जमीर काझी : मुंबई : मुंबई महापालिकेवर कमळ फुलविण्यासाठी सर्वस्वपणाला लावून मैदानात उतरलेल्या भाजपाने ६६ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये अनुभवी माजी नगरसेवकाबरोबरच उमेदवारांच्या ताफ्यात मराठी मनोरंजन विश्वातील अभिनेत्री निशा परुळेकर यांचा तसेच ठाकरे गटातून प्रवेश केलेल्या तेजस्वी घोसाळकर, माध्यम विभागाचे प्रमुख नवनाथ बन यांचाही समावेश आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवारपर्यत मुदत असल्याने सर्वच राजकीय पक्षाची उमेदवार निश्चित करून त्यांना एबी फॉर्म देण्यासाठी धांदल उडाली आहे. बंडखोरी टाळण्यासाठी त्याला विलंब लावण्यात आला असला तरी उमेदवारांचे एबी फॉर्म आज रात्री उशिरापर्यत सर्वांना ते दिले जाणार आहेत.
भाजपा व शिवसेना एकनाथ शिंदे गट एकत्र लढत आहे तर महायुती सरकारमधील तिसरा घटक पक्ष असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढत असून त्यांनी ६० उमेदवारांची यादी दोन टप्यात जाहीर केली आहे. तर भाजपाने आज सोमवारी सकाळी ६६ जणांना एबी फॉर्म दिले आहेत. त्यामध्ये माजी खासदार किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या, नवनाथ बन, तेजस्विनी घोसाळकर, अभिनेत्री निशा परुळेकर आदींचा समावेश आहे. परुळेकर यांना प्रभाग क्रमांक २५ मधून उमेदवारी मिळाली असून त्या भाजप सांस्कृतिक प्रकाशच्या सहसंयोजक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी भरत जाधव यांच्यासोबत ‘ सही रे सही’ यासारख्या तुफान नाटकात त्यांनी काम केलं आहे. तसेच महानायक व शिमणा या दोन चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका साकारली होती. शिवाय महेश कोठारे व्हिजन निर्मित दख्खनचा राजा जोतिबा या मालिकेत त्यांनी महालक्ष्मी अंबाबाईचे पात्र साकारले होते. (Candidate lists announced by the parties)
युतीत शिवसेना शिंदे गटाला आतापर्यंत ७९ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. मात्र सोमवारी सायंकाळपर्यंत यादी जाहीर केलेली नव्हती. नाराजाकडून होणारी बंडखोरी टाळण्यासाठी त्यांनी सावध पवित्रा घेतल्याचे सांगितले जात आहे.
काँग्रेसकडून ७० जणांना उमेदवारी
काँग्रेस, वंचित व रासपा एकत्र निवडणूक लढवित असून काँग्रेसने ७० उमेदवाराची पहिली यादी जाहीर केली आहे. वंचितने ६८ जागा जाहीर केल्या आहेत. तर रासपा दहा ते बारा जागा लढविणार आहे. (Candidate lists announced by the parties)
ठाकरे गटाकडून 60 जणांना एबी फॉर्म वाटप
शिवसेना-मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एकत्र निवडणूक लढावित असून पवारासाठी १२ ते १४ जागा सोडण्यात आल्या आहेत. ठाकरे यांनी रविवारी मध्यरात्री ६० जणांना एबी फॉर्म दिले. एका उमेदवारीवरून आमदार वरुण सरदेसाई व आमदार अनिल परब यांच्यात तीव्र वाद झाला. त्यामुळे परब हे मध्यरात्री तीनच्या सुमारास’ मातोश्री’तून नाराज होऊन बाहेर पडले होते, असे सांगण्यात आले. तर राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा आज मेळावा घेतला. त्यानंतर ५० जणांना एबी फार्म दिले आहेत. (Candidate lists announced by the parties)
पवाराच्या जिल्हाध्यक्षाच्या हाती ‘कमळ’
निवडणुकीतील इच्छुकांची वाढती संख्यामुळे सर्वच पक्षात आयाराम-गयाराम सुरु असून सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का दिला. या पक्षाच्या जिल्हाध्यक्षा राखी जाधव यांनी ‘कमळ’ हाती धरले. ठाकरे बंधूकडून पक्षाला अत्यल्प जागावर बोळवण करण्यात आली. त्यामुळे आपण भाजपात प्रवेश केला असल्याचे त्यांनी सांगितले. राखी जाधव यांना घाटकोपर येथून भाजपाकडून तिकीट दिले जाईल, असे सांगण्यात आले.