मुंबई : प्रतिनिधी : साने गुरुजींच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या राष्ट्र सेवा दलाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मराठवाड्यातील तरुण कार्यकर्ते अजित शिंदे यांची निवड झाली आहे. छात्र भारती विद्यार्थी संघटनेचे ते माजी अध्यक्ष आहेत. समाजवादी आणि आंबेडकरी चळवळीतील तरुण अभ्यासू कार्यकर्ता ही त्यांची ओळख आहे.(Rashtra Seva Dal)
ज्येष्ठ विचारवंत डॉ. ना. य. डोळे यांच्या वैचारिक स्कूलमधून तयार झालेले अजित शिंदे यांच्यामुळे सेवा दल आणि समाजवादी चळवळीतील सामाजिक आणि सांस्कृतिक बदलाचा नवा चेहरा पुढे आला आहे, अशा शब्दात मावळते अध्यक्ष, ज्येष्ठ सिनेनिर्माते नितीन वैद्य यांनी शिंदे यांच्या निवडीचे स्वागत केले आहे. (Rashtra Seva Dal)
देशभरातील विविध राज्यांच्या प्रतिनिधींनी सेवा दल मंडळाच्या ऑनलाईन बैठकीत एकमताने अजित शिंदे यांची निवड झाल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी आणि विश्वस्त अॅड. झाकीर अत्तार यांनी जाहीर केले. सेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त डॉ. झहीर काझी यांच्या मान्यतेनंतर अजित शिंदे यांनी पुणे येथील साने गुरुजी स्मारक या मुख्यालयात आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली. त्यावेळी डॉ. बाबा आमटे यांचे सहकारी सोमनाथ रोडे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे माधव बावगे, राष्ट्र सेवा दलाचे विश्वस्त अतुल देशमुख आणि छात्र भारतीचे माजी अध्यक्ष उपस्थित होते. (Rashtra Seva Dal)
अजित शिंदे यांच्या निवडीने राष्ट्र सेवा दलाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी एस. एम. जोशी, यदूनाथ थत्ते, डॉ. गणेश देवी ते नितीन वैद्य या परंपरेत प्रथमच सर्वाधिक तरुण नेतृत्वाला संधी मिळाली आहे. डॉ. बापूसाहेब काळदाते यांच्यानंतर प्रथमच मराठवाड्यातील कार्यकर्त्याकडे अध्यक्षपद गेलं आहे. सेवा दलाच्या उदगीर शाखेतील बाल सैनिक ते राष्ट्रीय अध्यक्ष असा अजित शिंदे यांचा प्रवास आहे.
राष्ट्र सेवा दलाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी पत्रकार, लेखक आणि चळवळींचे अभ्यासक राजा कांदळकर यांची निवड झाली आहे. अनेक अनुवादित आणि स्वलिखित पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. महाराष्ट्रातील सामाजिक चळवळींचे चिकित्सक अभ्यासक म्हणून कांदळकर यांच्याकडे पाहिले जाते.
हेही वाचा :