नवी दिल्ली : ईशान्य दिल्लीतील मुस्तफाबाद येथे एक इमारत कोसळली. त्यात किमान ११ जणांचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांच्या मते, १४ जणांना वाचवण्यात यश आले आहे. शनिवारी (१९ एप्रिल) पहाटे ही दुर्घटना घडली.(Building Collapsed)
घटनास्थळी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), दिल्ली पोलिस आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या बचाव पथकांकडून शोध आणि बचावकार्य सुरू आहे. इमारतीखाली बेपत्ता झालेल्यांचा शोध सुरू आहे. जखमींना सुरक्षितरित्या बाहेर काढून त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे.
शुक्रवारी रात्री उशिरा नवी दिल्लीच्या काही भागात धुळीचे वादळ आणि मुसळधार पाऊस झाला. याचा या इमारतीला बसला आणि इमारत कोसळल्याचे मानले जात आहे. (Building Collapsed)
ईशान्य दिल्लीतील शक्ती विहार परिसरात ही बहुमजली निवासी इमारत आहे. अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.
एका पोलिस सूत्राने सांगितले की, तळमजल्यावरील दोन-तीन दुकानांमध्ये बांधकाम सुरू आहे. त्यामुळे इमारत कोसळली असावी. चार मजली इमारतीचा मालक तहसीन आणि त्याचे कुटुंब पहिल्या मजल्यावर राहतात तर उर्वरित इमारतीत भाडेकरू राहतात.
दिल्ली महानगरपालिकेने एका निवेदनात म्हटले आहे की ही इमारत सुमारे २० वर्षे जुनी होती आणि पूर्णपणे रहिवासी होती. (Building Collapsed)
चौकशीचे आदेश
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच मदत आणि बचावकार्य सुरू आहे. सर्व जखमींवर योग्य उपचारांची व्यवस्था करण्यात आली आहे, असे त्यांनी ‘एक्स’ वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
‘‘मुस्तफाबादमधील घटना दु:खद आणि दुर्दैवी आहे. घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांप्रति माझ्या मनापासून संवेदना. देव मृतांच्या आत्म्यांना शांती देवो. शोकमग्न कुटुंबांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो,’’ असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. (Building Collapsed)
‘आप’चे प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही शोकमग्न कुटुंबीयांबद्दल शोक व्यक्त केला.
“मी सर्व पक्ष कार्यकर्त्यांना मदत आणि बचाव कार्यात प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन करतो,” असे त्यांनी ‘एक्स’ वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
विरोधी पक्षनेत्या आतिशी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. मुस्तफाबादमधील ‘आप’ कार्यकर्त्यांना मदतकार्यात सहकार्य करण्याचे आवाहन केले.