नागपूर; विशेष प्रतिनिधी : बीड आणि परभणी जिल्ह्यात झालेल्या हिंसाचार आणि पोलिसी अत्याचाराच्या घटनांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या मुद्द्यावरून नागपुरात सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनात गेल्या चार दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने हा विषय लावून धरला असताना शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली. बीड जिल्ह्यातील हत्या प्रकरणाचा न्यायालयीन व एसआयटीकडून दुहेरी तपास करण्यात येईल. बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांसह परभणीतील घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा लाखांची मदत देण्यात येणार आहे. (CM Devendra Fadnavis)
बीड प्रकरणात जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची तत्काळ बदली करण्यात येणार आहे. परभणीचे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांना निलंबित करण्यात येणार आहे. त्यांनी पोलिस बळाचा अतिरेक केला का, याचा तपास केला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.
बीड आणि परभणी येथील घटनेबाबत विधानसभेत झालेल्या संक्षिप्त चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, परभणी जिल्ह्यातील घटना अत्यंत दुर्दैवी आहे. भारतीय राज्यघटनेचा अपमान हा सर्व भारतीयांचा अपमान आहे. त्यामुळे हा अपमान सहन केला जाणार नाही. हे कृत्य परभणीत एका मनोरुग्णाने केले. तो मनोरुग्ण असल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले आहे. अशा स्थितीत सर्वच राजकीय पक्ष तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करतील, अशी अपेक्षा आहे. या प्रकरणात कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले नाही. मात्र पोलिसांनी अवाजवी बळाचा वापर केला का, याचा तपास केला जाईल. पोलीस अधिकारी अशोक घोरबांड यांना निलंबित करून हा तपास केला जाणार आहे. परभणीत समन्यायी हिंदू समाज मोर्चा हे सर्वपक्षीय आंदोलन होते. या मोर्चात बांगलादेशातील हिंदूंबाबत मागण्या करण्यात आल्या. त्यामुळे ही हिंदू विरुद्ध दलित दंगल नाही. परभणीमध्ये झालेल्या तोडफोडीत दुकाने, वाहने, शासकीय कार्यालयांचे नुकसान झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (CM Devendra Fadnavis)
बीडमधील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मोहीम राबविण्यात येणार असून तपासात जो दोषी आढळेल, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. आवडा ग्रीन एनर्जी कंपनीने बीडमध्ये गुंतवणूक केली आहे. एकतर आम्हाला या कंपनीचे काम द्या किंवा खंडणी द्या, अशी मानसिकता काही लोकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे बीड प्रकरणाचा सूत्रधार जो कोणी असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल. या प्रकरणात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहभागी असलेल्यांवरही मोक्का अंतर्गत कारवाई केली जाईल. बीड जिल्हा पोलिसांनीही योग्य ती कारवाई करावी. गुन्हा नोंदवताना वस्तुस्थिती तपासली पाहिजे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
हेही वाचा :