नवी दिल्ली : या महिनाअखेरीस रंगणाऱ्या सुदिरामन कप फायनल्स बॅडमिंटन स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. पी. व्ही. सिंधू आणि लक्ष्य सेन यांच्याकडे भारताच्या अनुक्रमे महिला व पुरुष संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. मागील तीन महिने स्पर्धात्मक बॅडमिंटनपासून दूर असणारी सात्विकसाईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी पुरुष दुहेरीतील भारताची आघाडीची जोडीही या स्पर्धेद्वारे पुनरागमन करणार आहे. (Sudiraman Cup)
चीनमधील शियामेन येथे २७ एप्रिल ते ४ मेदरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे. जागतिक सांघिक क्रमवारीच्या आधारे भारत या स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. या स्पर्धेत भारतीय संघ ग्रुप डीमध्ये सहभागी होणार असून भारतासोबत या गटात इंडोनेशिया, डेन्मार्क आणि इंग्लंड यांसारखे बलाढ्य संघ आहेत. साखळी फेरीमध्ये भारताची लढत २७ एप्रिल रोजी डेन्मार्कशी, २९ एप्रिलला इंडोनेशियाशी आणि १ मे रोजी इंग्लंडशी होणार आहे. चार ग्रुपमधील एकूण सोळा संघांमध्ये ही स्पर्धा रंगणार असून प्रत्येक ग्रुपमधून आघाडीचे दोन संघ उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करतील. दोन्ही देशांतील लढतींदरम्यान पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष दुहेरी, महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरी अशा पाच गटांमध्ये सामने होतील. (Sudiraman Cup)
भारताने या स्पर्धेसाठी चौदा खेळाडूंचा संघ निवडला आहे. पुरुष एकेरीमध्ये लक्ष्यसह एच. एस. प्रणॉयची निवड करण्यात आली असून महिला एकेरीत सिंधूव्यतिरिक्त अनुपमा उपाध्यायला संधी मिळाली आहे. पुरुष दुहेरीमध्ये सात्विक-चिराग यांच्याबरोबरच हरिहरन अम्साकरुणन-रुबेनकुमार रेठिनासबापती या जोडीचीही निवड करण्यात आली आहे. ट्रिसा जॉली-गायत्री गोपिचंद ही भारताची महिला दुहेरीतील आघाडीची जोडी दुखापतीमुळे या स्पर्धेत खेळू शकणार नाही. त्यांच्या अनुपस्थितीत श्रुती मिश्रा-प्रियाकोंजेंगबाम ही जोडी या गटात भारताची आघाडी सांभाळणार आहे. मिश्र दुहेरीसाठीही दोन जोड्या निवडण्यात आल्या असून तनिशा क्रॅस्टो-ध्रुव कपिला, आद्या वारियाश-सतीशकुमार यांना संधी देण्यात आली आहे. (Sudiraman Cup)
भारतीय संघ – लक्ष्य सेन, एच. एस. प्रणॉय (पुरुष एकेरी), पी. व्ही. सिंधू, अनुपमा उपाध्याय (महिला एकेरी), सात्विकसाईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी, हरिहरन अम्साकरुणन-रुबेनकुमार रेठिनासबापती (पुरुष दुहेरी), श्रुती मिश्रा-प्रियाकोंजेंगबाम (महिला दुहेरी), तनिशा क्रॅस्टो-ध्रुव कपिला, आद्या वारियाश-सतीशकुमार (मिश्र दुहेरी).
हेही वाचा :
भारताचा ऑगस्टमध्ये बांगलादेश दौरा
मुंबई, करुणचा विक्रम