कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर , सांगली व सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी चालू वर्षीच्या ऊस आंदोलनात स्वाभिमानीने केलेल्या ३५०० रूपयाची मागणी मान्य करून गळीत हंगाम चालू केला आहे. मात्र चंदगड , आजरा व गडहिंग्लज तालुक्यातील पाच कारखान्यांनी संघटित होवून ३४०० रूपये जाहीर केलेली उचल मान्य नसल्याने ओलम कारखान्यावर कालपासून गळीत हंगाम बंद ठेवून बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. आज ओलम कारखाना व्यवस्थापनाने स्वाभिमानीच्या आंदोलकांची मागणी करत पहिली उचल ३५०० रूपये जाहीर केली. (Olam Sugar)
यंदाच्या ऊस हंगामात इको केन , दौलत , ओलम , आजरा साखर कारखाना व आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज या कारखान्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दबावास बळी पडून ३४०० रूपये पहिली उचल जाहीर करून आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न करत होते. स्वाभिमानीचे राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १५ दिवसापासून तीनही तालुक्यात रान पेटवून कालपासून ओलम कारखान्यावर ठिय्या आंदोलन सुरू केले होते. दोन दिवसात हजारो शेतक-यांच्या दबावाने कारखान्याचा गळीत हंगाम बंद पडलेला होता. (Olam Sugar)
त्याबरोबरच तीनही तालुक्यातील कारखानदार व लोकप्रतिनिधींच्या आडमुठ्या भूमिकेमुळे ओलम प्रशासन हतबल झाले होते. शेवटी स्वाभिमानीच्या रेट्यामुळे ओलम प्रशासनास ३५०० रूपये पहिली उचल देण्यास भाग पडले. सायंकाळी सहा वाजता कारखाना प्रशासनाने लेखी पत्र दिल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेऊन गळीतास कालपासून थांबून राहिलेली वाहने कारखान्यावर आणण्यात आली. यावेळी कर्नाटकाचे माजी मंत्री शशिकांत नाईक , काडसिध्देश्वर स्वामी , राजेंद्र गड्यान्नावर , कर्नाटक रयत संघाचे पदाधिकारी यांचेसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तीनही तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते. (Olam Sugar)