मुंबई : भागवत संघाचे नेतृत्व करतात हिंदू धर्माचे नाही, अशी टिप्पणी अध्यात्मिक नेते स्वामी रामभद्राचार्य यांनी केली. मंदिर-मशीद वादाबाबत भागवत यांनी व्यक्त केलेले विचार वैयक्तिक होते. ते हिंदू धर्माचे प्रतिनिधीत्व नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (rambhdracharya)
भूतकाळाच्या ओझ्यातून द्वेष, आकस व संशयापोटी रोज एक नवीन प्रकरण उकरून काढणे चालणारे नाही, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी पुण्यात बोलताना काढले होते. “स्वतःला हिंदूंचे नेते म्हणवून घेण्यासाठी काही व्यक्ती मंदिरे आणि मशिदीचे प्रश्न उपस्थित करतात,” अशी टिप्पणीही भागवत यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर स्वामी रामभद्राचार्य यांनी हे महत्त्वपूर्ण विधान केले.
स्वामी रामभद्राचार्य म्हणाले, “ भागवत यांचे ते वैयक्तिक मत असू शकते. आमचा त्या विधानाशी काहीही संबंध नाही. ते संघाचे नेतृत्व करू शकतात, पण हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व करत नाहीत. आमचे लक्ष्य श्रद्धेबाबतची शिस्त आणि सत्य हे आहे. जिथे जिथे प्राचीन हिंदू मंदिर असल्याचे स्पष्ट होईल, तिथे आम्ही त्यांच्या जीर्णोद्धारासाठी काम करू. ही काही नवी कल्पना नाही तर आपल्या सांस्कृतिक आणि धार्मिक संवर्धनाचा तो एक भाग आहे.” (rambhdracharya)
मुंबईतील कांदिवलीच्या ठाकूर व्हिलेजमध्ये झालेल्या रामकथेच्या भव्य कार्यक्रमादरम्यान रामभद्राचार्य यांनी हे भाष्य केले. स्वामी रामभद्राचार्य यांच्या नेतृत्वाखाली सात दिवस चालणाऱ्या या अध्यात्मिक प्रवचनाचा उद्देश भक्तांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणणे हा आहे.
उत्तर प्रदेशातील संभल येथे नुकत्याच झालेल्या हिंसाचारावरही रामभद्राचार्य यांनी भाष्य केले. तेथे झालेली जीवितहानी दुःखद असल्याचे सांगून त्यांनी हिंदूंनी संघटित राहण्याची गरज व्यक्त केली. बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांच्या छळावर त्यांनी भारत सरकारला कठोर पावले उचलण्याची विनंती केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंबंधी कठोर भूमिका घेतली पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
प्रयागराजमधील आगामी कुंभमेळा होत आहे. त्याबद्दल आनंद व्यक्त करताना रामभद्राचार्य यांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले. ‘‘महा कुंभमेळा आपल्या समृद्ध संस्कृतीचे प्रतीक आहे आणि आध्यात्मिक मूल्यांना त्यामुळे प्रोत्साहन मिळते,’’ असे ते म्हणाले.