पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे टाकल्यावर ‘रेव्ह पार्टी हा शब्द ऐकायला मिळतो. अनेकदा ड्रग्स, दारू आणि बेकायदेशीर व्यवसायांचा रेव्हशी संबंध जोडला जातो. म्हणूनच रेव्हचा नेमका अर्थ समजून घेऊया. (Rave Party Trap)
-प्रतिनिधी
रेव्ह पार्टी म्हणजे डान्स डान्स पार्टी असते. मोकळ्या जागा, बंदिस्त मैदाने किंवा शेतघरे यांसारख्या ठिकाणी ती आयोजित केली जाते, जिथे नृत्य, संगीताचा जल्लोष असतो. परंतु ध्वनिमर्यादेपेक्षा अधिक आवाज, विनापरवाना दारू, ड्रग्सचा वापर आणि सुरक्षेच्या चिंतेमुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार रेव्ह पार्टीज बेकायदेशीर नाहीत. परंतु त्यांच्या आयोजनावर अनेक कायद्याने बंधने आहेत. स्थानिक कायद्यांचे पालन महत्त्वाचे असते. वेळ, ध्वनी मर्यादेचे पालन गरजेचे असते. मद्य परवाना आवश्यक असतो. अशा पार्टीमध्ये ड्रग्जचा वाप होतो, असे मानले जाते. त्यामुळेच रेव्ह पार्टी म्हटले की अनेकांचे कान टवकारतात. रेव्ह पार्टी म्हणजे काहीतरी प्रचंड अनैतिक बाब असते, असे काहीतरी चित्र निर्माण केले आहे. पूर्वी पोलीस खात्यातील काही स्टंटबाज अधिकाऱ्यांनी केलेल्या प्रसिद्धीमुळे रेव्ह म्हणजे ड्रग्ज असे समीकरण तयार झाले आहे. दारू, अंमली पदार्थांना जोडून अनैतिक व्यवहार येतात असे सर्वसाधारणपणे मानले जाते.(Rave Party Trap)
त्यामुळे पुण्यातील खराडी परिसरात एका हायप्रोफाइल रेव्ह पार्टीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने धाड टाकली, ही बातमी सनसनाटी निर्माण करणारी ठरली. या पार्टीमध्ये एकनाथ खडसे यांचे जावई सापडल्यामुळे ती ब्रेकिंग न्यूज बनली. किंबहुना ब्रेकिंग न्यूज बनवणाऱ्यांनाही माहीत होतं, की ही कारवाई म्हणजे खडसे यांच्या जावयावर पाळत ठेवून लावलेला ट्रॅप आहे. जेणेकरून एकनाथ खडसे यांचे तोंड बंद होईल आणि गिरीश महाजन यांना शांतता लाभेल.
ही रेव्ह पार्टी खराडीतील एका उच्चभ्रू निवासी भागातील एका हॉटेलच्या बंदिस्त खोलीत होती. ‘हाउस पार्टी’च्या नावाखाली ती आयोजित करण्यात आली होती. कारवाईत पोलिसांनी तीन ग्रॅमहून कमी कोकेन जप्त केले आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास केलेल्या कारवाईत गांजाही जप्त करण्यात आला आहे. एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर यांना अटक झाल्यामुळे ही एक सनसनाटी बातमी बनली.(Rave Party Trap)
या कारवाईसंदर्भात उलटसुलट मतप्रवाह आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणात गेले काही दिवस हनी ट्रॅपचा विषय चर्चेत आहे. त्यात गिरीश महाजन यांचे नाव संजय राऊत यांनी पुढे आणले आहे. प्रफुल्ल लोढा नामक एका व्यक्तिच्या संदर्भाने हे नाव पुढे आले. दरम्यान प्रफुल्ल लोढाला बलात्काराच्या गुन्ह्यांखाली अटक करण्यात आली आहे. आणि विधिमंडळ अधिवेशनाच्या काळात तो बाहेर पडू नये यासाठी सतत त्याला पद्धतशीरपणे अडकवण्यात आले. या लोढाकडे गिरीश महाजन यांच्याशी संबंधित सीडी असल्याचा एकनाथ खडसे यांचा दावा होता. तोच आपल्याला सीडी देणार होता. त्यामुळे त्यांनी ईडी आणली तर मी सीडी काढेन, अशी फुशारकी खडसे यांनी मारली होती. तो सगळाच फुसका बार ठरला. एकनाथ खडसे यांचे हसे झाले. मात्र गिरीश महाजन यांच्याशी संबंधित काहीही विषय आला की, एकनाथ खडसे त्यात उडी मारतात. हनी ट्रॅप प्रकरणानंतरही बरेच आरोप-प्रत्यारोप झाले. वातावरण ऐन पावसाळ्यात तापले. गिरीश महाजन म्हणजे महायुती सरकारचे किंबहुना देवेंद्र फडणवीस यांचे नाक. ते नाक कापण्याचा प्रयत्न अधुनमधून खडसे करतात. त्यांचा बंदोबस्त आवश्यक होता.(Rave Party Trap)
एकूण प्रकरण पाहिल्यानंतर लक्षात येते, की खडसेंच्या सगळ्या कुटुंबामागे पोलीस पथके ठेवली असणार. कोण कुठे सापडते हे पाहण्यासाठी. त्यात प्रांजल खेवलकर सापडले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार रेव्ह पार्टी होती. आता बंद खोलीत पाच-सहा लोक दारू पीत असतील तर त्याला रेव्ह पार्टी म्हणायचे का? अर्थात काही म्हटल्यामुळे फरक पडतो का, तर होय. रेव्ह पार्टी म्हटल्यावर गांभीर्य वाढते. लोकांना वाटते काहीतरी भयंकर सुरू होते. सोबत दोन तरुणीही होत्या.
पोलिसांनी ही कारवाई पहाटेच्यावेळी केलीय. म्हणजे रात्रभर कुठे कुठे दारू प्यायल्यानंतर पहाटेपासून उजाडेपर्यंत पिण्याची ही कसली उच्चभ्रू नशा असते, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडल्यावाचून राहात नाही. यातून काही गोष्टी समोर येतात. त्या समजून घ्यायला हव्यात.
आधी आपण प्रांजल खेवलकरांबाबत जाणू घेऊया,
प्रांजल खेवलकर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद्चंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांचे जावई आहेत. आता खडसे आणि पवारांच्या पक्षाचा तसा कितपत संबंध आहे… तर त्यांची हयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपमध्ये गेली. फडणवीसांना विरोध केल्यामुळे पक्षात बाजूला पडले. पवारांना वाटले असेल की फडणवीसांच्या विरोधात बोलायला एक माणूस मिळेल. परंतु तसे काही घडले नाही. गिरीश महाजनांचा विषय आल्याशिवाय त्यांनी कधी तोंड उघडले नाही. त्यांच्या सूनबाई रक्षा खडसे भाजपच्या खासदार आणि केंद्रात मंत्री आहेत. त्यांच्याविरोधात खडसे लोकसभा लढणार होते. ऐनवेळी नाही म्हणाले. पक्षाला लाज राखण्यासाठी उमेदवार शोधावा लागला आणि दारूण पराभव झाला. त्यावेळी खडसे यांनी आपण पुन्हा भाजपमध्ये जाणार असल्याची घोषणा केली. परंतु भाजपने त्यांना घेतलेच नाही. मग ते आहे तिथेच राहिले. (Rave Party Trap)
तर प्रांजल खेवलकर हे एकनाथ खडसे यांच्या दुसऱ्या कन्या रोहिणी खडसे-खेवलकर यांचे पती आहेत. गिरीश दयाराम चौधरी हे एकनाथराव खडसे यांचे मोठे जावई आहेत. ईडीच्या कारवाईत त्यांनीही तुरुंगवास भोगला आहे. प्रांजल खेवलकर हे एकनाथ खडसेंचे दुसरे जावई आहेत.
लिंक्ड इनवरील त्यांच्या प्रोफाइलनुसार त्यांनी भारती विद्यापीठातून एमडी ही वैद्यकीय क्षेत्रातील पदवी मिळवली आहे. साखर, वीज आणि रिअल इस्टेटपासून ते इव्हेंट मॅनेजमेंटपर्यंत त्यांनी अनेक क्षेत्रांमध्ये काम केले आहे. संत मुक्ताई शुगर अँड एनर्जी लिमिटेड ही त्यांची कंपनी ऊर्जा क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांपैकी ट्रॅव्हल माफिया या ट्रॅव्हल कंपनीचे ते कार्यकारी संचालक आहेत.
त्यांच्या सवयी, छंदांबाबत गिरीश महाजन यांच्या कंपूमध्ये माहिती असणार. त्यामुळेच पोलिसांकरवी त्यांच्यावर पाळत ठेवली असणार. आणि पाळत ठेवून ही कारवाई केली असणार. काहीवेळा अशा ठिकाणी अंमली पदार्थ नसतात. परंतु अशा ठिकाणी असलेल्या एखाद्या व्यक्तिला अडकवायचे असेल तर पोलिसच अंमली पदार्थ प्लँट करतात. कुणाच्यातरी खिशात, बॅगेत ठेवून देतात. कारण अंमली पदार्थांच्यासंबंधीचा कायदा कडक आहे. पोलिसांनी घेतलेली सुपारी निभावलेली असते. पुढे त्या केसचे काय होते किंवा होईल याच्याशी कुणालाच देणेघेणे नसते. तेवढ्या वेळेपुरती कारवाई झाली. अनेक दिवस तुरुंगात अडकवले आणि आपले मिशन सक्सेस झाले एवढ्यापुरतेच ते मर्यादित असते. त्यामुळे ही कारवाई म्हणजे खडसे यांच्या जावयाला अडकवण्यासाठी होती, याबद्दल कुणाच्या मनात शंका नाही. नसावी. प्रांजल खेवलकर हे प्यादे आहेत. मूळ टार्गेट एकनाथ खडसे आहेत. आता या कारवाईमुळे एकनाथ खडसे किंवा रोहिणी खडसे यांना सरकारला किंवा सरकारमधील कुणा व्यक्तिला उपदेश करता येणे कठीण आहे.
हा झाला एक भाग.
दुसरी गोष्ट प्रांजल खेवलकर यांची. एमडी डॉक्टर असलेले. अनेक कंपन्यांचे संचालक, कार्यकारी संचालक असलेले प्रज्वल खेवलकर यांची ऊठबस खरेतर वेगळ्या वर्तुळात असायला पाहिजे. उद्योग, राजकारण, समाजकारण या क्षेत्रात वावर असायला पाहिजे. परंतु त्यांच्यासोबत पकडलेल्या लोकांची माहिती बघितली तर किती थुकरट लोकांच्यात त्यांची ऊठबस होती हे लक्षात येते. परस्परांचे नेमके कनेक्शन काय आहे, हे अजून उघड झालेले नाही. ते यथावकाश होईल. आता व्यावसायिक स्वरुपाची ही बैठक असेल तर ती मध्यरात्री बाकीचे पब बंद झाल्यानंतर पुन्हा नव्या ठिकाणी करण्याची एवढी गरज काय होती? व्यवसायासाठी अहोरात्र कष्ट घेणाऱ्या प्रांजल खेवलकर यांनी विधानसभा निवडणुकीत याच्या काही अंशी कष्ट घेतले असते तरी रोहिणी खडसे निवडून आल्या असत्या असं म्हणतात.
एकूणच ही कारवाई बनावट स्वरुपाची आहे, यात कोणतीही शंका नाही. पण ती कारवाई ओढवून घेणारे प्रांजल खेवलकर आणि कंपनी पहाटे एवढे कसले देशकार्य करीत होते.. हा प्रश्न उरतोच.