नवी दिल्ली : भारताने बुधवारी (७ मे) पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या नऊ तळांवर हल्ला केला. तेथील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या दोन आठवड्यांनंतर हा हल्ला करण्यात आला. बुधवारी संरक्षण दलाने निवेदन जारी करून या ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती दिली आहे. (OPERATION SINDOOR)
या निवेदनानुसार, ‘‘काही वेळापूर्वी, भारतीय सशस्त्र दलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले. पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी तळांना या मोहिमेदरम्यान लक्ष्य केले गेले. या ठिकाणांहून भारताविरुद्ध दहशतवादी हल्ले करण्याचे नियोजन आणि निर्देश दिले जात होते.’’
‘‘आम्ही कोणत्याही पाकिस्तानी लष्करी सुविधांना लक्ष्य केलेले नाही. लक्ष्यांची निवड आणि अंमलबजावणीच्या पद्धतीमध्ये भारताने बराच संयम दाखवला आहे,’’ असेही त्यात म्हटले आहे. (OPERATION SINDOOR)
‘‘पहलगाम येथे झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे. या हल्ल्यात २५ भारतीय आणि एका नेपाळी नागरिकाची हत्या करण्यात आली होती. हा हल्ला करणाऱ्यांना जबर किंमत मोजावी लागेल, असे वचन भारत सरकारने दिले होते. देशाच्या या वचनबद्धतेचे आम्ही पालन करत आहोत,’’ असे त्यात म्हटले आहे.
भारतीय लष्कराच्या अतिरिक्त जनसंपर्क महासंचालकांनी X वर एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये ऑपरेशन सिंदूर असे लिहिलेले चित्र पोस्ट केले आहे. #PahalgamTerrorAttack. न्याय मिळाला. जय हिंद!,” असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. (OPERATION SINDOOR)
बुधवारी भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केल्यानंतर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “जगाने दहशतवादाबद्दल शून्य सहनशीलता दाखवली पाहिजे.”
अनेक स्फोट
‘पीओके’मधील मुझफ्फराबाद येथून वृत्त देणाऱ्या रॉयटर्स वृत्तसंस्थेने म्हटले आहे की या दरम्यान अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत. पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्याने एआरवाय या वृत्तवाहिनीला सांगितले की, भारताने पाकिस्तानवर तीन ठिकाणी क्षेपणास्त्रांनी हल्ला केला आहे आणि पाकिस्तान प्रत्युत्तर देईल.
उड्डाणे वळवली, विमानतळे बंद
काही भारतीय विमानतळांवरील, विशेषतः भारत-पाकिस्तान सीमेजवळील आणि प्रमुख भारतीय हवाई दलाच्या तळांजवळील विमान वाहतूक प्रभावित झाली आहे. बुधवारी श्रीनगर विमानतळावरून आणि त्या भागातून कोणतीही नागरी उड्डाणे चालविली जाणार नाहीत, असे विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले.
कुठे हल्ले झाले?
भारताने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये ज्या नऊ दहशतवादी स्थळांवर हल्ला केल्याचा दावा केला आहे, त्यापैकी चार पाकिस्तान पंजाबमधील बहावलपूर आणि मुरीदके आणि पीओकेमधील मुझफ्फराबाद आणि कोटली असल्याचे सांगितले जाते. ही सर्व शहरे दहशतवाद्यांच्या छावण्या आहेत.