कोलकाता : भारताचा माजी यष्टिरक्षक वृद्धिमान साहाने शनिवारी सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. वृद्धिमान शनिवारी रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेमध्ये बंगाल संघाकडून पंजाबविरुद्ध अखेरचा देशांतर्गत सामना खेळला. (Wriddhiman Saha)
वृद्धिमानने ४० कसोटी व ९ वन-डे सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. कसोटीत त्याच्या नावे ३ शतके व ६ अर्धशतकांसह १,३५३ धावा जमा असून त्याने ९२ झेल व १२ यष्टिचितही केले आहेत. डिसेंबर २०२१ मध्ये तो भारताकडून अखेरचा सामना खेळला. त्यानंतरही, तो आयपीएल व देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळत होता. त्याने कारकिर्दीत १४२ प्रथमश्रेणी सामन्यांमध्ये ४१.४३ च्या सरासरीने ७,१६९ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर १४ शतके व ४४ अर्धशतके जमा असून नाबाद २०३ ही त्याची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. याबरोबरच, यष्टिरक्षक म्हणून त्याने ३४६ झेल व ३८ यष्टिचितही केले आहेत. (Wriddhiman Saha)
आयपीएलमध्ये वृद्धिमान १७ वर्षांमध्ये एकूण पाच संघांकडून खेळला. यांपैकी चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स या अनुक्रमे २०११ व २०२२ च्या आयपीएल विजेत्या संघांमध्ये त्याचा सहभाग होता. शनिवारी ४० वर्षांच्या वृद्धिमानने आपल्या कारकिर्दीवर अखेरचा पडदा टाकला. ‘मागील २८ वर्षांमध्ये मला देश, राज्य, जिल्हा, क्लब, विद्यापीठ, शाळा या संघांकडून क्रिकेट खेळायला मिळणे हा माझा सन्मान होता. आज मी जो काही आहे, तो क्रिकेटमुळेच आहे. हा संपूर्ण प्रवास संस्मरणीय होता. प्रत्येक गोष्टीचा कधी ना कधी शेवट येतोच. म्हणूनच मी आज सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत आहे,’ अशी प्रतिक्रिया वृद्धिमानने दिली. (Wriddhiman Saha)
शनिवारी पंजाब-बंगाल रणजी सामन्यामध्ये अखेरच्या वेळी मैदानात उतरणाऱ्या वृद्धिमानला दोन्ही संघातील खेळाडूंनी मानवंदना दिली. यावेळी बंगाल क्रिकेट संघटनेतर्फे त्याचा सत्कारही करण्यात आला. भारताचा सध्याचा यष्टिरक्षक रिषभ पंत आणि वेगवान गोलंदाज महंमद शमी यांनी वृद्धिमानच्या सन्मानार्थ पोस्ट लिहिल्या आहेत. (Wriddhiman Saha)
A special and emotional farewell
Guard of honour and felicitation for Bengal wicketkeeper-batter Wriddhiman Saha who is playing his final First-class match
#RanjiTrophy | @IDFCFIRSTBank | @Wriddhipops
Scorecard
https://t.co/GAuG6Mqk8H pic.twitter.com/DGCJRh4QWT
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 31, 2025