प्रा. डॉ. पी. एस. कांबळे : डॉ. मनमोहन सिंग हे भारताच्या समावेशक विकासासाठीच्या धोरणांमधील महत्त्वाचे शिल्पकार मानले जातात. अर्थतज्ज्ञ, योजना आखणी आणि धोरणनिर्मितीत तज्ज्ञ असलेल्या डॉ. सिंग यांनी पंतप्रधान तसेच केंद्रीय अर्थमंत्री म्हणून देशाच्या प्रगतीत मोलाचे योगदान दिले. त्यांच्या कार्याचा प्रभाव भारताच्या आर्थिक सुधारणांपासून ते सामाजिक न्यायाच्या क्षेत्रापर्यंत दिसून येतो. ते उच्च विद्याविभूषित होते. त्यांना विकासपुरुष म्हटले तर वावगे ठरणार नाही.(manmohan singh)
त्यांनी विकास प्रक्रिया सर्वंकष आणि गतिमान करण्यासाठी योगदान देणाऱ्या अनेक संस्था आणि व्यासपीठांवर भरीव काम केले आहे. त्यात देशाचे पंतप्रधान म्हणून १० वर्षे, राज्यसभा सदस्य ३० वर्षे, अर्थमंत्री, पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार, नियोजन मंडळ उपाध्यक्ष, रिजर्व बँक गव्हर्नर, सदस्य सचिव नियोजन मंडळ, सचिव वित्त मंत्रालय, मुख्य सल्लागार वित्त मंत्रालय, UNCTAD न्यूयॉर्क, अणुउर्जा आयोग आदींचा समावेश आहे. (manmohan singh)
आर्थिक सुधारणा
आर्थिक सुधारणा कार्यक्रमांतून आर्थिक विकास गतिमान करण्याचा प्रयत्न डॉ. मनमोहन सिंग यांनी केला. त्यालाच नवीन आर्थिक धोरण असे म्हटले जाते. १९९१ साली, भारताचे अर्थमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला, तेव्हा देश आर्थिक संकटात होता. परकीय गंगाजळी संपण्याच्या स्थितीत भारत होता. त्यांनी अनेक आर्थिक सुधारणा राबवल्या. उदारीकरण धोरणाचा भाग म्हणून १९९१ साली त्यांनी जागतिक बँक आणि आयएमएफच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक सुधारणांचे उदारीकरण धोरण आणले. यातून परकीय गुंतवणुकीस प्रोत्साहन देणे, परवाना राजव्यवस्था (License Raj) संपवणे आणि खासगीकरणास चालना देणे हे उद्दिष्ट होते. त्यांनी परकीय व्यापारात उदारीकरण घडवून आणताना आयात-निर्यात धोरणांत शिथिलता आणून भारताचा जागतिक व्यापारात सहभाग वाढवला. गुंतवणूक धोरणातील सुधारणा करताना परकीय गुंतवणूकदारांसाठी नियम सोपे करून नवीन तंत्रज्ञान आणि निधी भारतात आणला. आर्थिक स्थैर्य आणि जागतिकीकरण साध्य करण्यासाठी डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली भारताने जागतिक स्तरावर आपले स्थान मजबूत केले. भारत-आसियान मुक्त व्यापार करार करून दक्षिण आशियायी देशांशी व्यापारवाढीस चालना दिली. जागतिक मंचांवरील नेतृत्व निर्माण करताना जी२०, ब्रिक्स आणि अन्य मंचांवर भारताचा दबदबा निर्माण केला.(manmohan singh)
संशोधनाला प्रोत्साहन
विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगती साध्य करताना आंतरिक्ष संशोधनास प्रोत्साहन दिले. इस्रोच्या प्रकल्पांना निधी वाढवून तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीला चालना दिली. डिजिटल इंडिया उपक्रमांना सुरुवात सुरवात करताना माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकासाच्या संधी उपलब्ध केल्या. एका बाजूने आर्थिक विकास व्यापक आणि गतिमान करण्यासाठी आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम राबविला. तर दुसऱ्या बाजूने आर्थिक सुधारणांचे प्रतिकूल परिणाम नियंत्रित करण्यासाठी सामाजिक समावेशक विकासाच्या आणि महत्तम कल्याणाच्या अनेक उपाय आणि धोरणेही राबविण्याचा प्रयत्न केला.
समावेशक विकास
नवीन आर्थिक धोरणाच्या अंमलबजावणीतून निर्माण होणाऱ्या प्रतिकूल परिणामांची जाणीव त्यांना होती. म्हणून त्यांनी सामाजिक समावेशक आणि कल्याणवृद्धीचे उपाय आणि कार्यक्रम राबविले. पंतप्रधान म्हणून २००४ ते २०१४ या काळात डॉ. सिंग यांनी विकासातील समावेशकता आणि ग्रामीण आणि शहरी क्षेत्रांतील तफावत कमी करण्यासाठी विविध उपक्रम राबवले. मनरेगा (MGNREGA) योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात रोजगार हमी मिळवून देवून गरिबी कमी करण्याचा उद्देश ठेवला. यामुळे ग्रामीण लोकसंख्येच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा झाली. शिक्षण हक्क अधिनियमाच्या माध्यमातून प्रत्येक मुलाला मोफत व सक्तीचे शिक्षण मिळावे, यासाठी २००९ साली कायदा लागू केला. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातून (NRHM) ग्रामीण आरोग्य सुविधांच्या विस्तारासाठी महत्त्वाची योजना सुरु केली. खाद्य सुरक्षा योजनेतून देशातील गोरगरीब लोकसंख्येस अन्न सुरक्षा पुरविण्याचा प्रयत्न करण्यात आला. गरिबी निर्मूलन व सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी डॉ. सिंग यांनी आर्थिक धोरणांद्वारे देशातील गरिबीची समस्या सोडवण्यावर भर दिला. त्यांच्या नेतृत्वाखाली गरीबी रेषेखालील लोकसंख्येत घट झाली. अनुसूचित जाती-जमाती, महिलांसाठी विविध सक्षमीकरण योजना राबवल्या.(manmohan singh )
शिवाजी विद्यापीठाशी ऋणानुबंध
डॉ. मनमोहन सिंग आणि कोल्हापूर यांचे अत्यंत जवळचे नाते होते. विशेषः अर्थशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांचे आपलुकीचे, जिव्हाळ्याचे संस्मरणीय संबध होते. शिवाजी विद्यापीठाची स्थापना १९६२ मध्ये झाल्यानंतर लगेचच अर्थशास्त्र विभाग सुरु करण्यात आला. या विभागाचे कामकाज सुरवातीला भवानी मंडपातील राजाराम हायस्कूलमध्ये आणि नंतर राजाराम कॉलेजमध्ये चालत असे. त्या काळात डॉ. मनमोहन सिंग अर्थशास्त्र विभागात व्हीजिटिंग टिचिंग फॅकल्टी म्हणून ते येत असत. प्रामुख्याने ते दिवाळीच्या सुट्टीत येत असत आणि Monetary Theory (मौद्रिक सिद्धांत), Research Methodology (संशोधन पद्धती) हे विषय अत्यंत सुंदररित्या आणि विद्यार्थ्यांना सहभागी करून ते शिकवत असत. असे ते बरीच वर्षे अर्थशास्त्र विभागाशी जोडले होते. त्यानंतर जवळपास दहा वर्षांनी डॉ. मनमोहन सिंग यांना इचलकरंजी येथील फाय फौंडेशनचा पुरस्कार मिळाला होता, तो स्वीकारण्यास ते येथे आले होते.
डॉ. मनमोहन सिंग यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेला आधुनिकतेकडे नेणाऱ्या धोरणांची आखणी केली. त्यांनी देशाच्या समावेशक विकासावर भर देत, गरिबांसाठी विविध योजना राबवल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने जागतिक पातळीवर प्रगती साधली, मात्र त्यांचे कार्य काही आव्हानांनीही ग्रासले. डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर आर्थिक सुधारणांमुळे सामाजिक विषमता वाढल्याची टीका झाली. तरीही, त्यांच्या योगदानामुळे भारताचा विकास दर व सामाजिक न्याय यामध्ये सकारात्मक बदल घडवता आला.
हेही वाचा :