तिहार तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना जाहीर सभेद्वारे संबोधित केले. यावेळी ते म्हणाले होते, “पुढील वर्षी १७ सप्टेंबर रोजी मोदी ७५ वर्षांचे होणार आहेत. त्यावेळी त्यांना राजकारणातून निवृत्ती घ्यावी लागेल. त्यांच्याजागी अमित शाह पंतप्रधान होतील. निवडणूक जिंकल्यानंतर दोन-तीन महिन्यांतच मोदी-शाह मिळून योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवतील.”, असा दावा अरविंद केजरीवाल यांनी त्यावेळी केला होता. (narendra modi political successor)
पंतप्रधान नरेंद्र मोदी १७ सप्टेंबर २०२५ ला ७५ वर्षांचे होतील. त्यानंतरही ते पंतप्रधानपदी राहतील, की लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी वगैरेंसोबत त्यांची रवानगी मार्गदर्शक मंडळात होईल? या चर्चेने सध्या देशाचा राजकीय अवकाश व्यापला आहे. मोदींचा उत्तराधिकारी कोण याचीही चर्चा रंगू लागली आहे.
मोदी अकरा वर्षांनी संघ मुख्यालयात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नुकताच नागपूर दौरा झाला. या दौ-यात त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. त्यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससुद्धा होते. मोदी तब्बल अकरा वर्षांनी संघाच्या मुख्यालयात आले, त्यामुळे त्याची चर्चा होणे स्वाभाविक होते. तशी ती सुरू झाली. खासदार संजय राऊत यांनी या चर्चेला तोंड फोडले. आणि चर्चेची दिशाही त्यांनीच निश्चित केली. मोदींचा वारसदार महाराष्ट्रातील असेल, या राऊत यांच्या विधानावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मोदी यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस होते. स्वाभाविकपणे फडणवीस हे मोदींचे वारसदार असू शकतील का, याची चर्चा सुरू झाली. (narendra modi political successor)
या चर्चेसंदर्भातील प्रश्नावर फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात प्रतिक्रिया नोंदवली. ते म्हणाले, आपल्या संस्कृतीत वडिल जिवंत असताना उत्तराधिका-याबद्दल बोलणे अयोग्य आहे. ते मुघल संस्कृतीत आहे. (Devendra Fadnavees)
पक्षांतर्गत विरोधक निर्माण होण्याची शक्यता
राऊत यांनी सुरू केलेला विषय आणि सुरू झालेली चर्चा यामुळे देवेंद्र फडणवीस यांची अडचण होणे स्वाभाविक आहे. कारण `दिल्लीत नरेंद्र, महाराष्ट्रात देवेंद्र` या घोषणेनंतर `नरेंद्र के बाद देवेंद्र` अशी घोषणा लोकप्रिय करता येऊ शकते. तेवढी सक्षम यंत्रणा फडणवीस यांच्यासोबत आहे. कल्पनेने फडणवीस यांना मनातून गुदगुल्या होणे स्वाभाविक आहे. त्यात गैर काही नाही. परंतु त्यात मोठी जोखीम आहे, याची त्यांनाही कल्पना आहे. कारण एका फटक्यात मुख्यमंत्र्याचा उपमुख्यमंत्री होतो, याचा अनुभव त्यांनी अलीकडेच घेतला आहे. (narendra modi political successor)
शिवाय असे चित्र उभे करून दिल्लीच्या पातळीवर सध्याच्या घडीला तीन आणि पुढे आणखी काही पक्षांतर्गत शत्रू निर्माण करण्यासारखे आहे, याची जाणीव फडणवीस यांना आहे. (सध्याच्या घडीचे तीन म्हणजे अमित शाह, योगी आदित्यनाथ आणि नितीन गडकरी. (Devendra Fadnavees)
संजय जोशींचे उदाहरण
एरव्ही राजकारणातील संघर्षाच्या अनुषंगाने जाहीरपणे बोलताना फडणवीस यांनी, `आपण विरोधक आहोत, शत्रू नव्हे`, असे विधान अलिकडेच केले होते. फडणवीस काहीही सांगत असले तरी भाजपचे अंतर्गत राजकारण तेवढे सौजन्यशील नाही. फडणवीस यांनी मुघल संस्कृतीचा उल्लेख केला. मुघल सस्कृतीत आपल्या प्रतिस्पर्ध्यांना, मग ते रक्ताचे नातेवाईक असले तरी त्यांना ठार करून सत्ता मिळवली जात असे. भाजपमध्ये आपल्या प्रतिस्पर्ध्याला आयुष्यातून आणि राजकारणातून उठवून सत्तेच्या पाय-या चढल्या जातात. संजय जोशी हे भूतकाळातले फार जुने उदाहरण नाही. राहिला मुद्दा उत्तराधिका-याच्या चर्चेचा. शरद पवार यांच्या हयातीत अजित पवार यांना स्वतंत्रपणे उभे राहण्यास बळ देताना फडणवीस यांना संस्कृतीचा विसर पडला होता का, असा प्रश्न समाजमाध्यमांतून विचारला जात आहे, तो गैरलागू म्हणता येत नाही. (Devendra Fadnavees)
केजरीवाल यांच्या वक्तव्याचा परिणाम
लोकसभा निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद उमटले होते. लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आला नाही. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील ८० पैकी ७१ जागा भाजपला मिळाल्या होत्या. २०१९मध्ये ६२ जागांवर भाजपला विजय मिळाला होता. मात्र २०२४च्या निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये भाजपला फक्त ३३ जागा मिळाल्या. अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांच्या युतीने भाजपला रोखण्यात यश मिळवले. परंतु भाजपला रोखण्यात योगी आदित्यनाथ यांचाही हात असावा अशी दबक्या आवाजातील चर्चा होती. कारण त्यामुळे भाजपला स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आला नाही. परिणामी मोदी पूर्वीइतके कणखर पंतप्रधान राहिले नाहीत. योगी यांना धक्का लावण्याचे धाडस त्यांच्यात उरले नाही. (narendra modi political successor)
संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर जसा देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला, तसाच खुलासा केजरीवाल यांच्या विधानानंतर अमित शाह यांनी केला होता. नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होतील असं त्यांनी म्हटलं होतं. (Devendra Fadnavees)
सप्टेंबरातल्या राजीनाम्याची चर्चा करण्यासाठी मोदी नागपूरला संघालयात गेले होते, असे संजय राऊत म्हणाले. आणि त्यांचा नेम बरोबर लागला. संजय राऊत यांनी स्वतःच्या पक्षाचे पाहावे, यापलीकडे त्यांच्याविरोधात फारसे कुणाला बोलता आले नाही. संजय राऊत यांच्या विधानाला विरोध करायचा म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना विरोध करायचा असा सरळ अर्थ निघतो. भले मोदी सगळ्यांना परमपूज्य असतील परंतु महाराष्ट्रातील नेत्यांना फडणवीसांचाच आशीर्वाद हवा आहे. ते पंतप्रधान होऊ नयेत, असं कसं म्हणायचं.
अडवाणी, जोशींच्या मार्गाने…
मोदी रिटायर होणार नाहीत, असं म्हणणारे भाजपमधील मोदीभक्त अडवाणींबद्दल बोलत नाहीत. खरेतर मोदी यांचं भाजपमधील युग सुरू झालं, तेव्हाच ७५ वर्षांचा अलिखित नियम केला होता म्हणे. त्यातूनच मार्गदर्शक मंडळ तयार झाले. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, यशवंत सिन्हा अशी दिग्गज मंडळी सत्तेच्या वर्तुळातून बाहेर फेकली गेली. अत्यंत अपमानास्पद रितीनं त्यांना प्रवाहाच्या बाहेर ढकललं गेलं. आणि याच भाजपमधील मंडळी संस्कृतीचं आणि वडिलधा-यांचा आदर राखण्याचं प्रवचन देतात. (narendra modi political successor)
अर्थात काही गोष्टी लिखित नसतात. ७५ वर्षांचा हा नियमही लिखित नाही. कारण याची चर्चा झाली, त्याचवेळी राजनाथ सिंह यांनी एका मुलाखतीत त्याचे स्पष्टीकरण दिले होते. असा कोणताही नियम किंवा दुरुस्ती भाजपच्या घटनेत झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. वस्तुस्थिती अशी आहे की, आजच्या घडीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपची घटना यापेक्षाही मोदी-शाह मोठे आहेत. भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता ते जाणतो. परंतु मोदींचे समर्थक सगळीकडे आहेत. पक्षात आहेत. मीडियात आहेत. म्हणून तर गोदी मीडिया म्हटलं जातं. तिथली मंडळी राजनाथ सिंह यांच्या वक्तव्याचा हवाला देऊन सांगतील, की बघा असा काही नियम नाही. त्यामुळं मोदींनी राजीनामा देण्याचा प्रश्नच कुठे येतो? (Devendra Fadnavees)
योगी विरुद्ध मोदी-शाह
केजरीवाल यांनी मोदी-शाह मिळून योगींचा कार्यक्रम करतील असं म्हटलं होतं. प्रत्यक्षात योगींनीच दोघांचा कार्यक्रम केल्याची राजकीय वर्तुळातील चर्चा आहे. त्यासंदर्भातील एक प्रसंग आहे. १४ जुलै २०२४ रोजी लखनौमध्ये भाजपची बैठक सुरू होती. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा बैठकीला उपस्थित होते. त्यावेळी उत्तर प्रदेशातील भाजपच्या खराब कामगिरीसंदर्भात दोन शीर्षस्थ नेत्यांनी वेगवेगळी कारणे सांगितली. (Devendra Fadnavees)
फाजील आत्मविश्वासामुळे उत्तर प्रदेशात भाजपचा पराभव झाला, असं योगी आदित्यनाथ म्हणाले. तर उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी वेगळाच सूर लावला. संघटनेपेक्षा सरकार मोठे बनले, त्याचा पक्षाला फटका बसल्याचे त्यांनी सांगितले. मौर्य यांची टिपणी ही राज्य सरकारच्या विरोधातील असल्याचे मानले गेले होते. तर योगींनी फाजील आत्मविश्वासाचा उल्लेख केला, तो थेट मोदी-शाह यांच्यासंदर्भात होता, असे राजकीय जाणकार सांगतात.
या दोघांच्या विधानाकडेही योगी विरुद्ध मोदी-शाह अशा स्वरुपात पाहिले जाते. कारण केशवप्रसाद मौर्य हे अमित शाह यांचे विश्वासू मानले जातात. (narendra modi political successor)
मोदींच्या उत्तराधिका-यांमध्ये चुरस
याच विषयाच्या संदर्भातील आणखी एक नोंद मुद्दाम घ्यायला हवी.
फेब्रुवारी २०२५ मध्ये इंडिया टूडेने `मूड ऑफ नेशन सर्व्हे घेतला. त्यामध्ये नरेंद्र मोदींचे उत्तराधिकारी म्हणून अमित शाह आणि योगी आदित्य नाथ यांच्यामध्ये चुरस दिसत होती. २६.८ टक्क लोकांनी अमित शाह यांना मोदींच्यानंतरचे पंतप्रधानपदाचे दावेदार म्हणून पसंती दिली. तर २५.३ टक्के लोकांनी योगी आदित्यनाथ यांच्या पारड्यात मत टाकले. याव्यतिरिक्त नितीन गडकरी १४.६ टक्के, राजनाथ सिंह ५.५ टक्के आणि शिवराजसिंह चौहान यांना ३.२ टक्के लोकांनी पसंती दिली होती. (Devendra Fadnavees)
आता मोदींनी संघ मुख्यालयाला भेट दिली तेव्हा त्यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस होते. तिथला फोटो पाहून भाजपमधल्या अनेकांनाही देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये नरेंद्र मोदी यांचा उत्तराधिकारी दिसू लागला. तसे सूचित करणा-या काही पोस्ट समाजमाध्यमांवर दिसून आल्या. संजय राऊत यांनी त्याचा थेट उल्लेख केला. मोदींच्या उत्तराधिका-यांच्या यादीमध्ये अमित शाह, योगी आदित्यनाथ, नितीन गडकरी यांच्याबरोबर आता देवेंद्र फडणवीस यांचेही नाव समाविष्ट झाले आहे. बाकीच्या तिघांना मागे टाकून देवेंद्र फडणवीस पुढे जाऊ शकतात. तेवढी क्षमता त्यांच्याकडे आहे. शिवाय संघाचा वरदहस्त आहे.
सहा महिन्यांचा अवकाश आहे. तोपर्यंत वाट पाहावी लागेल.
हेही वाचा :
‘अडवाणी-जोशीं’ चा नियम मोदींना लागू होणार का?
सर्वोच्च न्यायालयाने प्रयागराज प्राधिकरणाचे उपटले कान