माजी लष्करप्रमुख (चीफ ऑफ आर्मी स्टाफ) जनरल एम. एम. नरवणे यांचे अप्रकाशित आत्मचरित्र Four Stars of Destiny लोकसभेतील मोठ्या गदारोळास कारणीभूत ठरले. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत या अप्रकाशित पुस्तकातील काही उतारे उद्धृत केले होते. The Caravan मासिकातील एका लेखात त्यासंदर्भातील उतारे प्रसिद्ध झाले होते. नरवणे यांनी अप्रकाशित पुस्तकात काय म्हटले आहे आणि संसदेत यावरून काय घडले, याचा ऊहापोह करणार आहोत.
विजय चोरमारे
सतत पाकिस्तानला इशारे देणारे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार चीनचा विषय आला की शेपूट घालते, हे वारंवार दिसून आले आहे. चीनने भारतीय हद्दीत घुसखोरी केलेलली असतानाही मागे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी – ना कोई घूसा था, ना कोई घूसा हुआ है…. असे विधान करून आपली असहाय्यता व्यक्त केली होती. जनरल नरवणे यांनी पंतप्रधानांसह संरक्षणमंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार वगैरे सगळ्यांनीच कशी चीनच्या घुसखोरीनंतर पाठ फिरवली, हे पुस्तकात स्पष्ट केले आहे. त्यावरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु लोकसभा अध्यक्षांनी आणि सत्ताधा-यांनी राहुल गांधींना त्यासंदर्भात बोलू दिले नाही. राहुल गांधी त्यासंदर्भात वारंवार बोलण्याचा प्रयत्न करू लागले, परंतु सत्ताधा-यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. सोमवारीही याच मुद्द्यावरून लोकसभेचे दिवसभरातील कामकाज तहकूब करण्यात आले.
काँग्रेसवरील देशद्रोहाच्या आरोपावर राहूल गांधींचे प्रत्युत्तर
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी आपले भाषण सुरू करताना या उताऱ्यांचा उल्लेख केला. भाजपकडून काँग्रेसवर “देशद्रोहाचा” आरोप केला जात असताना, त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी त्यांनी हे उतारे वाचून दाखवले. पुस्तकात उल्लेख असलेल्या “डोकलाममध्ये चिनी रणगाडे” या वाक्याचा विशेष उल्लेख केला. आपल्या म्हणण्याला आधार म्हणून राहुल गांधी यांनी The Caravan मासिकाच्या प्रतीही सभागृहात दाखवल्या. (General Naravane’s writing on Chinese intrusion)
यावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शाह यांनी तात्काळ आक्षेप घेतला. राहुल गांधी ज्या पुस्तकाचा उल्लेख करत आहेत, ते पुस्तक अधिकृतपणे प्रकाशित आणि प्रमाणित झाले आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
जनरल नरवणे यांचे हे आत्मचरित्र गेल्या एक वर्षापेक्षा जास्त काळापासून केंद्र सरकारच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.
राजनाथ सिंह म्हणाले, “हे पुस्तक प्रकाशित झाले आहे की नाही, हे त्यांनी स्पष्ट करावे. हे पुस्तक अजून प्रकाशित झालेले नाही. त्यामुळे ते त्यातून उद्धरण देऊ शकत नाहीत.” पुढे ते म्हणाले, “मी खात्रीने सांगतो की हे पुस्तक अद्याप प्रकाशित झालेले नाही.” हे सर्व घडत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात उपस्थित होते.
अमित शाह यांनीही हस्तक्षेप करत, “जे पुस्तक अजून प्रकाशितच झालेले नाही, त्यातून राहुल गांधी कसे उद्धरण देऊ शकतात?” असा सवाल उपस्थित केला.लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी नेहमीप्रमाणे मंत्र्यांच्या भूमिकेशी सहमती दर्शवत हस्तक्षेप केला. ते म्हणाले की, “नियम आणि परंपरांनुसार, वृत्तपत्रातील कात्रण, पुस्तके किंवा इतर संदर्भ जे अधिकृत व प्रमाणित नाहीत, त्यांचा उल्लेख सभागृहात करता येत नाही.”
मात्र राहुल गांधी यांनी The Caravan मासिकाने दिलेले उतारे “१०० टक्के खरे” असल्याचा दावा केला. “या पुस्तकात राजनाथ जी यांचाही उल्लेख आहे.” असे राहुल गांधी म्हणाले. काँग्रेसच्या इतर खासदारांनीही राहुल गांधींना लेखातील उतारे वाचण्यास संमती देण्याची विनंती सभापतींना केली. समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश यादव यांनीही राहुल गांधींना पाठिंबा दिला. चीनशी संबंधित मुद्द्यांवर बोलण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली. (General Naravane’s writing on Chinese intrusion)
सध्या हे आत्मचरित्र संरक्षण मंत्रालयाकडून तपासणी प्रक्रियेत आहे. ही तपासणी प्रक्रिया नेहमीची असली, तरी Four Stars of Destiny या पुस्तकात अग्निपथ योजना तसेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) चिनी सैन्याच्या हालचालींशी संबंधित संवेदनशील माहिती आहे. त्यामुळे वाद निर्माण झाला आहे, असे The Print ने एका वृत्तांतामध्ये म्हटले आहे. एक वर्षापासून केंद्रसरकारने ते प्रकाशित करण्यासाठी परवानगी दिलेली नाही, यावरून त्याच्या वादग्रस्ततेची कल्पना येऊ शकते.
जनरल नरवणे यांच्या पुस्तकातील वादग्रस्त भाग
जनरल नरवणे यांच्या अप्रकाशित आत्मचरित्रातील द कारवान मासिकाने छापलेला वादग्रस्त भाग आहे. त्यात काय म्हटले आहे पाहूया. ३१ ऑगस्ट २०२० रोजी रात्री ८.१५ वाजता, भारतीय लष्कराच्या नॉर्दर्न कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल योगेश जोशी यांना एक फोन आला. त्या फोनवरील माहिती ऐकून ते गंभीरपणे चिंताग्रस्त झाले. चीनचे चार रणगाडे (टँक्स) पायदळाच्या संरक्षणासह पूर्व लडाखमधील रेचिन ला कडे जाणाऱ्या एका अतिशय अवघड, उंच डोंगराळ रस्त्यावरून पुढे सरकू लागले होते.योगेश जोशी यांनी ही हालचाल तात्काळ लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांना कळवली. परिस्थिती किती गंभीर आहे, हे नरवणे यांनी लगेच ओळखले. हे चिनी रणगाडे कैलास रेंजवरील भारतीय लष्कराच्या ताब्यातील ठिकाणांपासून केवळ काहीशे मीटर अंतरावर आले होते. हीच ती रणनीतीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची उंच जागा होती, जी काही तास आधीच भारतीय सैन्याने चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीशी धोकादायक शर्यत करून ताब्यात घेतली होती. (General Naravane’s writing on Chinese intrusion)
नरवणे यांचा राजनाथसिंह, डोभाल, रावत, जयशंकर यांच्याशी संपर्क
वादग्रस्त प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC)—जी भारत आणि चीनमधील प्रत्यक्ष सीमारेषा मानली जाते—या भागात प्रत्येक मीटर उंचीला मोठे लष्करी महत्त्व असते. जास्त उंची म्हणजे जास्त रणनीतिक वर्चस्व. भारतीय सैनिकांनी एक प्रकाशमान गोळी (इल्यूमिनेटिंग राउंड) डागली. ही गोळी म्हणजे इशारा देण्याचा प्रकार होता. मात्र त्याचा काहीही परिणाम झाला नाही. चिनी सैन्य पुढेच सरकत राहिले. यानंतर जनरल नरवणे यांनी अत्यंत तातडीने भारतातील राजकीय आणि लष्करी नेतृत्वाला फोन करण्यास सुरुवात केली. त्यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत, आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी संपर्क साधला.
आपल्या अद्याप अप्रकाशित आत्मचरित्रात Four Stars of Destiny मध्ये नरवणे लिहितात, “मी प्रत्येकालाच एकच प्रश्न विचारत होतो – ‘माझे आदेश काय आहेत?’” परिस्थिती झपाट्याने बिघडत होती आणि स्पष्ट आदेशांची नितांत गरज होती. एक ठरलेली प्रोटोकॉल पद्धत अस्तित्वात होती. नरवणे यांना स्पष्ट आदेश होते की “वरच्या सर्वोच्च पातळीवरून परवानगी मिळेपर्यंत गोळीबार करायचा नाही.” मात्र वरिष्ठ पातळीवरून कोणतेही स्पष्ट निर्देश मिळाले नाहीत. मिनिटागणिक वेळ निघून जात होता.
नरवणेंची राजनाथसिंह यांना स्पष्टआदेश देण्याची विनंती
रात्री ९.१० वाजता योगेश जोशी यांचा पुन्हा फोन आला. चिनी रणगाडे आणखी पुढे आले होते आणि आता ते रेचिन ला पासपासून एक किलोमीटरपेक्षाही कमी अंतरावर होते. रात्री ९.२५ वाजता नरवणे यांनी पुन्हा एकदा राजनाथ सिंह यांना फोन करून “स्पष्ट आदेश देण्याची विनंती” केली. पण तरीही कोणतेही ठोस निर्देश मिळाले नाहीत. ही घटना भारत-चीन सीमावादातील त्या क्षणांची तीव्रता, अनिश्चितता आणि निर्णयातील विलंब किती धोकादायक ठरू शकतो, हे स्पष्टपणे दाखवते.
तर एकूण हे प्रकरण असं आहे. चीनला लाल आँखे दाखवण्याची भाषा करणारे, प्रत्यक्षात चीनने घुसखोरी केली तेव्हा त्याकडं त्यांनी पाठ फिरवली. आणि हेच लोकांसमोर येऊ द्यायचं नसल्यामुळं त्यांनी राहूल गांधी यांना अडवण्याचा प्रयत्न केला. (General Naravane’s writing on Chinese intrusion)