जमीर काझी : मुंबई : विमान अपघाताच्या काही दिवसांपूर्वीपासून त्यांच्या पक्षातील चार नेते अजित दादांना त्रास देत होते, त्यांना कंट्रोल करणे शक्य नसल्याने त्यांना पक्षावर ताबा मिळवता आला नव्हता, असा खळबळजनक आरोप आमदार रोहित पवार यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना केला.
आताही त्यांचे प्रयत्न सुरू असले तरी सुनेत्रा काकींना कमी समजू नका, असा इशाराही त्यांनी दिला. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताच्या घटनेची पारदर्शक चौकशी व्हावी, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी शुक्रवारी विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली. अपघाताबाबत संशय उपस्थित करणाऱ्या बाबीचे निवेदन दिले. त्यानंतर विधिमंडळाच्या आवारात पत्रकाराशी बोलताना ते म्हणाले, ‘बारामतीतील दुर्दैवी विमान अपघाताबाबत सविस्तर चर्चा केली असून त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी आशा आहे. (Four leaders were harassing Ajit Pawar)
भाषण करण्यापेक्षा एफआयआर नोंदणीसाठी ताकद लावावी
दादांच्या पक्षातील नेत्यांनी भाषण करण्यापेक्षा एफआयआर नोंदवण्यासाठी ताकद लावावी, बारामतीला जाण्याची वेळ येऊ नये म्हणून आपण स्वतः मुंबईत एफआयआर दाखल करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र सरकारकडून त्याला विरोध झाला आहे. आता सत्तेत बसलेल्या या नेत्यांनी त्यासाठी प्रयत्न करावेत, असा टोला लगावला. (Four leaders were harassing Ajit Pawar)
देवगिरी बंगल्यात अजित पवारांचे स्मारक करावे
रोहित पवार म्हणाले, मुख्यमंत्र्यांसमोर अजित पवार गेली २०-२२ वर्षे ज्या देवगिरी बंगल्यात राहत होते, तेथे त्यांचे स्मारक उभारावे. विधानसभा अध्यक्षांनी व्यक्त केलेल्या इच्छेनुसार त्यालाही सरकारने मान्यता द्यावी. अजित पवारांनी दिलेला फंड तातडीने वर्ग करून विमानतळ अत्याधुनिक करावा आणि त्याला त्यांचे नाव द्यावे. तसंच तळेगाव-चाकण-शिक्रापूर आणि पुणे-शिरूर एलिवेटेड मार्गांना अजित पवारांचं नाव द्यावे. त्याचबरोबर सुरक्षा अधिकारी जाधव यांच्या पत्नीला कायम नोकरी, फ्लाईट अटेंडंट माळी यांच्या मुलाला चांगल्या पगाराची नोकरी, को-पायलट शांभवी पाठक यांच्या कुटुंबांना सरकारी पाठबळ द्यावे, अशा मागण्या केल्या.रोहित पवार यांनी मृत अधिकाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आपण घेतली आहे. मात्र सरकारनेही मदतीचा हात पुढे करावा, अशी विनंती केली. शेवटी त्यांनी स्पष्ट केलं की, या संपूर्ण विमान अपघाताची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी झाली तरच सत्य परिस्थिती जनतेसमोर येईल. रोहित पवार यांनी मुंबई किंवा बारामतीमधील कोणत्याही पोलीस ठाण्यात अद्याप तक्रार का नोंदवली जात नाही, असा सवाल उपस्थित केला. (Four leaders were harassing Ajit Pawar)
चांडाळ चौकडी : लवांडे
अजित दादांच्या पक्षातील चांडाळ चौकडी पक्षावर कब्जा घेऊ पहात आहे, मात्र आम्ही आणि महाराष्ट्रातीलल जनता ते कधीही होऊ देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी दिला. त्यांचा रोख प्रफुल्ल पटेल,सुनील तटकरे, छगन भुजबळ व धनंजय मुंढे यांच्यावर असल्याचे सांगितले जात आहे.