इंडियन वेल्स : रशियाची १७ वर्षीय टेनिसपटू मिरा अँड्रिव्हाने इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत तिने जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असणाऱ्या बेलारुसच्या आर्यना सबालेंकाचा तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीमध्ये २-६, ६-४, ६-३ असा पराभव केला. दरम्यान, या स्पर्धेच्या पुरुष एकेरीमध्ये, ब्रिटनच्या जॅक ड्रेपरने डेन्मार्कच्या हॉल्गर रुनला ६-२, ६-२ असे सहज नमवून विजेतेपद पटकावले. (Indian Wells)
अँड्रिव्हाला या स्पर्धेत नववे मानांकन होते, तर सबालेंका अग्रमानांकित होती. अँड्रिव्हाने उपांत्य फेरीत गतविजेत्या इगा स्वियातेकला पराभूत केल्यामुळे तिच्याकडून अपेक्षा उंचावल्या होत्या. अंतिम फेरीत सबालेंकाला पराभूत करून अँड्रिव्हाने आणखी एक धक्कादायक निकाल नोंदवला. अँड्रिव्हा ही या स्पर्धेच्या महिला एकेरीमध्ये मागील २५ वर्षांतील सर्वांत युवा विजेती ठरली. यापूर्वी, १९९९ मध्ये अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने वयाच्या १७ व्या वर्षी या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. (Indian Wells)
अँड्रिव्हा-सबालेंका यांच्यातील अंतिम सामना तब्बल २ तास ४ मिनिटे रंगला. यापूर्वी, या दोघींमध्ये चारही सामने सबालेंकाने जिंकले होते. यावेळीही अंतिम सामन्यातील पहिला सेट ६-२ असा जिंकून सबालेंकाने दमदार सुरुवात केली. दुसऱ्या सेटमध्ये अँड्रिव्हाने आपला खेळ उंचावला. या सेटच्या तिसऱ्या गेममध्ये तिने सबालेंकाची सर्व्हिस भेदली आणि सहाव्या गेममध्ये दोन ब्रेक पॉइंटही वाचवले. हा सेट ६-४ असा जिंकून अँड्रिव्हाने सामन्यात बरोबरी साधली. पाठोपाठ तिसरा सेट ६-३ असा जिंकून अँड्रिव्हाने विजयावर शिक्कामोर्तब केले. (Indian Wells)
पुरुष एकेरीची अंतिम लढत तुलनेने एकतर्फी झाली. ड्रेपर आणि रून या दोघांनीही प्रथमच या स्पर्धेची अंतिम फेरी गाठल्याने नवा विजेता मिळणार हे निश्चित होते. त्यामध्ये २३ वर्षीय ड्रेपरने १ तास ९ मिनिटांमध्ये बाजी मारली. उपांत्य फेरीत ड्रेपरने गतविजेत्या कार्लोस अल्कारेझला, तर रूनने डॅनिल मेदवेदेवला हरवले होते. त्यामुळे अंतिम सामना चुरशीचा होईल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र, रूनला पराभूत करण्यासाठी ड्रेपरला फारसा घाम गाळावा लागला नाही. या विजेतेपदामुळे ड्रेपर जागतिक क्रमवारीत पहिल्या दहामध्ये झेप घेणार असून नव्या क्रमवारीत तो सातव्या स्थानापर्यंत पोहोचेल. (Indian Wells)
हेही वाचा :
दुखापतग्रस्त उमरानऐवजी साकारियाची निवड
परदेश दौऱ्यांमध्ये कुटुंबीय हवेतच!