लिमा : भारताच्या सुरुची सिंहने आयएसएसएफ नेमबाजी वर्ल्ड कपमध्ये १० मीटर एअर पिस्टल प्रकारामध्ये महिला गटात सुवर्णपदक पटकावले. या गटात तिने अंतिम फेरीमध्ये दोन ऑलिंपिकपदकविजेत्या भारताच्याच मनू भाकेरचा पराभव केला. त्यामुळे मनूला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. दरम्यान, या प्रकारात पुरुष गटामध्ये भारताच्या सौरभ चौधरीने ब्राँझपदक जिंकले. (Suruchi Singh)
सुरुचीचे हे एका आठवड्याच्या अंतरातील दुसरे सुवर्णपदक आहे. मागील आठवड्यामध्ये अर्जेंटिनामध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये ती या प्रकारामध्ये सुवर्णपदक विजेती ठरली होती. पेरू देशातील लिमा येथे सुरू असलेल्या वर्ल्ड कपमध्ये बुधवारी सुरुची प्राथमिक फेरीअखेर ५८२ गुणांसह तिसऱ्या स्थानी होती. या फेरीत चीनच्या क्विआनशुन याओने ५८६ गुणांसह अग्रस्थान पटकावले, तर मनू भाकेर ५७८ गुणांसह सहाव्या स्थानावर राहिली. भारताची सुरभी राव ५७७ गुण मिळवून नवव्या स्थानी राहिल्याने तिचा अंतिम फेरीतील प्रवेश थोडक्यात हुकला. (Suruchi Singh)
अंतिम फेरीतील पहिल्या टप्प्यामध्येही सुरुची १०१.३ गुण मिळवून तिसऱ्या स्थानी होती, तर मनू ९९.९ गुणांसह चौथ्या स्थानी होती. दुसऱ्या एलिमिनेशन टप्प्यामध्येही सुरुची व मनू यांनी चीनच्या नेमबाजांपेक्षा सरस कामगिरी केली. अखेरच्या शॉट्सपूर्वी सुरुचीकडे मनूपेक्षा केवळ ०.७ गुणांची आघाडी होती. मात्र अखेरच्या शॉट्समध्ये सुरुचीने १०.१, ९.७ गुण मिळवले, तर मनूला १०.०, ९.२ असे गुण मिळवता आले. त्यामुळे सुरुचीने मनूला १.३ गुणांनी मागे टाकत २४३.६ गुणांसह सुवर्णपदकावर नाव कोरले. मनूने २४२.३ गुणांसह रौप्य, तर क्विआनशुनने २१९.५ गुणांसह ब्राँझपदक मिळवले. (Suruchi Singh)
पुरुषांच्या १० मी. एअर पिस्टलमध्ये सौरभला प्राथमिक फेरीत ५७८ गुणांपर्यंतच मजल मारता आल्यामुळे तो सातव्या स्थानी होता. या गटात चीनच्या काई हूने ५८६ गुणांसह अग्रस्थान मिळवले होते. भारताचा वरुण तोमरही ५७६ गुण मिळवून अंतिम फेरीसाठी पात्र ठरला होता. अंतिम फेरीत सौरभने २१९.१ गुणांची कमाई करत तिसऱ्या स्थानी झेप घेऊन ब्राँझपदक निश्चित केले. वरुण १९८.१ गुणांसह चौथ्या स्थानावर राहिला. चीनच्या काई हूने २४६.४ गुण मिळवून सुवर्णपदक जिंकले, तर ब्राझीलचा फिलिप अल्मेडा वू २४१ गुणांसह रौप्यपदकाचा मानकरी ठरला. या कामगिरीमुळे पहिल्या दिवसअखेर भारताच्या खात्यात तीन पदके झाली असून पदकतालिकेत भारत अग्रस्थानी आहे. (Suruchi Singh)
हेही वाचा :
पंजाब किंग्जचा राजेशाही विजय
झाम्पाच्या जागी स्मारनची निवड