नवी दिल्ली : भारताचा दोन ऑलिंपिक पदकविजेत्या हॉकी संघांचा सदस्य असणारा हॉकीपटू ललित उपाध्यायने सोमवारी (२३ जून) आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्ती जाहीर केली. प्रो-हॉकी लीग स्पर्धेच्या अखेरच्या सामन्यात भारताने बेल्जियमविरुद्ध विजय मिळवल्यानंतर ललितने दशकभराच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला पूर्णविराम दिला. (Lalit Upadhyay)
भारतीय संघात मिडफिल्डर आणि फॉरवर्ड या स्थानांवर खेळणाऱ्या ३१ वर्षीय ललितने २०१४ मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. ११ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये ललितने १८३ सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना ६७ गोल नोंदवले. २०२० च्या टोकियो ऑलिंपक आणि २०२४ च्या पॅरिस ऑलिंपकमध्ये ब्राँझपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा तो सदस्य होता. भारताने २०१८ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत रौप्य, २०१८ व २०२२च्या आशियाई स्पर्धेत अनुक्रमे ब्राँझ व सुवर्णपदक जिंकण्यातही त्याची महत्त्वाची भूमिका होती. त्याला २०२१ मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. २०२२ मध्ये उत्तरप्रदेश सरकारने त्याची पोलिस उपाधीक्षक पदावर नियुक्ती केली होती. (Lalit Upadhyay)
ललितने एक्स अकाउंटवरून (ट्विटर) निवृत्तीची घोषणा केली. “आंतरराष्ट्रीय हॉकीमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करता येणे हा माझ्याकरिता सर्वोच्च सन्मान होता. निवृत्तीचा निर्णय कठीण असला, तरी प्रत्येक खेळाडूला एक ना एक दिवस हा निर्णय घ्यावाच लागतो. सर्वांचे आभार,” असे ललितने या पोस्टमध्ये म्हटले आहे. (Lalit Upadhyay)
सलग सात पराभवांनंतर भारताचा विजय
प्रो-हॉकी लीग स्पर्धेत भारताने सलग सात पराभवांनंतर अखेर बेल्जियमविरुद्ध ४-३ असा विजय मिळवून शेवट गोड केला. स्पर्धेच्या या चक्रामधील भारताचा हा अखेरचा सामना होता. जागतिक क्रमवारीत बेल्जियम तिसऱ्या, तर भारत आठव्या स्थानावर आहे. दोन्ही संघांमध्ये शनिवारी झालेला पहिला सामना बेल्जियमने ६-३ असा जिंकला होता. दुसऱ्या सामन्यात मात्र भारताने सरस खेळ केला. भारताकडून सुखजीत सिंगने या सामन्यात दोन गोल नोंदवले. याशिवाय, अमित रोहिदासने पेनल्टी कॉर्नरवर, तर हरमनप्रीत सिंगने पेनल्टी स्ट्रोकवर गोल केला.
सामन्याच्या अखेरच्या दोन मिनिटांपर्यंत दोन्ही संघांमध्ये ३-३ अशी गोलबरोबरी होती. त्यावेळी बेल्जियमच्या सर्कलमधील फाउलवर भारतीय संघाने रेफरल मागितला. या रेफरलचा निर्णय भारताच्या बाजूने लागल्यामुळे भारताला पेनल्टी स्ट्रोक मिळाला. या संधीचे सोने करत हरमनप्रीतने अचूकपणे चेंडू गोलजाळ्यात धाडून भारताचा ४-३ असा विजय निश्चित केला. भारताचा या स्पर्धेतील हा सहावा विजय असून १८ गुणांसह भारत गुणतक्त्यात आठव्या स्थानी आहे.
हेही वाचा :
नीरजने जिंकली पॅरिस डायमंड लीग