- विलास अध्यापक
बेळगाव: बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर गावात ढगफुटीसदृश्य पावसामुळे दाणादाण उडाली. बाजापेठेत पाणी साठून दुचाकी पाण्याखाली गेल्या, तसेच गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले. (Belgaum heavy rain)
सुमारे एक तास झालेल्या पावसाने झोडपून काढले. बैलहोंगल तालुक्यात देखील अनेक गावात मुसळधार पावसाने दैना केली. रस्त्यावरील पाण्याच्या प्रवाहामध्ये अनेक दुचाकी वाहून गेल्या. बेळगाव शहरातदेखील सायंकाळी दोन तास दमदार पाऊस झाला. (Belgaum heavy rain)

सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास वादळी वारा सुरु झाला. त्या नंतर काही वेळातच ढगांचा गडगडाट सुरु झाला. लगेच मुसळधार पाऊस सुरु झाला. ढगफुटीसदृश्य झालेल्या पावसाने काही वेळातच सगळीकडे पाणीच पाणी झाले. बाजारपेठेत पाच फूट पाणी वाहत होते. रस्त्यावर पाणी साठल्याने रस्त्यावर थांबवण्यात आलेल्या दुचाकी पाण्याखाली बुडाल्या. कित्तूर गावातील घरात पाणी शिरल्याने घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले. घरात शिरलेले पाणी बाहेर काढताना महिलांची तारांबळ उडाली होती. अंगणवाडी केंद्रात देखील पाणी शिरल्याने तेथील साहित्याचे नुकसान झाले.