पॅरिस : भारताचा ऑलिंपिक सुवर्णपदकविजेता भालाफेकपटू नीरज चोप्राने पॅरिस डायमंड लीग स्पर्धेमध्ये भालाफेकीत विजेतेपद पटकावले. त्याने ८८.१६ मीटरची फेक केली. ९० मीटरचा टप्पा ओलांडण्यात मात्र त्याला अपयश आले. (Neeraj Chopra)
नीरजचे हे यंदाच्या मोसमातील पहिलेच विजेतेपद ठरले. त्याने जर्मनीच्या ज्युलियन वेबरला मागे टाकले. वेबरने मागील मोसमात दोहा आणि पोलंड येथील स्पर्धांमध्ये विजेतेपद पटकावले होते. तो ८७.८८ मीटर फेक करून दुसऱ्या स्थानावर राहिला. ब्राझीलच्या लुइझ मॉरिसिओ डा सिल्वाने ८६.६२ मीटर फेक करून तिसरे स्थान पटकावले. नीरजने मागील महिन्यात दोहामध्ये ९०.२३ मीटरची फेक करून नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता. मात्र, त्या कामगिरीची पुनरावृत्ती २७ वर्षीय नीरजला पॅरिसमध्ये करता आली नाही. नीरज तब्बल आठ वर्षांनी पॅरिस लीगमध्ये सहभागी झाला होता. यापूर्वी, २०१७ मध्ये तो सहभागी झाला होता. त्यावेळी, ८४.६७ मी. फेक केल्यामुळे त्याला आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. (Neeraj Chopra)
यावेळी, नीरजने पहिल्या फेकीत ८८.१६ मी.चे अंतर नोंदवले. दुसऱ्या फेकीत तो ८५.१० मी. पर्यंतच पोहोचू शकला. त्याची तिसरी, चौथी व पाचवी फेक फाउल ठरली. सहाव्या फेकीमध्ये त्याने ८२.८९ मी. इतके अंतर नोंदवले. यानंतर, नीरज २४ जूनपासून चेक प्रजासत्ताकमधील ऑस्ट्रेव्हा येथे रंगणाऱ्या गोल्डन स्पाइक ॲथलेटिक्स स्पर्धेत सहभागी होणार आहे. (Neeraj Chopra)
हेही वाचा :
भारताची धावसंख्या साडेचारशेपार; पंतचे शतक
बांगलादेश-श्रीलंका कसोटी अनिर्णित