जम्मू : जम्मू आणि काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील चासोती गावात गुरुवारी झालेल्या मोठ्या ढगफुटीत ३८ जणांचा मृत्यू झाला आणि मोठे नुकसान झाले, असे वृत्त ‘पीटीआय’ने दिले आहे. (Cloudburst)
मृतांचा आकडा वाढू शकतो, अशी शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. आतापर्यंत ९८ जणांना वाचवण्यात आले आहे आणि अनेक जणांची प्रकृती अजूनही गंभीर आहे.
माचैल माता मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहन जाण्यायोग्य असलेल्या चासोती या ठिकाणी दुपारी १२ ते १ च्या दरम्यान ही दुर्घटना घडली. वार्षिक यात्रेसाठी अनेक भाविक जमले होते. (Cloudburst)
किश्तवाडपासून सुमारे ९० किमी अंतरावर असलेल्या चासोती येथून यात्रेकरू मंदिराकडे जाण्यासाठी ८.५ किमीचे अंतर पार करावे लागते.
ढगफुटीमुळे आलेल्या अचानक आलेल्या पुराचा फटका भाविकांसाठी उभारलेल्या ‘लंगर’ला बसला.
‘‘चासोती परिसरात मोठी ढगफुटी झाली. त्यामुळे मोठी जीवितहानी झाली आहे. प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले आहे, बचाव पथक घटनास्थळी रवाना झाले आहे,’’ असे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे. (Cloudburst)
एनडीआरएफकडून बचाव आणि पुनर्वसनाचे काम सुरू
उधमपूर येथून एनडीआरएफच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. नागरी, पोलिस, लष्कर आणि एसडीआरएफचे कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले आहेत. किश्तवाडचे उपायुक्त पंकज कुमार शर्मा यांनी, ‘‘या परिसरात मोठ्या प्रमाणात बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे,’’ असे सांगितले. अधिकाऱ्यांचा अंदाज आहे की बचाव, मदत आणि पुनर्वसनाचे काम जवळपास २० दिवस चालेल.