नेताजी सुभाषचंद्र बोस यांची ऐतिहासिक टोपी खरोखरच हरवली आहे का? नेताजींच्या कुटुंबीयांनी काही वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे ही ऐतिहासिक आणि अमूल्य अशी टोपी सुपूर्द केली होती. या टोपीच्या संदर्भाने एक नवाच वाद निर्माण झाला आहे.
नेताजींचे पणतू चंद्रकुमार बोस यांनी आरोप केला आहे की, लाल किल्ल्यातील नेताजी संग्रहालयात ठेवलेली टोपी गायब झाली आहे. त्यांनी तक्रार केल्यानंतर एक टोपी पुन्हा प्रदर्शनात ठेवण्यात आली. परंतु त्या टोपीसंदर्भात संशय व्यक्त केला जात आहे. प्रदर्शनातली टोपी खरी नसून “नकली” असू शकते, असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया (एएसआय) ने स्पष्टीकरण दिले आहे की, नेताजींची टोपी गायब झालेली नाही. सुरक्षित आहे. ती अलीकडे पोर्ट ब्लेअर येथे एका प्रदर्शनासाठी नेण्यात आली होती आणि सध्या ती सुरक्षित कस्टडीमध्ये आहे.मात्र चंद्रकुमार बोस यांनी यावरही प्रश्न उपस्थित केला आहे. इतकी महत्त्वाची आणि ऐतिहासिक वस्तू वारंवार वेगवेगळ्या प्रदर्शनांसाठी का नेली जाते? असा सवाल त्यांनी केला आहे.चंद्र कुमार बोस हे नेताजींचे पणतू असून ते पूर्वी भारतीय जनता पक्षातच होते. या संपूर्ण प्रकरणामुळे ते खूप नाराज आहेत.त्यांचे म्हणणे असे आहे की लाल किल्ल्यातील नेताजी संग्रहालयात नेताजींची टोपी दिसत नाही. आता जी टोपी दाखवली जात आहे ती खरी टोपी वाटत नाही.एएसआय म्हणते टोपी सुरक्षित आहे, पण अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. (Netaji Subhash Chandra Bose’s cap has gone missing)
बारा मार्च रोजी चंद्र कुमार बोस यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली. त्यात त्यांनी म्हटले होते की, २०१९ मध्ये नेताजींच्या जयंतीदिवशी २३ जानेवारी २०१९ रोजी त्यांनी, त्यांच्या कुटुंबाने आणि काही मित्रांनी मिळून नेताजींची ही टोपी पंतप्रधान मोदी यांच्याकडे सुपूर्द केली होती. मोदींनी ती टोपी लाल किल्ल्यातील नेताजी संग्रहालयात ठेवण्याची व्यवस्था केली होती. दहा मार्च २०२६ रोजी नेताजींसाठी काम करणाऱ्या ओपन प्लॅटफॉर्म फॉर नेताजी (OPN) या संस्थेचे सदस्य आणि सुप्रीम कोर्टाचे वकील नवीन बामेल यांनी लाल किल्ल्यातील नेताजी संग्रहालयाला भेट दिली. तेव्हा त्यांना, नेताजींची टोपी ठेवलेली काचची पेटी रिकामी असल्याचे आढळून आले. नवीन बामेल यांनी त्याबाबत संग्रहालयातील कर्मचाऱ्यांच्याकडे विचारणा केली. मात्र टोपी कुठे आहे याची माहिती कर्मचा-यांनाही नव्हती. ही घटना “खूप लाजिरवाणी” असल्याचे चंद्र कुमार बोस यांनी म्हटले. त्यांनी म्हटले की, नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारतातील सर्वात मोठ्या नेत्यांपैकी एक आहेत. त्यांच्या वस्तू गायब होणे हा त्यांचा अपमान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंपूर्ण प्रकरणाची चौकशीकरावी, अशी मागणीही त्यांनी केली
चंद्र कुमार बोस यांच्या आरोपानंतर सगळीकडे गहजब उडाला त्यामुळे एएसआयच्या अधिकाऱ्यांना स्पष्टीकरण देणे भाग पडले. त्यांनी सांगितले की, जानेवारी २०२६ मध्ये पराक्रम दिवसानिमित्त नेताजींची टोपी पोर्ट ब्लेअर येथे आयोजित केलेल्या तात्पुरत्या प्रदर्शनासाठी नेण्यात आली होती. त्यामुळे १९ ते २५ जानेवारीदरम्यान संग्रहालयातील काचपेटी रिकामी होती. प्रदर्शन संपल्यानंतर टोपी पुन्हा लाल किल्ल्यात आणली गेली.पण त्यानंतर काचपेटीच्या कुलुपात तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे टोपी सुरक्षित ठेवण्यात आली होती. आता कुलूप दुरुस्त झाले असून ती पुन्हा प्रदर्शनात ठेवली जाणार आहे. (Netaji Subhash Chandra Bose’s cap has gone missing)
तरीही वाद का थांबला नाही?… शुक्रवारी १३ मार्च २०२६ रोजी नेताजींची टोपी पुन्हा प्रदर्शनात ठेवण्यात आली. पण त्यानंतरही चंद्र कुमार बोस समाधानी झाले नाहीत. त्यांनी त्यासंदर्भाने सोशल मीडियावर दोन पोस्ट केल्या. याप्रकरणी पंतप्रधान मोदींनी तत्काळ कारवाई केली याबद्दल त्यांनी आभार मानले. परंतु ज्यांनी आधी खरी टोपी पाहिली आहे त्यांचे म्हणणे आहे की आता ठेवलेली टोपी खरी वाटत नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून टोपीची सत्यता पडताळण्याची आवश्यकता असल्याची मागणी त्यांनी केली.
आणखी एक मोठा प्रश्न… दरम्यान, नेताजींच्या कुटुंबाने जी टोपी पंतप्रधानांना दिली आणि ती लाल किल्ल्यात ठेवली गेली, ती वेगवेगळ्या प्रदर्शनांसाठी वारंवार का नेली जाते? असा प्रश्न चंद्र कुमार बोस यांनी एएसआयला विचारला आहे. टोपी सध्या कुठे आहे? याबाबत संग्रहालयात स्पष्ट माहिती का दिली जात नाही? असा प्रश्न विचारून, संग्रहालयात याबद्दल माहिती देणारा फलक लावण्याची सूचना त्यांनी केली आहे.
२०२१ मध्येही अशीच घटना… दरम्यान नेताजींची टोपी हरवण्याचे प्रकरण पहिल्यांदाच घडलेले नाही. २०२१ मध्येही टोपी गायब झाल्याची चर्चा झाली होती. तेव्हा केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने सांगितले होते की टोपी व्हिक्टोरिया मेमोरियल येथे नेताजींच्या १२५ व्या जयंतीच्या प्रदर्शनासाठी तात्पुरती दिली होती. त्यावेळीही चंद्र कुमार बोस यांनी नाराजी व्यक्त केली होती.
या टोपीचे महत्त्व काय?
ही टोपी नेताजींची वैयक्तिक टोपी आहे. नेताजींचा मुलगा अमिया नाथ बोस यांच्याकडे कौटुंबिक वारसा म्हणून ती जपून ठेवलेली होती. २०१९ मध्ये ही टोपी कुटुंबाने पंतप्रधान मोदींकडे दिली. जेणेकरून ती लाल किल्ल्यातील नेताजी संग्रहालयात ठेवून सर्वसामान्य लोकांना पाहता येईल. नेताजींच्या अशा वस्तू भारताच्या स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा आहेत. त्यामुळे त्यांची योग्य प्रकारे सुरक्षा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
सध्या काय स्थिती आहे?… नेताजींच्या टोपीचे हे प्रकरण आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आले आहे. नेताजींशी संबंधित ऐतिहासिक वस्तूंची सुरक्षा अधिक काटेकोरपणे करणे आवश्यक असल्याची सामान्य लोकांची मागणी आहे. दरम्यान टोपीची अधिकृत तपासणी व्हावी आणि ती खरी आहे की नाही याबद्दल स्पष्ट माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी चंद्र कुमार बोस यांनी केली आहे.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने राजकारण करणा-या केद्रातल्या सध्याच्या सरकारकडून नेताजींच्या ऐतिहासिक टोपीची अशी हेळसांड होणे निश्चितच शोभादायक नाही. चंद्र कुमार बोस यांच्या मागणीनुसार सरकार खरोखर टोपीची तपासणी करणार का आणि तिच्या सुरक्षिततेबाबत ठोस उपाययोजना करणार का, हा खरा प्रश्न आहे. (Netaji Subhash Chandra Bose’s cap has gone missing)