जमीर काझी : मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपाचे दिवगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत केलेल्या दाव्यावर संमती देताना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी रविवारी अजब दावा केला. जर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असता तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता, असे वक्तव्य करीत त्यांच्या मृत्यूला एकप्रकारे भाजपा जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मुंडे यांच्या मृत्यूबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. (Sanjay Raut’s views on Gopinath Munde’s death)
गोपीनाथ मुंडे यांचा २०१४ मध्ये केंद्रात मंत्री असताना अपघाती मृत्यू झाला होता. दिल्लीत व्हीआयपी परिसरातून जेमतेम २० किलोमीटर प्रति तास वेगाने त्यांचा चालक गाडी घेत असताना एका ट्रकने त्यांना धडक दिली होती. मात्र या परिसरात हे वाहन आले कसे?, याचा कधीही उलगडा करण्यात आला नाही.
पृथ्वीराज चव्हाण यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकारांशी बोलताना दावा केला होता की गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये येणार होते. सोनिया गांधी यांनीही त्याला संमती दिली होती त्यांना मंत्रिपद देण्याची मागणी होती. त्यानुसार सगळे ठरले होते. मात्र तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना अशा पद्धतीने विरोधी नेत्याचे पक्षांतर करणे पसंत नव्हते त्याबाबत त्यांनी वरिष्ठांना कळविल्यानंतर त्यांचा पक्षप्रवेश नाकारण्यात आला होता.
सरळमार्गी मनमोहनसिंगाना विरोधकांना फोडणे पसंत नव्हते
पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याला असता संजय राऊत यांनीही दुजोरा दिला ते म्हणाले की पंतप्रधान मनमोहन सिंग हे सरळ मार्गे राजकारणी होते. त्यांना अशा प्रकारे विरोधकांना फोडणे पसंत नव्हते त्यामुळे त्यांनी त्याला विरोध केला. शरद पवार यांनाही गोपीनाथ मुंडे भेटले होते .जर त्यावेळी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असता तर कदाचित ते आज जिवंत असते असेही त्यांनी सांगितले. त्यांच्या या विधानामुळे आता मुंडे यांच्या मृत्यू बाबत पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. (Sanjay Raut’s views on Gopinath Munde’s death)
‘माझे वडील कमळात जन्मले आणि कमळातच विसावले’
दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याबाबत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या व मंत्री पंकजा मुंडे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे त्या म्हणाल्या की,’पृथ्वीराज चव्हाण यांनी वक्तव्य केलं, आता काय करायचं, आता त्याचं सिग्निफिकंट काही नाही. मुंडेसाहेब हयात नाहीत, त्यामुळे आता त्यांच्या विषयी बोलणे उचित नाही आणि त्याचे औचित्यही नाही. मला जे माझे वडील कळले ते या कमळात जन्मले आणि कमळातच विसावले हा त्यांचा पूर्ण प्रवास आहे. आजच्या परिस्थितीत अजूनही लोक त्यांचं नावं घेतात, पृथ्वीराज बाबांनी आदरानेच त्यांचे नाव घेतले असेल , असेही त्यांनी म्हटले. (Sanjay Raut’s views on Gopinath Munde’s death)