कोल्हापूर; प्रतिनिधी : लांबलेला मान्सून आणि विधानसभा निवडणूकीमुळे कोल्हापूरचा फुटबॉल हंगाम तब्बल दीड महिना लांबला आहे. कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनने वरिष्ठ फुटबॉल हंगामाच्या रजिस्ट्रेशनची तारीख निश्चित केली असून पाच डिसेंबरपासून फुटबॉल नोंदणीस सुरुवात होणार आहे.
फुटबॉल हंगाम लांबला असला तरी जिल्ह्यातील १६ वरिष्ठ संघांनी नोंदणीपूर्वीच स्टार खेळाडूंना ठी मोठी बोली लावून आपल्या गोटात आणले आहे. त्यामुळे अनेक खेळाडूंनी यंदा संघ बदलल्याचे चित्र पहायला मिळेल.
पाच ते नऊ डिसेंबर या कालावधीत संघ व खेळाडूंची नियमित नोंदणी होणार असून दहा आणि अकरा डिसेंबर या दोन दिवशी विलंब आकारुन शुल्क भरुन नोंदणी होणार आहे. प्रत्येक संघामध्ये कमीत-कमी १६ व जास्तीत जास्त २० खेळाडूंची नोंदणी करता येणार आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्याबाहेरील भारतीय नागरिकत्व असणाऱ्या तीन खेळाडूंची नोंदणी करता येईल. संघामध्ये १९ वर्षाखालील एका खेळाडूची नोंदणी करणे बंधनकारक राहणार आहे.
‘ए’ डिव्हीजन लिगचे सर्व सामने संपल्यानंतर नियमाप्रमाणे के.एस.ए.‘बी’ व ‘सी’ डिव्हीजनमधील नोंदणीकृत खेळाडूंच्यापैकी एकूण 5 खेळाडूंची नोंदणी करता येईल. यामध्येच कोल्हापूर जिल्ह्याबाहेरील एका नवीन खेळाडू नोंदणी करता येईल.