांनीही कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता परस्पर एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही गटांचे कागलमधील कार्यकर्ते दहशतीखाली आहेत. काल आमचे प्रतिनिधी तिथल्या लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी गेले असता कॅमे-यासमोर बोलण्याचे धाडस कुणी दाखवले नाही. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कागलमधील भाजपच्या कार्यकर्त्यांना दिलेले एबी फॉर्म पक्षाने परत घेतले. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांचाही मुखभंग झाला आहे.
मंडलिक घाटगे संघर्षानंतर मुश्रीफांचा उदय
एकेकाळी सदाशिवराव मंडलिक आणि विक्रमसिंह घाटगे यांच्या गटांमध्ये विभागलेल्या या तालुक्याने पुढे काही नाट्यमय वळणे बघितली. विक्रमसिंह घाटगे आणि सदाशिवराव मंडलिक यांच्यातला सामना १९७८ पासून सुरू झाला. १९७८ आणि १९८० या दोन निवडणुकांमध्ये घाटगे यांनी मंडलिकांना पराभूत केले. त्यानंतर सलग तीन निवडणुकांमध्ये मंडलिकांनी घाटगे यांचा पराभव केला. १९९८ मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवतीर्थावरून कोल्हापूर लोकसभेसाठी विक्रमसिंह घाटगे यांची उमेदवारी जाहीर केली. त्यांच्याविरोधात काँग्रेसने मंडलिक यांना लोकसभेला उमेदवारी दिली. मंडलिक विजयी झाले. त्यांच्या रिक्त जागेवर हसन मुश्रीफ यांना विधानसभेची उमेदवारी मिळाली. परंतु शिवसेनेकडून लढणा-या संजय घाटगे यांनी त्यांचा पराभव केला. मुश्रीफ यांची ही पहिली विधानसभा निवडणूक आणि पहिला तसेच आजपर्यंतचा एकमेव पराभव. त्यानंतर १९९९ पासून मुश्रीफ यांनी सातत्याने कागलवर वर्चस्व ठेवले. संजय घाटगे, संजय मंडलिक आणि गेल्या दोन निवडणुकांमध्ये समरजित घाटगे यांचा त्यांनी पराभव केला. (Mushrif Ghatge alliance: opportunity or crisis)
महायुतीत सामिल झाल्यानंतर ईडीचा धोका टळला
एका टप्प्यावर सदाशिवराव मंडलिक आणि त्यांचे सेनापती हसन मुश्रीफ यांच्यातच वितुष्ट आले. कालांतराने सदाशिवराव मंडलिक आणि विक्रमसिंह घाटगे राजकीय पटलावरून बाजूला झाले. त्यांची पुढची पिढी आली. प्रा. संजय मंडलिक आणि समरजितसिंह घाटगे. पण राजकीय कोन बदलला होता. मुश्रीफ आणि मंडलिक असा नवा संघर्ष सुरू होऊन घाटगे गट थोडा बाजूला पडला होता. मुश्रीफ यांना आव्हान देणे कठीण बनत असल्याचे लक्षात आल्यावर समरजित घाटगे यांनी भाजपची मदत घेतली. २०१४ नंतर चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांना ताकद दिली. त्यातूनच ईडीचे छापे वगैरे भानगडी घडल्या. मुश्रीफांच्यासाठी अडचणीची परिस्थिती निर्माण झाली. राजकीय अस्तित्त्वच पणाला लागले. तसे अजित पवार यांच्या गटातले मुश्रीफ यांच्यासह डझनभर नेते तुरुंगाच्या दरवाजात उभे होते. पण अजितदादांनी शरद पवारांची साथ सोडून भाजपसोबत सत्ता स्थापन केली. आणि तुरुंगाच्या दारातले हे नेते थेट देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये मंत्रिपदावर विराजमान झाले. ईडीचा धोका टळला. तुरुंग टळला आणि वर सत्ताही मिळाली. हसन मुश्रीफ महाविकास आघाडीतून महायुतीत आले. युतीतील जागावाटपाच्या सूत्रानुसार विद्यमान आमदारांना त्याची त्याची जागा. त्यामुळे समरजित घाटगे यांची भाजपच्या तिकिटाची संधी हुकली. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निष्ठा कायम ठेवून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा मार्ग धरला. तुतारीच्या चिन्हावर विधानसभा निवडणूक लढवली. परंतु इथेही त्यांना मुश्रीफ यांचा पराभव करता आला नाही. मुश्रीफ यांच्याविरोधात त्यांचा हा दुसरा पराभव होता. पराभवानंतर त्यांच्यासाठी भाजपमध्ये परत जाण्याचा मार्ग होता. पण कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे त्यांना लगेच तसा निर्णय घेता आला नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पुन्हा मुश्रीफ विरुद्ध घाटगे असा सामना रंगण्याची चिन्हे दिसत होती. तेवढ्यात या दोन नेत्यांचीच दिलजमाई झाली. (Mushrif Ghatge alliance: opportunity or crisis)
विधानपरिषदेत सतेज पाटील विरुद्ध समरजीत घाटगे?
मुश्रीफ मंत्रिपदावर आहेत. समरजित घाटगे यांनी हा पर्याय का निवडला असावा, असा प्रश्न अनेकांना पडतो. त्याच्या उत्तराचा एक पर्याय म्हणजे या बदल्यात समरजित यांना कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून महायुतीची उमेदवारी मिळू शकते. काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते सतेज पाटील सध्या त्या जागेवर आहेत. जानेवारी २०२८ पर्यंत त्यांची मुदत आहे. त्यानंतर होणारा सामना कदाचित सतेज पाटील विरुद्ध समरजित घाटगे असा असू शकतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने हा समझोता झाल्याचे समजते.
समरजीत घाटगेंचा भाजपमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा
तरीही एक प्रश्न उरतोच. समरजित घाटगे यांना विधान परिषदेवर जाण्याची संधी याआधीही होती. परंतु मुश्रीफ यांचा पराभव करूनच आपल्याला विधिमंडळात जायचे आहे, असा त्यांचा निर्धार होता. २०१८ ला विधान परिषदेच्या ज्या जागा रिक्त झाल्या होत्या, त्यातून समरजित यांना संधी देण्याची भाजपची तयारी होती. परंतु त्यांनी ती संधी सोडून २०२४ ची विधानसभेची निवडणूक लढवली. उत्तमपणे लढत देऊनही सलग दोनवेळा पराभव झाल्यानंतर त्यांच्यापुढे फारसे पर्याय शिल्लक नव्हते. ते शरीराने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात असले तरी मनाने देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत होते. सत्तेशिवाय फार काळ संघर्ष करण्यात अर्थ नसल्याचे ओळखून त्यांनी सध्याचा निर्णय़ घेतल्याचे दिसते. या घडामोडीने ते भाजपमध्ये जाण्याचा मार्गही मोकळा झाला.
समरजित घाटगे यांनी हसन मुश्रीफ यांच्याशी केलेली दिलजमाई म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने अजित पवार यांच्या गटाशी म्हणजे हसन मुश्रीफ यांच्याशी युती केलेली नाही, असे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी स्पष्ट केले आहे. समरजित घाटगे हे पक्षाच्या कोणत्याही पदावर नाहीत. त्यामुळे त्यांना युतीचा निर्णय घेण्याचा अधिकार नाही, असे व्ही. बी. पाटील यांनी म्हटले आहे. (Mushrif Ghatge alliance: opportunity or crisis)
विधानपरिषदेची जबाबदारी मुश्रिफांवर, अन्यथा गाठ फडणवीसांशी
आता नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत आहेत. यामध्ये महायुतीच्या जागा चांगल्या संख्येने निवडून येतील, असा महायुतीच्या नेत्यांना विश्वास आहे. त्या बळावर समरजित घाटगे यांच्यामार्फत सतेज पाटील यांना आव्हान देण्याची पुढची रणनीती असू शकते. सतेज पाटील आणि मुश्रीफ यांची मैत्री जगजाहीर आहे. त्यामुळे समरजित घाटगे यांना निवडून आणण्याची जबाबदारी मुश्रीफ यांच्यावर दिली जाऊ शकते. विधानसभेच्या आधी ही निवडणूक असल्याने मुश्रीफ यांना जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. नाहीतर गाठ देवेंद्र फडणवीस यांच्याशी आहे. दगाफटका केला तर त्याचे परिणाम काय असू शकतात याची मुश्रीफ यांना पुरेपूर कल्पना आहे. आमची युती बरेच दिवस चालणार असल्याचे विधान मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत केले. त्यावरून पुढचे राजकारणही स्पष्ट होते.
युतीमुळे संजय मंडलिक मुश्रिफापासून दूर
मुश्रीफ आणि समरजित घाटगे एकत्र येण्यामुळे माजी खासदार संजय मंडलिक हे मुश्रीफ यांच्यापासून दूर गेले. याआधी गोकुळमध्ये वीरेंद्र मंडलिक यांचा पराभव, त्यानंतर लोकसभेला स्वतः संजय मंडलिक यांचा पराभव यामुळे दोघांमध्ये अंतर पडले होतेच. राज्यपातळीवर भाजपकडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खच्चीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुश्रीफ-समरजित यांना एकत्र आणणे त्याच प्रयत्नांचा भाग असू शकतो.
विधानसभेपासून माजी आमदार संजय घाटगे आणि मुश्रीफ यांची जवळीक वाढली होती. संजय घाटगे यांना त्याचे अनेक लाभ मिळाले आहेत. आताच्या घडामोडींमध्ये त्यांना ना भाजपने गांभीर्याने घेतले, ना मुश्रीफांनी. आता कागलमधील तिन्ही गटांची भूमिका स्पष्ट झाली आहे. संजय घाटगे नाराज असल्याचे सांगण्यात येत होते. परंतु आम्ही त्यांना सोबत घेऊ, असा विश्वास मंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केला आहे. कागलच्या राजकारणात मंडलिक-संजय घाटगे यांच्यात फारसे सौहार्द कधीच नव्हते. संजय घाटगे यांचे पुढचे राजकारण कसे असेल, हेही पाहावे लागणार आहे.
मुश्रीफ यांची राजकीय भूमिका कागल, मुरगूड, गडहिंग्लज, आजरा आणि चंदगडमध्येही वेगवेगळी आहे. बेरजेचे राजकारण करून स्वतःची राजकीय ताकद वाढवण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत.एवढी सगळी चर्चा केल्यानंतरही काही प्रश्न उऱतातच.
दिलजमाईसाठी फडणवीसांना पुढाकार का घेतला?
देवेंद्र फडणवीस यांनी ही दिलजमाई घडवून आणण्यासाठी का पुढाकार घेतला असावा..त्याचे उत्तर शोधताना लक्षात येते की, मुश्रीफ यांच्या ईडीच्या प्रकरणांची चर्चा विधानसभेच्या निवडणुकीत झाली, परंतु ती वाहून गेली. आता फडणवीसांचे सरकार आहे. समरजित घाटगे नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा ईडीचे मुद्दे काढतील. त्यातून मुश्रीफ यांची नव्हे, तर फडणवीस यांच्या सरकारची अब्रू चव्हाट्यावर येईल. त्यामुळे फडणवीस यांनी समरजित यांना सबुरीचा सल्ला दिला असावा, असे सांगण्यात येते.
मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांनी आपसात काही वाटाघाटी केल्या असल्याची चर्चाही कागलच्या वर्तुळात आहे. समरजित घाटगे यांनी ईडीचे प्रकरण पुढे न्यायचे नाही. आणि समरजित घाटगे यांनी कागल नगरपालिकेला दिलेला भूखंड परत मागितला आहे. त्यात मुश्रीफ यांनी हस्तक्षेप करायचा नाही. या मुद्द्यावर संगनमत झाले असण्याची एक शक्यता वर्तवली जाते.
संजय मंडलिकांना मोठी संधी
अशा परिस्थितीत संजय मंडलिक किती गांभीर्याने लढणार हा खरा प्रश्न आहे. खासदार सदाशिवराव मंडलिक हे राजकीय संकटाचे संधीत रुपांतर करायचे. जेवढे आव्हान अवघड तेवढ्या ताकदीने ते लोकांच्यात उतरायचे आणि चित्र बदलून टाकायचे. त्यासाठी हवे तेवढे कष्ट घेण्याची त्यांची तयारी असायची. संजय मंडलिक यांच्या लाइफ स्टाईलच्या ज्या चर्चा बाहेर आहेत, त्या ख-या असतील तर त्यांच्यासाठी शून्य संधी असेल. तसेही आतापर्यंत त्यांना त्यांच्या योग्यतेपेक्षा अनेक पटींनी अधिक मिळाले आहे, असे लोक म्हणतातच. आताच्या परिस्थितीने त्यांच्यापुढे एक मोठी संधी निर्माण केली आहे. स्वतःला सिद्ध करण्याची ही संधी आहे. आव्हान मोठे आहे. पण आव्हान स्वीकारून ते मैदानात उतरले आणि मुश्रीफांच्या भाषेत बोलायचे तर हाडाची काडे आणि रक्ताचे पाणी केले तर त्यांच्यासाठी नवी संधी निर्माण होऊ शकते. पण ते फक्त आणि फक्त त्यांच्या हातात आहे. त्यासाठी आपल्याला कुणी झोपेतून उठवायला येणार नाही, हेही त्यांनी लक्षात ठेवायला हवे.
…