आज, भारतीय रेल्वे ही वंदे भारत, राजधानी एक्स्प्रेस, शताब्दी एक्स्प्रेस आणि संपर्क क्रांती एक्स्प्रेस यासारख्या जलद आणि प्रिमियम ट्रेन चालवते. बुलेट ट्रेनचे कामही प्रगतिपथावर आहे. पण हे अंतर कापण्यासाठी आपल्याला १७२ वर्षे लागली.(Indian Railway)
-प्रतिनिधी
१६ एप्रिल १८५३ रोजी भारतातील पहिली प्रवासी रेल्वे मुंबईतील बोरी बंदर (तेव्हाचे मुंबई )आणि ठाणे दरम्यान धावली. तेव्हा ट्रेनला आगगाडी किंवा आगीनगाडी म्हटलं जायचं. झुक झुक झुक झुक आगीनगाडी… गाणं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तीच ती आगीनगाडी. म्हणजे रेल्वे. म्हणजे ट्रेन.
ही १४ डब्यांची ट्रेन ओढण्यासाठी तीन इंजिन जोडावे लागले. ही ट्रेन साहिब, सिंध आणि सुलतान नावाच्या तीन स्टीम इंजिनांनी ओढली जात होती. पहिल्या ट्रेनने एकूण ३४ किलोमीटर अंतर कापले. तरीही ३४ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी सुमारे सव्वा तास लागला. (Indian Railway)
म्हणूनच १६ एप्रिल हा दिवस रेल्वेसाठी खास आहे. हा दिवस भारतीय रेल्वेकडून वाहतूक दिन म्हणून साजरा केला जातो.
१६ एप्रिल १८५३ रोजी या ट्रेनचा भव्य उद्घाटन समारंभ पार पडला. देशातील सुमारे ४०० प्रवाशांना या पहिल्या ट्रेनने प्रवास करण्याची संधी मिळाली. (Indian Railway)
२१ तोफांची सलामी
ही ट्रेन सुरू झाल्यावर तिला २१ तोफांची सलामी दिलेली. त्यावरून, त्या वेळी भारतासाठी ही ट्रेन चालवणे किती मोठी घटना होती, याची कल्पना तुम्ही करू शकता.
रेल्वे इतिहासात असे म्हटले आहे: “बोरी बंदरहून दुपारी ३.३० वाजता ट्रेन रवाना झाली, प्रचंड गर्दीच्या टाळ्यांच्या कडकडाटात आणि २१ तोफांच्या सलामीत.”
ही ट्रेन दुपारी ४.४५ वाजता ठाण्याला पोहोचली. ३४ किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी ट्रेनला एक तास १५ मिनिटे लागली.
ब्रिटिशांनी भारतात रेल्वेचे जाळे लोकांच्या गरजांसाठी नव्हे तर स्वतःच्या फायद्यासाठी सुरू केले. त्यांना मालाच्या सुरक्षित वाहतुकीसाठी रेल्वे व्यवस्था हवी होती. (Indian Railway)
मुंबईला ठाणे, कल्याण, थळ आणि भोर घाटांशी रेल्वे मार्गाने जोडण्याची कल्पना प्रथम मुंबई सरकारचे मुख्य अभियंता श्री. जॉर्ज क्लार्क यांना १८४३ मध्ये भांडुप भेटीदरम्यान सुचली. हे लक्षात घेणंसुद्धा महत्वाचं आहे.
मुंबईत रेल्वे सेवा सुरू झाल्यानंतर, काही महिन्यांनी १५ ऑगस्ट १८५४ रोजी, पहिली प्रवासी ट्रेन कलकत्त्याच्या हावडा स्टेशनवरून धावली. ती २४ मैल अंतरावरील हुगळी स्टेशनकडे निघाली. अशाप्रकारे पूर्व भारतीय रेल्वेचा पहिला विभाग सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात आला ज्यामुळे पूर्वेकडील भागात रेल्वे वाहतुकीची सुरुवात झाली. त्यानंतर, दक्षिणेकडील पहिली लाईन १ जुलै १८५६ रोजी मद्रास रेल्वे कंपनीने उघडली. (Indian Railway)
मुंबईत राहणाऱ्या लोकांसाठी लोकल ट्रेन ही जीवनवाहिनी मानली जाते. अत्यल्प तिकीट दरात दररोज लाखो मुंबईकर लोकलने प्रवास करतात. लोकल असेल किंवा काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतचा कुठलाही प्रवास असेल… आपल्या बजेटमध्ये प्रवास करण्यासाठी रेल्वेकडे पाहिलं जातं. ट्रेन वेळेवर न येणे… मोठ्या लांब पल्यांच्या ट्रेन साठी लोकल किंवा इतर ट्रेन थांबवून ठेवणे… आधुनिकतेचा वापर होत असतानाच यंत्रणा आणि कामगारांची कमतरता यासारख्या अनेक गोष्टींचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो. तो त्रास सहन करूनही लोक रेल्वेलाच पसंती देतात.
आशियातील सर्वांत मोठे नेटवर्क
पण आजच्या घडीला, भारतीय रेल्वे हे आशियातील सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. ते जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. जगातील सर्वांत लांब रेल्वे प्लॅटफॉर्म देखील भारतात आहे. तो कर्नाटकातील हुबळी येथे आहे. आपल्याकडे वंदे भारत सारख्या सेमी हाय स्पीड ट्रेन्स आहेत. सध्या भारतीय रेल्वेमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. सिग्नलिंग व्यवस्था देखील आधुनिक झाली आहे. (Indian Railway)
त्यामुळे गरिबांपासून श्रीमंताना साधारण पासून फाईव्ह स्टार सेवा पुरवणाऱ्या भारतीय रेल्वेच्या पुढच्या वेगवान प्रवासासाठी शुभेच्छा.
हेही वाचा :
तामिळनाडू सरकारने वितळवले मंदिरांचे सोने
सभापती ‘पक्ष प्रवक्ते’ असू शकत नाहीत