मुल्लनपूर : विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कलच्या शानदार अर्धशतकांमुळे आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने पंजाब किंग्जचा रविवारी ७ विकेटनी पराभव केला. या विजयासह बेंगळुरूने दोन दिवसांपूर्वी पंजाबकडून पत्करावा लागलेल्या पराभवाची परतफेडही केली. याबरोबरच, बेंगळुरूचा संघ १० गुणांसह गुणतक्त्यात तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. (RCB beats PK)
या सामन्यात बेंगळुरूने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर पंजाबला ६ बाद १५७ धावांत रोखले. पंजाबकडून एकाही फलंदाजास अर्धशतकी मजल मारता आली नाही. प्रभसिमरन सिंगने १७ चेंडूंमध्ये ५ चौकार व एका षटकारासह सर्वाधिक ३३ धावा केल्या. अखेरच्या पाच षटकांमध्ये पंजाबला केवळ ३८ धावा जमवता आल्या. बेंगळुरूकडून कृणाल पंड्या व सुयश शर्मा यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या. (RCB beats PK)
पंजाबच्या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगळुरूने पहिल्याच षटकात सलामीवीर फिल सॉल्टची विकेट गमावली. अर्शदीपने सॉल्टला अवघ्या एका धावेवर बाद करून पंजाबला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर मात्र विराट आणि देवदत्त यांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचली. विशेषत: पडिक्कलने पंजाबच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. तेराव्या षटकात हरप्रीतने पडिक्कलला बाद केले. पडिक्कलने ३५ चेंडूंमध्ये ५ चौकार व ४ षटकारांसह ६१ धावा फटकावल्या. त्यानंतर, विराटने अगोदर रजत पाटिदार व नंतर जितेश शर्माच्या साथीने एकोणिसाव्या षटकात संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. विराटने ५४ चेंडूंमध्ये ७ चौकार व एका षटकारास नाबाद ७३ धावांची खेळी केली. यंदाच्या आयपीएलमध्ये त्याचे हे चौथे अर्धशतक. यावेळी विराटने आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा ५० पेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रमही नोंदवला. विराटने २५२ आयपीएल सामन्यांत एकूण ६७ वेळा ५० धावांचा टप्पा पार केला असून त्यामध्ये ५९ अर्धशतके व ८ शतके आहेत. त्याने या यादीत डेव्हिड वॉर्नरला (४ शतके, ६२ अर्धशतके) मागे टाकून अग्रस्थान पटकावले. (RCB beats PK)
संक्षिप्त धावफलक : पंजाब किंग्ज – २० षटकांत ६ बाद १५७ (प्रभसिमरन सिंग ३३, जोश इंग्लिस २९, शशांक सिंग नाबाद ३१, कृणाल पंड्या २-२५, सुयश शर्मा २-२६) पराभूत विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू – १८.५ षटकांत ३ बाद १५९ (विराट कोहली नाबाद ७३, देवदत्त पडिक्कल ६१, अर्शदीप सिंग १-२६, हरप्रीत ब्रार १-२७).
हेही वाचा :