Pro Kabaddi : हैदराबाद : प्रो कबड्डीच्या ११व्या पर्वात मंगळवारी आणखी एक बरोबरीची लढत बघायला मिळाली. बंगाल वॉरियर्सने मध्यंतराच्या तीन गुणांच्या पिछाडीनंतर पुणेरी पलटनला ३२-३२ असे बरोबरीत रोखले. सामन्याच्या उत्तरार्धात सुशील कंबरेकरच्या वेगवान चढायांचा खेळ निर्णायक ठरला. पुणेरी पलटणकडून आकाश शिंदे आणि पंकज मोहिते या चढाईपटूंनी जोरदार प्रयत्न केले.
गच्चीबोवली क्रीडा संकुलात सुरु असलेल्या या लीगमध्ये सामन्याच्या पूर्वार्धात चढाई आणि बचावाच्या आघाडीवर सुरु असलेला खेळ उत्तरार्धात मात्र चढाईपटूंच्या कौशल्यावर अवलंबून राहिला. यातही मूळ कर्नाटकचा असलेल्या सुशीलने अवघ्या सहा चढाईत सुपर टेनची कामगिरी करताना बंगाल वॉरियर्सचे आव्हान कायम राखले होते. पुणेरी पलटणने उत्तरार्धात चौथ्याच मिनिटाला बंगालवर दुसरा लोण चढवून आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध करण्यास सुरुवात केली होती. मात्र, सुशीलच्या चढाया सुरु झाल्यावर पलटणचा बचाव खिळखिळा पडला. चढाईत अपयश येणाऱ्या अस्लम इनामदारने पकडी करताना चमक दाखवण्याचा प्रयत्न केला. पण, त्याला बचावातही फारसे यश आले नाही. यंदाच्या हंगामात प्रथमच खेळण्याची संधी मिळालेल्या आकाश शिंदेने मात्र ८ गुणांची कमाई करताना आपला पूर्ण वेळ सार्थ केला. त्याला पंकज मोहितने आठच गुणांची कमाई करत सुरेख साथ दिली. पूर्वार्धात चढाई आणि बचावात प्रत्येकी सहा गुण मिळविणाऱ्या दोन्ही संघांनी उत्तरार्धात चढाईत गुणांची वसूली केली. बंगालने १५, तर पलटणने ११ गुणांची कमाई केली. त्याचवेळी बचावात बंगालने ३, तर पलटणने ४ गुण कमावले.
उत्तरार्धात केवळ सुशीलच्या चढायांनी सामन्याचे चित्र बदलले. सामन्यात केवळ ८ चढाया करणाऱ्या सुशीलने दहा गुणांची कमाई करताना बंगालला एक लोण परतविण्याची संधी दिली. सामन्यातील पहिली आणि अखेरची दहा मिनिटे बंगालने मिळविलेली आघाडी निश्चितच त्यांच्यासाठी महत्वाची ठरली. पहिल्या दहा मिनिटात बंगाल ८-७ असे आघाडीवर होते, तर अखेरच्या दहा मिनिटांत बंगालने ८-४ अशी बाजी मारली होती. पिछाडीवर बंगालने विजयासाठी जरुर प्रयत्न केले. पण, त्यांना बरोबरीवर समाधान मानावे लागले. उत्तरार्धात सुशीलला विश्वासने चढाईत महत्वपूर्ण ४ गुण मिळवून सुरेख साथ केली. गौरव खत्री आज बचावात छाप पाडू शकला नाही. चढाईच्या आघाडीवर अस्लम इनामदार आणि मोहित गोयत यांना आलेले अपयश पलटणसाठी निश्चितच मारक ठरले.
सामन्याच्या पूर्वार्धात दोन्ही संघ समान ताकदीवर खेळत होते. सामन्याच्या सुरुवातीला गुणफलक १-१, २-२, ७-७ असा बरोबरीतच होता. बंगाल वॉरियर्सला या वेळी दोन अव्वल पकडींचा फायदा झाला होता. पुण्याकडून प्रथमच पूर्ण सामना खेळण्यासाठी निवड केलेल्या आकाश शिंदेच्या चढाया जोरदार झाल्या. या सामन्यातही पलटनला बचावाची सुरेख साथ मिळाली. फरक इतकाच होता की या वेळी मध्यरक्षक अबिनेश नंदराजन याने बंगालच्या चढाईपटूंची कोंडी केली होती. पूर्वार्धात दोन्ही संघांनी चढाई आणि बचावात प्रत्येकी ६ गुणांची कमाई केली होती. पलटणने मात्र एक लोण चढवत मध्यंतराला १५-१२ अशी आघाडी राखली होती.
हेही वाचा :