कोरोना काळात बंद झालेल्या सह्याद्री एक्सप्रेस गाडी सुरू करण्यासाठी मध्य रेल्वेने नकार दिला आहे. केंद्र सरकार आणि रेल्वेला सह्याद्री नावाचे वावडे असल्याने सर्वसामान्यांच्या सोयीची सह्याद्री एक्सप्रेस बंदच राहणार असल्याची चर्चा आहे. रेल्वे खात्याकडून महाराष्ट्रावर अन्याय होत असताना मध्य रेल्वेने उत्तर भारतात जाणाऱ्या काही गाड्या नियमित केल्या आहेत. तब्बल सात वर्षाहून अधिक काळ बंद असलेल्या सह्याद्री एक्सप्रेसवर मुंबई, पुणे,कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील खासदारांनी संसदेत आवाज उठवण्याची गरज आहे.
सतीश घाटगे
उत्तर भारताकडे जाणाऱ्या रेल्वे नियमित करण्याचा निर्णय
मध्य रेल्वेने दादर-गोरखपूर, दादर-बलिया या विशेष गाड्या नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. पण सह्याद्री एक्सप्रेस, दादर-रत्नागिरी, मुंबई-भुसावळ या गाड्याबाबत काहीच निर्णय घेतलेला नाही. दादर गोरखपूर ही विशेष गाडी आता दादर गोरखपूर एक्सप्रेस म्हणून १८ ऑगस्टपासून सुरू झाली आहे. दादर बलिया या विशेष गाडीचे रुपांतरही दादर बलियामध्ये करण्यात आले आहे. याचा फायदा उत्तर भारतातून मुंबईत येणाऱ्यांना होणार आहे. पण महाराष्ट्रातील प्रवाशांकडे मात्र रेल्वेचे दुर्लक्ष केले आहे. (Sahyadri Express will remain discontinued)
लोकप्रतिनिधींच्या पत्रांकडेही रेल्वेमंत्र्यांचे दुर्लक्ष
सह्याद्री एक्सप्रेस, दादर-रत्नागिरी, मुंबई-भुसावळ या पूर्वापार गाड्या आहेत. पण त्याकडे रेल्वे खात्याने दुर्लक्ष केले आहे. विविध तांत्रिक अडचणीचे कारण सांगून या गाड्या सुरू केल्या जात नाहीत. २०२३ मध्ये या गाड्या सुरू करण्यासाठी तत्कालिन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. तेव्हा त्यांनी रेल्वे गाड्या सुरू कराव्यात असे आदेशही दिले होते. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनीही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र दिल आहे. पण त्याबाबत ठोस निर्णय झालेला नाही.
कोरोना काळापासून सह्याद्री एक्सप्रेस बंद
सह्याद्री एक्सप्रेस (गाडी क्रमांक ११४१९/२०) कोल्हापूर ते मुंबई दरम्यान पूर्णपणे बंद आहे. कोरोना महामारीपासून ही गाडी बंद आहे. रेल्वेच्या नव्या धोरणानुसार (झिरो टाईम टेबल) तिचा प्रवास मुंबईपर्यंत कायमचा बंद केला आहे. सध्या ही गाडी मुंबई सीएसएमटी पर्यंत न जाता खडकी पर्यंत जाते. सध्या सह्याद्री एक्सप्रेस कोल्हापूर खडकी एक्सप्रेस म्हणून धावत आहे. मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना खडकी स्थानकावर दुसऱ्या गाडीचा वापर करावा लागत आहे. (Sahyadri Express will remain discontinued)
सह्याद्री एक्सप्रेस पनवेलमार्गे सुरू करण्याची मागणी
चार महिन्यापूर्वी सह्याद्री एक्सप्रेस सुरू करण्याची हालचाली सुरू झाल्या होत्या. पण अजुनही याबाबत निर्णय झालेला नाही. त्यामुळे कोल्हापूरातील प्रवाशांना मुंबईला जाण्यासाठी महालक्ष्मी एक्सप्रेस आणि कोयना एक्सप्रेसचा वापर करावा लागतो. महालक्ष्मी एक्सप्रेस ही कायम वेटिंगवर असल्याने व एलएचबी डब्यामुळे डबे कमी झाल्याने प्रवाशी संघटना आणि सल्लागार समितीकडून कोल्हापूर पुणे सह्याद्री एक्सप्रेसचा विस्तार मुंबईपर्यंत करावा अशी मागणी होत आहे. सह्याद्री एक्सप्रेस पनवेलमार्गे मुंबईपर्यंत सुरू ठेवण्याची मागणी होत आहे.
सह्याद्री एक्सप्रेसचा इतिहास
सह्याद्री एक्सप्रेस फार जुनी गाडी आहे. महाराष्ट्राचा शिवकालीन इतिहास आणि भौगलिक महत्वाचे स्थान असलेल्या सह्याद्री पर्वतावरुन या गाडीचे नामकरण सह्याद्री एक्सप्रेस करण्यात आले. मुंबई ते कोल्हापूर हे ५१८ किलो मीटरचे अंतर पार पाडण्यासाठी या गाडीला १२ तास १५ मिनिटे किंवा १३ तास ५ इतका अवधी लागत होता. भारतीय रेल्वेच्या नियमानुसार दोन्ही दिशेला रेल्वेचा वेग प्रतितास ५५ तासांपेक्षा कमी असल्याने या गाडीला सुपरफास्ट चार्ज लागत नाही. मुंबई पुणे दरम्यानचा मार्ग विद्युत असल्याने या मार्गावर विजेचे इंजिन तर पुणे ते कोल्हापूर दरम्यान डिझेल इंजिन वापरुन वाहतूक केली जाते. प्रवाशांना ही गाडी अतिशय सोयीची वाटते.
सह्याद्री एक्सप्रेसचे २८ ते ३० थांबे
छत्रपती शिवाजी टर्मिनस, दादर रेल्वे स्थानक, कल्याण, कर्जत, खंडाळा, लोणावळा, तळेगाव, देहू रोड, पिंपरी, खडकी, शिवाजीनगर, पुणे, जेजुरी, नीरा, लोणंद, वाठार, सातारा, कोरेगांव, कराड, किर्लोस्करवाडी, भिलवडी, सांगली, मिरज, जयसिंगपूर, हातकणंगले, रुकडी, वळीवडे, कोल्हापूर.
कोरोना काळात कोल्हापूर स्थानकावरुन बंद झालेल्या गाड्या
सह्याद्री एक्सप्रेस, कोल्हापूर-सोलापूर, कोल्हापूर-मंगळवेढा, कोल्हापूर-बिदर, मिरज-हुबळी, मिरज-पंढरपूर सुपरफास्ट. (Sahyadri Express will remain discontinued)