कोल्हापूर : प्रतिनिधी : सक्षम आणि विकसित राष्ट्राच्या निर्मितीसाठी शिक्षणाला पर्याय नाही. त्या दृष्टीने शिवाजी विद्यापीठाने गेल्या ६३ वर्षांत केलेली वाटचाल अत्यंत दिशादर्शक आहे, असे गौरवोद्गार जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी यांनी आज येथे काढले.
शिवाजी विद्यापीठाच्या ६३ व्या वर्धापन दिन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी होते. प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव प्रमुख उपस्थित होत्या.
विद्यापीठातील गुणवंत शिक्षकाचा पुरस्कार जीव-रसायनशास्त्र अधिविभागाच्या डॉ. पद्मा बाबूलाल दांडगे यांना, तर बॅ. पी.जी. पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार जयसिंगपूरच्या श्रीमती गंगाबाई खिवराज घोडावत कन्या महाविद्यालयातील डॉ. विकास सदाम मिणचेकर यांना प्रदान करण्यात आला. (Vijay Maheshwari)
उच्च शिक्षण व्यवस्थेकडून अपेक्षा वाढतायेत
कुलगुरू डॉ. माहेश्वरी यांनी आपल्या भाषणामध्ये शिक्षणाचे मानवी जीवनातील महत्त्व अनेक उदाहरणांसह अधोरेखित केले. ते म्हणाले, उच्चशिक्षण व्यवस्थेकडून सर्वच घटकांच्या वाढत्या अपेक्षा आहेत. त्याचप्रमाणे शैक्षणिक उदासिनतेचेही वातावरण आहे. खासगी आणि परदेशी विद्यापीठांचे आव्हानही सामोरे उभे आहे. अशा पेचातून मार्ग काढण्यासाठी अतिसूक्ष्म विश्लेषणाबरोबरच संवेदनशील आणि मूल्यवान नागरिक घडविण्याची जबाबदारी आपल्याला निभावावी लागणार आहे. बुद्धिमत्ता विकसन करणारे शिक्षण, सूक्ष्म आणि सारासार विचार करणारे आणि मूल्यांची जाण असणारे विद्यार्थी घडविणारे शिक्षण तसेच विविध कौशल्ये प्रदान करणारे शिक्षण असे विद्यार्थ्यांचे चौफेर व्यक्तीमत्त्व घडविण्याची आवश्यकता आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे या बाबींसाठी सक्षम आहे. तथापि, त्याची अंमलबजावणी तितक्याच प्रभावी आणि सक्षम पद्धतीने करण्याची जबाबदारी शिक्षक, विद्यार्थी, प्राचार्य, शिक्षकेतर कर्मचारी आणि अधिकार मंडळे या सर्वच घटकांनी स्वीकारण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
शिवाजी विद्यापीठाची वाटचाल अनुकरणीय
’महाराष्ट्राचे आराध्यदैवत, राष्ट्रपुरूष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने स्थापन झालेल्या शिवाजी विद्यापीठाची गेल्या ६३ वर्षांतील वाटचाल ही अनुकरणीय स्वरुपाची असल्याचे कौतुकोद्गार कुलगुरू डॉ. माहेश्वरी यांनी या प्रसंगी काढले. ते म्हणाले, अवघे पाच अधिविभाग, ३४ महाविद्यालये आणि १४ हजार विद्यार्थ्यांसह सुरवात केलेल्या शिवाजी विद्यापीठाने या वाटचालीत ३४ अधिविभाग, २९७ महाविद्यालये आणि अडीच लाख विद्यार्थी अशी संख्यात्मक वाटचाल करीत असताना पश्चिम महाराष्ट्राच्या शैक्षणिक उत्थानामध्ये मोलाची भर घातली. त्याचप्रमाणे राष्ट्रीय पातळीवरील नॅकचे A++ मानांकन आणि नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय संस्थात्मक रॅंकिंग फ्रेमवर्कमध्ये (एनआयआरएफ) आघाडीच्या ५० अकृषी राज्य विद्यापीठांत स्थान प्राप्त करून आपली गुणवत्ताही सिद्ध केली आहे. जागतिक दर्जाचे अनेक संशोधक या विद्यापीठाने देशाला दिले आहेत. त्यांच्या संशोधनाचा दबदबा सर्वदूर आहे. प्रत्येक घटकाची समर्पणशील वृत्ती आणि निष्ठा यामुळेच हे शक्य झाले आहे, असेही ते म्हणाले. (Vijay Maheshwari)
गती, दिशा आणि वेळ यामुळे प्रगती
कुलगुरू डॉ. गोसावी आपल्या अध्यक्षीय भाषणात शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी म्हणाले, शिवाजी विद्यापीठाने आपल्या वाटचालीत सातत्यपूर्ण गती राखली, ही गती योग्य वेळेत योग्य दिशेने ठेवली. या तिन्हीच्या समन्वयातून शिवाजी विद्यापीठाने आपली सर्वंकष प्रगती साधली आहे. विद्यापीठाच्या लौकिकाला पुढे घेऊन जातील, असे अनेकविध उपक्रम यशस्वीपणे राबवित आहोत. भविष्यातही नव्या युगाची आव्हाने लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना ती पेलण्यास सक्षम करण्याचे उद्दिष्ट बाळगून वाटचाल सुरू आहे. भविष्य हे ज्ञान, कौशल्य, संशोधन आणि मूल्याधारित शिक्षणावर उभे आहे. शिवाजी विद्यापीठ केवळ पदवीधर नव्हे, तर विचारवंत, उद्योजक, समाजसेवक आणि राष्ट्रनिर्माते घडविण्यास कटिबद्ध आहे. “विकसित भारत@२०४७” या स्वप्नपूर्तीत आपला प्रत्येक विद्यार्थी सक्रिय योगदान देण्यासाठी सिद्ध असेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी स्वागत, प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला. संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी पसायदान सादर केले. धैर्यशील यादव, नंदिनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले. (Vijay Maheshwari)