साहित्य पुरस्कारांचे राजकारण सातत्याने चर्चेत असताना आणि गावपातळीवरील पुरस्कारांसाठीही लेखकांची चढाओढ पाहायला मिळत असताना आदिवासी लेखिका जेसिंता केरकेट्टा यांनी आंतरराष्ट्रीय पुरस्कार नाकारण्याचे धैर्य दाखवले. आपल्या कृतीतून त्यांनीमानवतेचा आवाज बुलंद करणा-या साहित्यिकांमध्ये त्यांची नोंद झाली आहे.
आदिवासी कवयित्री, लेखिका आणि स्वतंत्र पत्रकार जेसिंता केरकेट्टा यांना लहान मुलांसाठीलिहिलेल्या ‘जिरहुल’ या कवितासंग्रहासाठी यूएस एड आणि रूम टू रीड इंडिया ट्रस्टतर्फे संयुक्तपणे ‘रूम टू रीड यंग ऑथर ऑफ २०२४’ हा पुरस्कार जाहीर झाला होता.पॅलेस्टाईनमध्ये हजारो मुले मारली जात असताना यूएस एड आणि बोईंगशीसंबंधित कोणताही पुरस्कार मी स्वीकारणार नाही, असे जेसिंता केरकेट्टा यांनीसांगितले. २०२३ मध्ये पॅलेस्टाईनमध्ये हजारो मुले आणि महिला मारल्या जात असताना, भारतातील मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी रूम टू रीड इंडिया ट्रस्टनेबोईंग संस्थेसोबत सहकार्य केले होते. एकाच शस्त्राने हजारो मुले मारली जात असताना शस्त्रास्त्रांचा व्यापार आणि मुलांची चिंता एकत्र कशी चालते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. जेसिंता म्हणाल्या, “भारतात बालसाहित्यासाठी फारच कमी लेखन केले जात आहे. अशा परिस्थितीत लहान मुलांसाठी लिहिलेल्या पुस्तकाला पुरस्कार मिळणे हे कोणत्याही लेखकाला प्रोत्साहन ठरू शकते. पण त्याचबरोबर हेही लक्षात ठेवावे लागेल की, जेव्हा मुलांसाठी चांगले जग घडवण्यात जर या लोकांचा सहभाग नसेल, तर मग या पुरस्काराचे काय करायचे? “जिरहुल” हा काव्यसंग्रह २०२४ मध्ये प्रकाशित झाला आहे.आदिवासी भागातील जंगलात असलेल्या अनेक फुलांवरच्या कविता त्यात आहेत. या कविता सामाजिक-राजकीय जाणिवेच्या आहेत.
जेसिता केरकेट्टा यांचा जन्म तीन ऑगस्ट १९८३ रोजी झारखंड- ओडिशा सीमेजवळील सारंडा जंगलाच्या परिसरात असलेल्या खुदापोश या गावात झाला. त्यांचे वडील मॅरेथॉन ॲथलीट होते ज्यांनी स्थानिक शाळेत सुरक्षा रक्षक म्हणून आणि नंतर पोलीस दलातही काम केले.
जॅसिंटा केरकेट्टा या हिंदी-भाषेतील पत्रकार, कवी आणि कार्यकर्त्या आहेत. कविता आणि पत्रकारितेच्या माध्यमातून त्या महिलांविरुद्धचे अन्याय-अत्याचार, विस्थापन आणि शासनाच्या उदासीनतेबाबत, दडपशाहीबाबत प्रश्न विचारतात. फोर्ब्स इंडियाने भारतातील वीस सर्वश्रेष्ठ कर्तृत्ववान महिलांच्या यादीत त्यांना स्थान दिले आहे.
आदिवासींवरील अन्याय अत्याचार पाहून जेसिता यांनी पत्रकार होण्याचा निर्णय घेतला ज्याकडे स्थानिक पत्रकारांनी लक्ष दिले नव्हते. दैनिक जागरण या हिंदी दैनिकाच्या रांची आवृत्तीत रिपोर्टर म्हणून त्यांनी काम केले. २०१४ मध्ये मध्ये त्यांनी “झारखंडच्या पाच जिल्ह्यांमध्ये आदिवासी आणि खाणकाम” या विषयाचा अभ्यास केला. भारतीय ऑनलाइन न्यूज पोर्टल `द वायर`च्या हिंदी आवृत्तीसाठी आणि दैनिक `प्रभात खबर`च्या रांची आवृत्तीसाठी त्यांनी काम केले. पत्रकारितेव्यतिरिक्त, जेसिता केरकेट्टा सामाजिक कार्यकर्त्यादेखील आहेत. बँकॉकमधील एशिया इंडिजिनस पीपल्स पॅक्ट द्वारे पत्रकारितेतील योगदानासाठी २०१४ मध्ये त्यांना इंडिजिनस व्हॉईस ऑफ एशिया पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या वर्षी झारखंड इंडिजिनस पीपल्स फोरम या नागरी समाज संस्थेकडून कवितांसाठी पुरस्कार मिळाला, तसेच आणि छोटा नागपूर कल्चरल असोसिएशनचा प्रेरणा सन्मान पुरस्कारही मिळाला. वाराणसीतील रविशंकर उपाध्याय मेमोरियल इन्स्टिट्यूटने त्यांना रविशंकर उपाध्याय मेमोरियल यूथ पोएट्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले