पॉट्चेफस्ट्रूम : भारताचा दुहेरी ऑलिंपिक पदकविजेता भालाफेकपटू नीरज चोप्राने दक्षिण आफ्रिकेतील पॉट्चेफस्ट्रूम निमंत्रित स्पर्धेमध्ये ८४.५२ मीटर फेक करून सुवर्णपदक जिंकले. यंदाच्या मोसमात नीरजची ही पहिलीच स्पर्धा असून पहिल्याच स्पर्धेत त्याने यशस्वी कामगिरी केली आहे. (Neeraj Chopra)
दक्षिण आफ्रिकेतील पॉट्चेफस्ट्रूम येथे ही स्पर्धा रंगली. नीरजखालोखाल दक्षिण आफ्रिकेच्याच डॉऊ स्मिटने ८२.४४ मीटर फेक करून रौप्यपदक पटकावले. या स्पर्धेमध्ये सहभागी सहा भालाफेकपटूंपैकी केवळ नीरज व स्मिट हे दोघेच ८० मीटरचा टप्पा पार करू शकले. तिसऱ्या स्थानावर राहिलेल्या आफ्रिकेच्याच डंकन रॉबर्टसनला ७१.२२ मीटर इतकीच फेक करता आली. नीरजची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ८९.९४ मीटर फेकीची असून या मोसमात ९० मीटरचा टप्पा ओलांडण्याचे लक्ष्य त्याने बाळगले आहे. पुढील महिन्यात नीरज दोहा डायमंड लीगमध्ये सहभागी होणार आहे. त्या स्पर्धेमध्ये त्याला आंतरराष्ट्रीय भालाफेकपटूंच्या कडव्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. (Neeraj Chopra)
नीरजच्या नावावर टोकियो ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक असून मागील वर्षी पॅरिस ऑलिंपिकमध्ये त्याने रौप्यपदकाची कमाई केली होती. ऑलिंपिकमध्ये मैदानी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा तो भारताचा एकमेव खेळाडू आहे. (Neeraj Chopra)
हेही वाचा :
सुरुची सिंहला दुसरे सुवर्ण
अभिषेक नायर यांना डच्चू