मुंबई : प्रतिनिधी : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी शनिवारी (दि. ७) मतदान होत असून जिल्हा परिषदेच्या ७३१; तर आणि पंचायत समित्यांच्या १ हजार ४६२ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. एकूण ७ हजार ४३८ इतके उमेदवार रिंगणात असून एकूण २ कोटी ८ लाख २० हजार ७०२ इतकी मतदार संख्या आहे. संपूर्ण मतदान प्रक्रियेसाठी पुरेशा पोलिस बंदोबस्ताचीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे. (Voting for Zilla Parishad on Saturday)
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने १३ जानेवारीला केली होती. त्यानुसार ५ फेब्रुवारी मतदान होणार होते; परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर झाल्याने मतदान ७ फेब्रुवारी घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आता उद्या सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होणार आहे. मतमोजणी ९ फेब्रुवारी सकाळी १० वाजता सुरू होईल.
एकूण जागा आणि उमेदवार सर्व बारा जिल्हा परिषदांच्या एकूण ७३१ जागा असून, त्यातील ३६९ जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जातींसाठी ८३, अनुसूचित जमातींसाठी २५ आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी १९१ जागा आरक्षित आहेत. जिल्हा परिषदांच्या या सर्व जागांसाठी एकूण २ हजार ६२४ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. सर्व १२५ पंचायत समित्या मिळून एकूण १ हजार ४६२जागा असून, त्यातील ७३१ जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जातींसाठी १६६, अनुसूचित जमातींसाठी ३८ आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी ३४२ जागा आरक्षित आहेत. पंचायत समित्यांच्या या सर्व जागांसाठी एकूण ४ हजार ८१४ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. (Voting for Zilla Parishad on Saturday)
निवडणूक होत असलेल्या जिल्हा परिषदांच्या व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या एकूण मतदारांमध्ये १कोटी ६ लाख ३३ हजार २६९ पुरुष, १ कोटी १ लाख ८६ हजार ९६५ महिला; तर ४६८ इतर मतदारांचा समावेश आहे. त्यांच्यासाठी एकूण २५ हजार ४७१ मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण मतदान प्रक्रियेसाठी सुमारे १ लाख २८ हजार इतक्या मनुष्यबळाची व्यवस्था केली आहे. त्यात सुमारे १२५ निवडणूक निर्णय अधिकारी आणि १२५ सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. (Voting for Zilla Parishad on Saturday)
———–
ईव्हीएमची व्यवस्था
जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठीच्या २५ हजार ४७१ मतदान केंद्रांची संख्या लक्षात घेऊन पुरेशा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची (ईव्हीएम) व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात ५१ हजार ५३७ कंट्रोल युनिट आणि १ लाख १० हजार ३२९ बॅलेट युनिटचा समावेश आहे. त्यासाठी सर्व सबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना वेळोवेळी प्रशिक्षणदेखील देण्यात आले आहे.
दोन मते देणे अपेक्षित
जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका नेहमी एकाच वेळी घेण्यात येतात. त्यामुळे प्रत्येक मतदाराला एक मत जिल्हा परिषदेच्या निवडणूक विभागासाठी आणि एक मत पंचायत समितीच्या निर्वाचक गणासाठी द्यावे लागते.