सतीश घाटगे: कोल्हापूर; जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ, उपाध्यक्ष राजूबाबा आवळे यांच्यासह सात संचालक रिंगणात उतरले आहेत. सहकार क्षेत्र विधानसभा निवडणुकीपासून सर्व पक्षांनी अलिप्त ठेवले असले तरी बँकेतील कर्मचाऱ्यांना मतदान आणि प्रचारासाठी आग्रह धरला जात आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारीचा प्रारंभ जिल्हा परिषद, जिल्हा बँक, जिल्हा दूध संघातून होतो. विधानसभा निवडणुकीत सहकारी संस्था आपल्या ताब्यात असाव्यात यासाठी नेत्यांची धडपड असते. त्यामुळे जिल्हा बँकेवर संचालक म्हणून वर्णी लागावी यासाठी नेतेमंडळी प्रयत्न करत असतात. राज्यातील फाटाफुटीच्या राजकारणाचा संबंध बँकेतील अध्यक्षासह संचालकांनी बँकेच्या कारभारात येऊन दिलेला नाही. जिल्हा बँकेचे अधिकारी आणि कर्मचारीही बँकेचे कामकाज सांभाळून छुप्या पद्धतीने प्रचार करत आहेत. यंदाही जिल्हा बँकेचे सात संचालक रिंगणात असून अन्य संचालकांचे नातेवाईक आणि नेते निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी अडचणीत आलेल्या बँकेचा कारभार उत्तम केल्याने सात वर्षांहून अधिक काळ ते अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. राजकीय विद्यापीठ म्हणून असलेल्या कागल विधानसभा मतदारसंघात ते निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात विक्रमसिंह घाटगे सहकारी बँकेचे समरजित घाटगे रिंगणात उतरले आहेत. मतदारसंघात दोघांत कडवी झुंज होणार आहे. बँकेचे संचालक प्रताप ऊर्फ भैय्या माने सेनापती महणून मुश्रीफ गटाचा प्रचार करत आहेत. मुश्रीफ यांनी बेरजेचे राजकारण करताना निवडणूक आचारसंहितेपूर्वी माजी आमदार संजयबाबा घाटगे यांना तज्ज्ञ संचालक म्हणून निवडले आहे. बँकेचे संचालक माजी खासदार प्रा. संजय मंडलिक यांनीही मुश्रीफांना पाठिंबा दिला आहे.
बँकेचे उपाध्यक्ष राजूबाबा आवळे हातकणंगले मतदारसंघातून लढत आहेत. त्यांची लढत शेतकरी संघटनेचे उमेदवार माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, ‘जुनसुराज्य’चे अशोकराव माने यांच्याशी आहे. या मतदारसंघात बँकेचे संचालक विजयसिंह अशोकराव माने यांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे.
आमदार विनय कोरे हे पन्हाळा तालुक्याचे जिल्हा बँकेत प्रतिनिधित्व करत आहेत. कोरे हे शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात उमेदवार आहेत, कोरे यांचा हातकणंगले मतदारसंघात गट असून, त्यांच्या गटाची मदत जनसुराज्यचे उमेदवार अशोकराव माने यांना होणार आहे. आमदार कोरे यांच्याविरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार सत्यजित ऊर्फ सत्यजित पाटील सरूडकर उमेदवार आहेत. सरूडकर यांची भिस्त जिल्हा बँकेचे संचालक रणवीरसिंग गायकवाड यांच्यावर आहे. कोल्हापूर दक्षिणमधून बँकेचे संचालक माजी आमदार अमल महाडिक भाजपचे
उमेदवार आहेत. त्यांची लढत काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष ऋतुराज पाटील यांच्याबरोबर आहे. ऋतुराज पाटील यांचे चुलते विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील हे जिल्हा बँकेचे संचालक आहेत. बँकेच्या महिला संचालिका स्मिता गवळी याही ऋतुराज पाटील यांच्या प्रचारात सक्रिय आहेत.
माजी मंत्री आणि विद्यमान आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर निवडणूक लढवत आहेत. चंदगड मतदारसंघातून बँकेचे संचालक आमदार राजेश पाटील निवडणूक लढवत आहेत. बँकचे ज्येष्ठ संचालक ए. वाय. पाटील बंडखोरी करत राधानगरी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. त्यांची लढत विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर आणि माजी आमदार के. पी. पाटील यांच्याबरोबर होणार आहे, आमदार आबिटकर यांचे बंधू अर्जुन आबिटकर, तर के. पी. पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह पाटील हे बँकेचे संचालक आहेत. आमदार प्रकाश आवाडे यांचे चिरंजीव राहुल आवाडे इचलकरंजीतून, संचालक राजेश पाटील यांचे भाऊ राहुल पाटील करवीर मतदारसंघात लढत आहेत.
निवडणूक रिंगणातील संचालक असे
- हसन मुश्रीफ राष्ट्रवादी- अजित पवार गट – कागल
- राजूबाबा आवळे – काँग्रेस – हातकणंगले
- विनय कोरे – जनसुराज्य – शाहूवाडी
- राजेश पाटील – राष्ट्रवादी अजित पवार गट – चंदगड
- अमल महाडिक – भाजप – कोल्हापूर दक्षिण
- राजेंद्र पाटील-यड्रावकर – शिवसेना पुरस्कृत अपक्ष – शिरोळ
- ए. वाय. पाटील – अपक्ष – राधानगरी