क्वालालंपूर : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) सोमवारी जाहीर केलेल्या जागतिक १९ वर्षांखालील महिला संघामध्ये चार भारतीय खेळाडूंनी स्थान पटकावले आहे. रविवारी भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा १९ वर्षांखालील महिला टी-२० वर्ल्ड कपचे विजेतेपद जिंकले होते. या वर्ल्ड कपमध्ये प्रभावी कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना या संघात स्थान मिळाले आहे. (ICC Team)
भारताच्या सलामी फलंदाज गोंगाडी त्रिशा व जी. कमलिनी या संघामध्ये आहेत. त्याचबरोबर वैष्णवी शर्मा आणि आयुषी शुक्ला या फिरकीपटूंनीही संघात स्थान मिळवले आहे. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरलेल्या त्रिशाने वर्ल्ड कपमध्ये एका शतकासह ३०९ धावा करण्याबरोबरच ७ विकेटही घेतल्या. कमलिनीने २ अर्धशतकांसह १४३ धावा केल्या. या वर्ल्ड कपमध्ये वैष्णवी आणि आयुषीने गोलंदाजीत चमक दाखवताना अनुक्रमे १७ व १४ विकेट घेतल्या. वैष्णवी ही स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाजही ठरली. (ICC Team)
या स्पर्धेत उपविजेत्या ठरलेल्या दक्षिण आफ्रिका संघाची कर्णधार कायला रेनेकेची आयसीसी संघाच्याही कर्णधारपदी निवड करण्यात आली. तिच्यासह जेमा बोथाचा समावेश या संघात असून आफ्रिकेचीच एन्थाबिसेंग निनी ही राखीव खेळाडू आहे. याशिवाय, इंग्लंडच्या दोन, तर ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि नेपाळ संघातील प्रत्येकी एका खेळाडूचा समावेश आहे. (ICC Team)
आयसीसी संघ : गोंगाडी त्रिशा, जी. कमलिनी, आयुषी शुक्ला, वैष्णवी शर्मा (सर्व भारत), जेमा बोथा, कायला रेनेके (दक्षिण आफ्रिका), डॅव्हिना पेरिन, केटी जोन्स (इंग्लंड), काओम्हे ब्रे (ऑस्ट्रेलिया), चामोडी प्रबोधा (श्रीलंका), पूजा महातो (नेपाळ), एन्थाबिसेंग निनी (राखीव खेळाडू).
हेही वाचा :