कोलकाता : भारतीय क्रिकेट संघाच्या सहायक प्रशिक्षकपदावरून उचलबांगडी करण्यात आलेले अभिषेक नायर पुन्हा आयपीएलमधील कोलकाता नाइट रायडर्स संघाकडे परतले आहेत. कोलकात्याच्या सपोर्ट स्टाफचे सदस्य म्हणून नायर काम पाहतील. भारताच्या सहायक प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेण्यापूर्वी नायर २०१८ ते २०२४ कोलकाता संघासोबतच काम करत होते. (Nayar in KKR)
भारतीय संघाच्या कसोटी क्रिकेटमधील सुमार कामगिरीचा आढावा घेतल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) नायर यांच्यासह तिघांसोबतचा करार रद्द केला होता. मागील वर्षी जुलैमध्ये भारतीय संघात दाखल झालेल्या नायर यांना एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच संघातून बाहेर जावे लागले. विशेष म्हणजे, भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनीच नायर यांची शिफारस केली होती. गंभीर कोलकाता संघाचे मुख्य प्रशिक्षक असताना त्यांनी नायर यांच्यासह काम केले होते. गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली कोलकाता संघाने २०२४ मध्ये तब्बल दहा वर्षांनंतर आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. सध्या चंद्रकांत पंडित हे कोलकात्याचे मुख्य प्रशिक्षक असून ड्वेन ब्राव्हो हे संघाचे मेंटॉर आहेत. नायर आता सपोर्ट स्टाफमध्ये या दोघांसोबत खेळाडूंची कामगिरी सुधारण्यासाठी प्रयत्न करतील. (Nayar in KKR)
कोलकाता संघाने शनिवारी ट्विट करून नायर यांचे संघात पुन्हा स्वागत केले आहे. आयपीएलमध्ये कोलकात्याचा पुढील सामना २१ एप्रिल रोजी गुजरात टायटन्ससोबत होणार असून या सामन्यापूर्वी नायर संघासोबत जोडले जातील. यंदाच्या आयपीएल मोसमामध्ये कोलकात्याने आतापर्यंत ७ सामन्यांत ३ विजय मिळवले असून गुणतक्त्यात कोलकात्याचा संघ सहाव्या स्थानी आहे. (Nayar in KKR)
हेही वाचा :
‘उसका जाने का समय आ गया’