पूर्व हिमालयातील ढगांनी झाकलेल्या दाट जंगलांमध्ये आढळणारा देखणा दुर्मीळ पक्षी म्हणजे — ब्लायथ्स ट्रॅगोपॅन. हा नर तीतर जणू रंगांची जिवंत कलाकृतीच आहे. हा देखणा पक्षी सध्या धोकादायक स्थितीत असून त्याचे संरक्षण करण्याचे आव्हान आहे.
या नर तीतर पक्षाच्या अंगावर गडद तपकिरी रंग असून त्यावर लाल छटा आहे. पांढऱ्या-मरून रंगाचे गोल ठिपके पसरलेले असतात. छातीचा भाग गडद, तेजस्वी लाल रंगाचा असतो. हनुवटीखाली स्पष्ट दिसणारी काळी अर्धवर्तुळाकार पट्टी असते. खालची छाती वाळूसारख्या करड्या रंगाची असते, तर बाजूचे भाग आणि मांडी काळ्या, फिकट पिवळ्या आणि लाल ठिपक्यांनी नटलेले असतात.
त्याचा चेहरा लगेच ओळखता येईल असा पिवळसर-केशरी रंगाचा असतो. डोक्यावर काळा मुकुट आणि काळी कॉलर असते. डोके, मान, पाठीचा वरचा भाग आणि खांद्यावरील पिसे चमकदार तांबूस-लाल रंगाची असतात. चेहऱ्यावरील पिवळी त्वचा आणि करड्या रंगाचे पोट यामुळे हा पक्षी भारतातील इतर ट्रॅगोपॅन जातींपेक्षा वेगळा दिसतो. (Colorful pheasant of the Eastern Himalayas)
प्रजनन काळात विलक्षण प्रदर्शन
प्रजनन काळात नर ट्रॅगोपॅन आपले रूप पूर्णपणे बदलतो. त्याच्या डोक्यावरून फिकट निळ्या रंगाचे दोन शिंगांसारखे अवयव बाहेर येतात आणि गळ्याखालील रंगीबेरंगी त्वचेचा पडदा (लॅपेट) फुगवून तो विलक्षण प्रदर्शन करतो. हे दृश्य जणू एखाद्या काल्पनिक प्राण्यासारखे भासते.
याच्या उलट, मादी तीतर खूपच साध्या रंगाची असते. तिच्या अंगावर फिकट करड्या-तपकिरी रंगाचे, हलके ठिपके असलेले पिसे असतात, जे तिला जंगलाच्या जमिनीत सहज लपून राहायला मदत करतात. मादी आकारानेही लहान असते — सुमारे ५९ सेंटीमीटर, तर नर ६५ ते ७० सेंटीमीटर लांब असतो.
ब्लायथ्स ट्रॅगोपॅनचा प्रदेश भूतानपासून सुरू होऊन अरुणाचल प्रदेश, नागालँड, मिझोराम, मणिपूर, उत्तर म्यानमार, दक्षिण-पूर्व तिबेट आणि चीनमधील युनान प्रांतापर्यंत पसरलेला आहे. तो प्रामुख्याने रुंद पानांची जंगले, बांबूची दाट झाडी आणि घनदाट अंडरग्रोथ असलेल्या डोंगर उतारांवर राहतो. (Colorful pheasant of the Eastern Himalayas)
ऋतुमानानुसार निवास बदल
हा पक्षी ऋतूनुसार राहण्याचे ठिकाण बदलतो. हिवाळ्यात तो सुमारे चौदाशे मीटर उंचीपर्यंत खाली येतो, तर उन्हाळ्यात तीन हजार मीटर उंचीपर्यंत वर चढतो. जास्त बर्फवृष्टी झाल्यास अन्नाच्या शोधात तो आणखी खाली येतो. जरी काही चांगल्या स्थितीत असलेल्या जंगलांत, विशेषतः अरुणाचल प्रदेशातील दिहांग-दिबांग जैवमंडल राखीव क्षेत्रात, हा पक्षी अजूनही दिसतो, तरी बहुतांश भागात तो अत्यंत दुर्मिळ आहे. नराचे रंग कितीही उठावदार असले, तरी हा पक्षी फारच सावध आणि भित्रा आहे.
साधारणपणे हे पक्षी एकटे किंवा चार-पाचांच्या छोट्या गटात आढळतात. धोका जाणवला की ते क्षणार्धात झाडीत लपून जातात. संरक्षित जंगलांमध्ये कधीकधी पहाटे किंवा संध्याकाळी ते मोकळ्या जागेत किंवा सावलीच्या उतारांवर अन्न शोधताना दिसतात. (Colorful pheasant of the Eastern Himalayas)
शिका-यांपासून धोका
ईशान्य भारतात मोठे पक्षी अन्न, पिसे आणि पारंपरिक कारणांसाठी शिका-यांचे लक्ष्य राहिले आहेत. ट्रॅगोपॅनही याला अपवाद नाही. अरुणाचल प्रदेशात अजूनही मोठ्या प्रमाणावर जंगले असली तरी, मोठे जलविद्युत प्रकल्प, रस्ते, वसाहती आणि जंगलांचे तुकडे-तुकडे होणे हे त्याच्या अस्तित्वासमोरील मोठे धोके आहेत. कायद्याने या पक्ष्याला सर्वोच्च संरक्षण मिळाले आहे.
तो वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ च्या अनुसूची-१ मध्ये आणि CITES च्या परिशिष्ट-१ मध्ये समाविष्ट आहे. आजघडीला त्यांची संख्या अंदाजे दहा हजारापेक्षा कमी आहे. तेही वेगवेगळ्या संरक्षित भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात आहेत.