- निळू दामले
दुबई तेल अवीव फ्लाईटवर काय घडलं? तेल अवीवला जाणारं फ्लायदुबई या कंपनीचं विमान ३० सप्टेंबर २०२६ रोजी दुबईवरून उडालं. ३.५ तासांचा प्रवास, १७० प्रवासी होते, बहुतेक इस्रायली होते.
स्मित मच्छर आणि हम्माम अल हम्मामी हे दोन पायलट होते.
विमान सुरु झाल्यावर काही वेळानं हम्मामनं खुर्चीच्या मागं ठेवलेला हातोडा हस्तगत केला आणि स्मित मच्छरवर हल्ला केला. संकट समयी काच फोडण्यासाठी हा हातोडा ठेवलेला असतो, तो लॉक्ड नसतो, खुल्ला असतो.
विमान वेगानं जमिनीकडं
हल्ला झाला,स्मित कोसळला. विमान वेगानं जमिनीकडं निघालं. ३४ हजार फुटावरून झपकन १४ हजार फुटावर आलं.
स्मितची किंचाळी ऐकून प्रवाशांमधे बसलेला एक पायलट कॉकपिटमधे गेला. त्यानं हम्मामच्या गळ्याभोवती कोपर गुंडाळून हम्मामला घुसमटवलं, त्याला निकामी केलं. त्याला बाजूला करून पायलटनं विमान सांभाळलं. आणखी पाच सेकंद गेले असते तर विमान कोसळलं असतं.
विमान वाचलं. प्रवासी वाचले. स्मितला हॉस्पिटलमधे दाखल करण्यात आलं, तो वाचला.
पत्रकार आणि राजकीय नेते सुसाट
विमान वाचवणाऱ्या माणसाला नेतान्याहू भेटले. तो एक प्लंबर होता असं नेतान्याहू म्हणाले.
नरेंद्र मोदीनी उपचार घेत असलेल्या मच्छरला फोन करून त्याचे आभार मानले.
नेतान्याहूनी जाहीर केलं की इराणनं विमान पळवण्याचा, अपघात घडवण्याचा डाव रचला होता.
लगोलग डोनल्ड ट्रंपनीही जाहीर केलं की या घटनेत इराणचा हात आहे.
इराणनं जाहीर केलं या घटनेचा इराणशी संबंघ नाही.
हम्मानीकडं चाकू कुठून आला इत्यादी प्रश्न लोकांनी विचारल्याचं माध्यमांत प्रसिद्ध झालं.
इस्रायल, ओमान, अमिराती, सौदी पोलिसांनी चौकशीही सुरु केली नव्हती. घटनेनंतर काही मिनिटातच माध्यमं, नेतान्याहू, ट्रम्प,मोदी इत्यादी लोक दणादण बोलत सुटले.
OO
विमानात ४ पायलट प्रवासी म्हणून प्रवास करत होते. पायलट नव्या ड्यूटीसाठी, आधीची ड्यूटी संपवून कुठल्या ना कुठल्या तरी विमानतळाकडं जात असतात. त्यांना कठीण प्रसंगी कसं वागायचं याचं प्रशिक्षणही दिलेलं असतं. एक पायलट सरसावला.
दुबई विमानतळावर सुरक्षा ढिली होती?
मी माझा अनुभव सांगतो. मी एकदा जेरुसलेमला जात होतो. माझ्याकडं रीतसर व्हिसा होता. तरीही मुंबई विमानतळावर मला जवळ जवळ दीडेक तास रोखून ठेवलं. माझी उलट तपासणी केली गेली. एका मराठी जाणणाऱ्या सिक्युरिटीवाल्यानं माझी कसून चौकशी केली. अनंत प्रश्न विचारून भंडावून सोडलं.
मी पुस्तकं लिहितो म्हटल्यावर त्यानं पुस्तकांची नावं विचारली. त्यानं इंटरनेटवर जाऊन त्या पुस्तकांची माहितीही घेतली. मी जाम वैतागलो. त्या माणसाला म्हणालो की झक मारली आणि निघालोय, मी नाही जात, मी परत जातो. तो माणूस हसला. म्हणाला असा अविचार करू नका. आमची सिक्युरिटी फार कडक असते. सर्वांचीच अशी चौकशी आम्ही करतो.
जेरुसलेममधे एका दहशतवाद्यानं आत्मघाती हल्ला केला होता, त्याची माहिती गोळा करून त्यावर लिहिण्यासाठी मी जेरुसलेमला निघालो होतो.
मुंबई विमानतळावर इस्रायलच्या विमानांसाठी कोपऱ्यात एक स्वतंत्र गेट होतं.
दुसरा अनुभव अगदी नुकताच. सिॲटल ते ॲम्स्टरडॅम प्रवास करत होतो. माझ्या पाठी दोन सीट सोडून एक पायलट बसला होता. तो युनिफॉर्ममधेच होता. ॲमस्टरडॅममधे जाऊन तो दुसऱ्या पायलटची सुटका करणार होता.
नंतर ॲम्स्टरडॅम ते मुंबई फ्लाईट होतं. दोन पायलट युनिफॉर्ममधे त्या विमानात होते. ते मुंबईतल्या पायलटना रिलीव्ह करण्यासाठी निघाले होते.
खाली उतरताना एका पायलटकडं मी हळूच ३० सप्टेंबर घटनेचा उल्लेख केला. तो काय बोलला ते नीट समजलं नाही. आमच्या फ्लाईटवर फ्लायदुबई विमानासारखी घटना घडली असती तर तो पायलट नक्कीच सरसावला असता. तो पायलट धिप्पाड होता.
हम्मामी कोण होता?
हम्मामी ओमानी होता.
त्यानं हल्ला कां केला याची हकीकत ओमान, सौदी, अमिराती किंवा इस्रायली पोलिसानी सांगितलेली नाही.
अमेरिकेतल्या वर्तमानपत्रांनी मिळवलेल्या माहिती नुसार हम्मामीकडं अयमान जवाहिरीचा फोटो सापडला. जवाहिरी हा ओसामा बिन लादेनचा दोन नंबर होता. ओसामा मारला गेल्यावर जवाहिरी अल कायदाचा प्रमुख होता. हम्मामीवर अल कायदाचा प्रभाव होता. हा प्रभाव केव्हापासून होता याचा तपशील अजून पेपरांना मिळालेला नाही. पण हम्मामी कुठल्याही इस्लामी संघटनेचा कार्यकर्ता होता असा पुरावा मिळालेला नाही येवढं नक्की.
गोळा झालेल्या माहिती नुसार तो ‘लोन वुल्फ’ या वर्गातला होता असं लक्षात येतं. एकटा कार्यकर्ता.
अल कायदा हे मुक्त विद्यापीठ
इस्लाम, राजकारण इत्यादीबद्दलचा अल कायदाचा विचार ओसामानं जाहीरपणे नेटवर टाकला होता. गैर इस्लामी सत्ता हिंसक मार्गानं उलथवणं हे मुख्य सूत्र; शस्त्र कशी तयार करावीत; शस्त्रं कशी वापरावीत; याची माहिती अल कायदानं नेटवर टाकली होती.
त्या अर्थानं बघितलं तर अल कायदा हे मुक्त विद्यापीठ होतं. अभ्यासक्रम, विचार, शिक्षक, सारं काही नेटवर खुलं होतं. संस्था काढावी, अभ्यासक्रम आखावा, प्रशिक्षण द्यावं, चिंतन बैठकांमधून विचार पक्का करावा असली भानगडच नव्हती. ज्यानं त्यानं आपली हिंसक कारवाई आखावी, पार पाडावी. अशा रीतीनं तयार झालेले मुक्त विद्यार्थी अमेरिकेत, इंग्लंडमधे तयार झाले. त्यांनी व्यक्तिगत कारवाया केल्या. इंग्लंडमधे एका माणसानं चक्क सुरी वापरून खासदाराला ठार मारलं होतं.
हिंसेचा वापर करणारे अनेक गट जगभर आहेत. प्रत्येक गटाचं स्वतंत्र ध्येय, स्वतंत्र शैली, स्वतंत्र विचार असतो. अमिराती, ओमान, कतार, सौदी अरेबिया, इजिप्त, पॅलेस्टाईन, पाकिस्तान अशा अनेक ठिकाणी हिंसक गट आहेत आणि भारावलेले मुक्त सैनिकही आहेत. त्यांना बोलविता धनी नसतो. बोलतात तेच आणि धनीही तेच असतात.
हम्मामी हा त्यापैकी एक. असं आत्ता दिसतंय.