कोल्हापूर : प्रतिनिधी : जलजीवन मिशन योजनांचे देयके न मिळाल्याने उदयोन्मुख कंत्राटदाराने शेतात गळफास लावून आत्महत्या केली. हर्षल पाटील (वय ३५ वर्ष राहणार तांदुळवाडी तालुका वाळवा जि सांगली) असे या दुर्दवी कंत्राटदाराचे नाव आहे. (Contractors suicide)
महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत राज्यात शासनाने ‘हर घर जल’ ही योजना सुरू केली. सरकारी योजनेतील ही कामे सुशिक्षित बेरोजगार अभियंता,छोटे कंत्राटदार यांनी जवळपास पूर्ण केली आहेत. परंतु कंत्राटदरांनी पुर्ण केलेल्या कामांचे व तसेच केलेल्या कामांचे देयके देण्यासाठी शासनाकडे जवळपास एक वर्षांपासून निधीच उपलब्ध नाही. तसेच केंद्राने ही निधी देऊ शकत नाही असे पत्र राज्य शासनास धाडले आहे. (Contractors suicide)
हर्षल पाटील यांनीही जलजीवनची कामे घेतली होती आणि ती जवळपास पूर्ण केली आहेत. त्यांची शासनाकडे जवळपास एक कोटी ४० लाख रुपयांची देयके प्रलंबित होती. ही कामे पूर्ण करण्यासाठी त्याने काही नातलग आणि सावकारांकडून जवळपास ६५ लाखांचे कर्ज घेतले होते. कर्जाची परतफेड करण्यासंदर्भात तो तणावात होता. तसेच गेल्या अनेक दिवसांपासून तो त्यांच्या मित्रांना हे शासन पैसे देत नाही, इतर लोक मला पैशासाठी तगादा लावत आहेत. मी आत्महत्या करतो असे सांगत होता. तसेच याबाबत वडिलांना काय सांगू नका असे बोलत असे.
कर्जाचा तगादा वाढू लागल्याने हर्षल पाटीलने काल मंगळवारी २२जुलै २०२५ रोजी स्वताच्या शेतात जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. हर्षल हे घरात मोठे असल्याने त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. त्याच्या पश्चात पत्नी, पाच वर्षांची मुलगी,दोन लहान भाऊ व आई वडील असा भरलेला परिवार आहे .
या घटनेनंतर हर्षल पाटील याच्या परिवारास शासनाने तातडीने आर्थिक मदत देऊन त्याचे प्रलंबित देयके द्यावीत अशी मागणी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाने केली आहे. (Contractors suicide)
शासनाने सर्व विभागाकडील कंत्राटदारांची देयके तातडीने देण्याची व्यवस्था करावी अन्यथा आपण असे नवयुवक,उद्योजक, कंत्राटदार आपले जीवन संपवून टाकतील व आपले कुटुंब नाहक आर्थिक अडचणीत येतील याची शासनास फार मोठी किंमत चुकवावी लागेल असा इशारा महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना व महाराष्ट्र राज्य ग्रामीण पाणीपुरवठा संघटना राज्य अध्यक्ष इंजि मिलिंद भोसले , महासचिव सुनील नागराळे व सर्व पदाधिकारी यांनी शासनास दिला आहे