शून्यातून साम्राज्य उभं करणं अवघड असतं, परंतु मिळालेलं साम्राज्य टिकवणं आणि वाढवणं त्याहून अवघड असतं. कसबा बावड्याच्या डीवाय पाटील यांनी कोल्हापूर, पुणे, मुंबईत शैक्षणिक साम्राज्य उभारलं. त्यातील कोल्हापूरच्या शैक्षणिक साम्राज्याची जबाबदारी डॉ. संजय डी. पाटील यांच्याकडं आली. त्यांनी विस्ताराबरोबरच त्याला जी दिशा दिली आणि जी उंची गाठली ती थक्क करणारी आहे. दस्तुरखुद्द डीवाय दादांनाही अभिमान वाटावा, अशी ही कामगिरी आहे. संजय पाटील यांनी केवळ शैक्षणिक साम्राज्य टिकवलं आणि वाढवलं नाही. त्याहून मोठी जबाबदारी होती ती डीवाय दादांची सामाजिक जाणीव पुढे नेण्याची. संजय पाटील यांनी ती जाणीवही तेवढ्याच समर्थपणे पुढे नेली, हे आवर्जून नोंद करायला हवे. (Sanjay D Patil)
कोल्हापूरची जबाबदारी
डीवाय दादांच्या कामाची सुरुवात नवी मुंबईतून झाली. मात्र डीवाय म्हणजे कसबा बावडा आणि कोल्हापूर अशीच ओळख होती. राजकीय, सामाजिक संबंध कोल्हापूर परिसरात असल्यामुळे त्यांना कोल्हापुरात शैक्षणिक कार्याचा विस्तार करावयाचा होता. डीवाय दादांनी स्वतःला कधी एका गावाशी बांधून घेतलं नाही. कोल्हापूरपासून पुणे, मुंबई दिल्लीपर्यंत आणि नेपाळ, मॉरिशसपर्यंत त्यांनी आपल्या कार्याचा विस्तार केला. हे करताना त्यांनी तिथल्या तिथल्या संस्थांची जबाबदारी नेमक्या माणसांवर सोपवली. कोल्हापूरची जबाबदारी संजय पाटील यांच्याकडे आली.
चांगल्या गोष्टींना पाठबळ
संजय पाटील यांना प्रारंभीच्या काळात कुणी पाहिले असेल तर त्यांना त्यावेळचे संजय पाटील आणि आजचे संजय पाटील यातील फरक जाणवत असेल. प्रारंभीच्या काळात ते तितकेसे माणसांत मिसळत नव्हते. स्वतः डीवाय दादाच कारभार पाहात असल्यामुळे असेल पण ते मागेमागेच असायचे. आजही सगळा कारभार स्वतः सांभाळत असले तरी कुठल्याही सार्वजनिक समारंभात पुढे नसतात. सार्वजनिक सभा-समारंभांपासून स्वतःला कटाक्षाने अलिप्त ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. याचा अर्थ समाजापासून ते अलिप्त असतात असे नाही.
अवती-भवती घडणा-या सगळ्या घटना-घडामोडींकडे त्यांचे बारीक लक्ष असते. कुठे चांगले घडत असेल आणि तिथे आपली गरज आहे असे वाटले तर त्या ठिकाणी ते स्वतःचे काम समजून उभे राहतात. कोल्हापूर आणि परिसरात घडणा-या प्रत्येक चांगल्या कामात त्यांची भागीदारी असते. कोल्हापुरात १९९२ साली झालेल्या ६५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष डीवायदादा होते. ते संमेलन यशस्वी करण्यासाठी संजय पाटील यांनी अहोरात्र घेतलेले परिश्रम मी जवळून पाहिले आहेत.
विहिरीच्या बांधकामापासून सुरुवात
संजय पाटील म्हणजे अत्यंत कष्टाळू आणि जिद्दी व्यक्तिमत्व. ते कॉलेजला असतानाच त्यांना कन्स्ट्रक्शनमध्ये आवड असल्याचे डीवाय दादांच्या लक्षात आले. त्यामुळे बारावीला असतानाच एका विहिरीच्या बांधकामाची जबाबदारी दादांनी त्यांच्यावर सोपवली. त्यावेळी स्वत: एम-80 गाडीवरून जोतिबा डोंगरावर जाऊन संजय पाटील यांनी विहिरीसाठीचे दगड निवडले. ते ट्रॅक्टरमधून बावड्यात आणले. स्वत:च्या जबाबदारीवर त्यांनी बांधलेली ही विहीर पाहून दादांना त्यांच्यातील कर्तबगारीची जाणीव झाली होती. १९९३-९४ साली मेडिकल कॉलेजची इमारतसुध्दा संजय पाटील यांनीच बांधून पूर्ण केली.
शेतीची आवड आजोबांपासून
संजय पाटील यांचे विशेष आवडीचे क्षेत्र म्हणजे शेती. शेतीची आवड ही यशवंतराव पाटलांपासून त्यांच्या घराण्यात. डीवाय दादांनाही शेतीची आवड आणि तोच वारसा संजय पाटील यांच्याकडे आला. यशवंतराव पाटील यांनी शेतीतूनच समृद्धी मिळवली आणि डीवाय दादांचा प्रारंभीचा आधारही शेतीच होता. परंतु संजय डी. पाटील यांनी आपल्या कर्तबगार आजोबा आणि वडिलांच्याही पुढची झेप घेतली. त्यांचे शेतीतले कर्तृत्व शब्दांत वर्णन करण्याच्या पलीकडे आहे. त्याची प्रत्यक्ष अनुभूती घ्यायची असेल तर तळसंदे (ता. हातकणंगले) येथे उभे राहिलेले डीवाय पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय पाहावयास हवे. अडीचशे एकरच्या फोंड्या माळावर साधे तणही उगवत नव्हते. अशा ठिकाणी वारणा नदीतून स्वतंत्र पाईपलाईनने पाणी आणून वनराई फुलवण्याचे काम संजय पाटील यांनी केले.
ह्या शेताने लळा लाविला असा असा की
सुखदुःखाला परस्परांशी हसलो रडलो
आता तर हा जीवच अवघा असा जखडला
मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो
ना. धों. महानोर यांच्या या कवितेच्या ओळी संजय पाटील यांच्या व्यक्तिमत्वाला चपखलपणे बसतात.
एखाद्या शेती महाविद्यालयाचा परिसर किती समृद्ध आणि प्रयोगशील असू शकतो, ही प्रत्यक्ष पाहण्याची गोष्ट आहे. संजय पाटील यांच्या कर्तृत्वाची झलक तळसंदेच्या माळावर फुललेल्या हिरवाईतून दिसते.
खडतर वाटचाल
डीवाय पाटील यांनी उभे केलेले शैक्षणिक साम्राज्य, त्याच्या भव्य दिव्य इमारती लोकांना आज दिसतात. परंतु त्या उभ्या करताना त्यांच्यासह कुटुंबीयांना कोणत्या दिव्यातून जावे लागले असेल याची कल्पना कुणाला नाही. त्याअर्थाने संजय पाटील यांच्यासाठी प्रारंभीचा काळ खूप खडतर होता. संजय पाटील यांना डीवाय पाटील यांचा शैक्षणिक कार्याचा वारसा त्या खडतरपणासह मिळाला. अनेक अडचणी आल्या. सरकारी पातळीवरच्या. सामाजिक पातळीवरच्या. राजकीय पातळीवरच्या. अनेकदा मोडून पडण्यासारखी परिस्थिती आली. परंतु त्यांनी हिंमत सोडली नाही. प्रत्येक गोष्टीचा त्यांनी जिद्दीने सामना केला.
संजय पाटील यांचे व्यक्तिमत्त्व तावून सुलाखून निघालेले आहे. वाढत्या वयाबरोबर जबाबदा-या वाढत गेल्या. त्याबरोबर ते अधिक समाजशील बनत गेले. डीवाय दादांच्या हृदयातली करुणा अनुवंशिकतेने त्यांच्या हृदयात झिरपली होती. त्यातूनच ते अवतीभवतीच्या लोकांच्या सुख-दुःखांशी समरस झाले. त्यांनी असंख्य जिवाभावाची माणसे गोळा केली. जोडली. शैक्षणिक संस्थांचा एवढा मोठा व्याप केवळ पगारी नोकरांवर सांभाळणे शक्य नव्हते. संजय पाटील यांनी गोळा केलेल्या जिवाभावाच्या माणसांमुळे त्याला आकार येत गेला. संस्थेतल्या प्रत्येक कर्मचा-याला संस्था आपली वाटते, ती त्याचमुळे.
हॉस्पिटल आणि हॉस्पिटॅलिटी
कदमवाडी येथील सुसज्ज हॉस्पिटल किंवा हॉटेल सयाजी हे पंचतारांकित हॉटेल या त्यांच्या कर्तृत्वाच्या आणखी काही निशाण्या. डीवाय पाटील हॉस्पिटल हे अत्याधुनिक सुविधा असलेले दुसरे सरकारी हॉस्पिटल असल्यासारखेच आहे. कुणाही गरजू, गरीब रुग्णाची तिथे बिलासाठी अडवणूक होत नाही.
पत्नीचे पाठबळ
संजय पाटील यांना सौ. वैजयंतीवहिनींचे मोठे पाठबळ आहे. त्याचा ते नेहमी आत्मियतेने उल्लेख करतात. चिरंजीव, माजी आमदार ऋतुराज आणि पृथ्वीराज हे दोघेही संस्थेच्या कामात सक्रीय असतात. ऋतुराज सामाजिक क्षेत्रात ज्या तळमळीने काम करतो, ते पाहून डीवाय दादांच्या उमेदीच्या काळातल्या कामाची आठवण आल्यावाचून राहात नाही.
सतेज यांना खंबीर साथ
सतेज पाटील हे राजकारणात सक्रीय असतात. कोल्हापूर जिल्ह्याच्या पलीकडे आता राज्य पातळीवर त्यांच्या कामाची अधिक गरज आहे. तिथे त्यांनी आपली योग्यता सिद्ध केली आहे. राज्य पातळीवर आत्मविश्वासाने काम करण्यासाठी स्थानिक पातळीवर पाया भक्कम असण्याची गरज असते. २०२४च्या विधानसभेचे निकाल विचित्र लागले. अर्थात ते राज्यात सगळीकडेच लागले. कोल्हापूर अपवाद ठरले नाही. मतांचे आकडे पाहता काँग्रेसचा इथला पाया भक्कम आहेच. काँग्रेसची कोल्हापूर जिल्ह्यातील जी ताकद आहे, ती सतेज पाटील यांच्यामुळेच.
संजय पाटील सार्वजनिक सभा-समारंभांमध्ये नसतात हे खरे. राजकीय व्यासपीठांपासूनही ते दूर राहतात. परंतु सतेज पाटील यांच्या कामात त्यांची खंबीर साथ असते. २०२२च्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार श्रीमती जयश्री जाधव यांच्यासाठी सतेज पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. स्वतः किंवा कुटुंबातील कुणी उमेदवार नसतानाही सतेज पाटील यांनी ती निवडणूक ताकदीने लढवली. त्या निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात संजय पाटील यांनी पडद्यामागे राहून जे काम केले, त्यामुळे अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक जिंकणे काँग्रेसला सोपे गेले.
संजय पाटील यांच्या कर्तृत्वाची, माणुसकीची अनेक उदाहरणे कोल्हापूरने पाहिली आहेत.
आभाळाला हात टेकूनही पाय जमिनीवर असलेल्या डॉ.संजय डी. पाटील यांना एकसष्ठीनिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!