मेलबर्न : ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीमध्ये सोमवारी अग्रमानांकित यानिक सिनरने संघर्षपूर्ण विजयासह उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित केला. महिला एकेरीमध्ये द्वितीय मानांकित इगा स्वियातेक उपांत्यपूर्व फेरीत पोहोचली असून सहाव्या मानांकित एलेना रायबाकिनाला चौथ्या फेरीत पराभव पत्करावा लागला. (Jannik Sinner)
इटलीच्या गतविजेत्या सिनरने चौथ्या फेरीत डेन्मार्कच्या होगर रुनचा ६-३, ३-६, ६-३, ६-२ असा पराभव केला. हा सामना ३ तास १३ मिनिटे रंगला. सामन्याच्या तिसऱ्या सेटमध्ये ३-२ असा आघाडीवर असताना सिनरला ‘मेडिकल ब्रेक’ घ्यावा लागला. सुमारे ११ मिनिटांनंतर पुन्हा खेळ रूजू झाला. मात्र, या ब्रेकचा परिणाम खेळावर होऊ न देता सिनरने लागोपाठ दोन सेट जिंकत विजयावर शिक्कामोर्तब केले. पुरुष एकेरीत अमेरिकेच्या बेन शेल्टननेही उपांत्यपूर्व फेरी गाठली. चौथ्या फेरीत फ्रान्सच्या गेल माँफिलिसविरुद्ध शेल्टन ७-६(७-३), ६-७(३-७), ७-६(७-२), १-० असा आघाडीवर असताना माँफिलिसने सामना सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शेल्टन उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला. (Jannik Sinner)
महिला एकेरीत पोलंडच्या स्वियातेकने स्पेनच्या इव्हा लिसला ६-०, ६-१ असे सहज पराभूत केले. उपांत्यपूर्व फेरीत स्वियातेकचा सामना अमेरिकेच्या आठव्या मानांकित एमा नाव्हारोशी होईल. नाव्हारोने नवव्या मानांकित रशियाच्या दारिया कासात्किनाचा तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत ६-४, ५-७, ७-५ असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. अन्य सामन्यात अमेरिकेच्या १९ व्या मानांकित मॅडिसन कीजने कझाखस्तानच्या सहाव्या मानांकित एलिना रायबाकिनाला ६-३, १-६, ६-३ असे हरवले. उपांत्यपूर्व फेरीत ती युक्रेनच्या २८ व्या मानांकित एलिना स्विटोलिनाविरुद्ध खेळणार आहे. स्विटोलिनाने रशियाच्या व्हेरॉनिका कुडेरमेटोवाचा ६-४, ६-१ असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. (Jannik Sinner
हेही वाचा :
फलंदाजी क्रमामध्ये बदल शक्य