मुंबई : राज्य सरकारमधील काही मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी हनी ट्रॅपचे बळी ठरले आहेत. आमच्याकडे पुरावे आहेत. सरकार मात्र हे प्रकरण लपवत आहे. आम्ही सरकारकडे कारवाई करण्याची मागणी करत आहोत, मात्र ते करायला नाही. या गोष्टी आम्ही आता जनतेसमोर या गोष्टी मांडू, असा इशारा काँग्रेस नेते, नाना पटोले यांनी विधिमंडळाबाहेर माध्यमांशी बोलताना दिला. (Honey trap case)
ते म्हणाले, “हनी ट्रॅपप्रकरणातील सर्व अधिकाऱ्यांकडून महाराष्ट्राची गोपनीय कागदपत्रे देशविरोधी लोकांच्या हाती पडलेली आहेत. आम्ही यासंदर्भात अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सभागृहात निवेदन देण्यास सांगितले होते. मात्र यासंदर्भात सभागृहात कसलेही निवेदन आलेले नाही.”
पटोले यांनी हनी ट्रॅपसंदर्भात आमच्याकडे ठोस पुरावे असल्याचा दावा केला. तथापि, आम्ही कोणाच्या चारित्र्यावर बोलणार नाही. आमचे म्हणणे एवढेच आहे की सरकारने यावर कारवाई केली पाहिजे. अन्यथा विरोधी पक्ष म्हणून आम्हाला या सगळ्या गोष्टी जनतेसमोर आणाव्या लागतील. अशा संबंधित घटनांची वाच्यता झाल्यावर अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज डिलिट करण्यात येत आहेत, असा आरोपही पटोले यांनी केला. (Honey trap case)
जनसुरक्षा विधेयकाला आमचा विरोधच
जनसुरक्षा विधेयकाला आमचा विरोधच आहे, अशी भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली. विधानसभेत विरोध न दर्शवल्याने गटनेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांना काँग्रेस हायकमांडने नोटीस बजावल्याचे बोलले जाते, याकडे लक्ष वेधले असता पटोले यांनी, “मला कुठलीही माहिती नाही. आम्ही जनसुरक्षा विधेयकाला आधीच विरोध दर्शवला आहे,” असे सांगितले.
सरकारने भूमिका स्पष्ट करावी : दानवे
राज्यातील तब्बल ७२ सनदी अधिकारी, राजकीय नेते तसेच आजी आणि माजी मंत्रीही ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली आहे. ही बाब खूप गंभीर आहे. सरकारने यावर भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गुरुवारी (१७ जुलै) विधान परिषदेत केली. (Honey trap case)
दानवे म्हणाले, राज्यातील राजकीय नेते व काही वरिष्ठ स्तरावरील अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची चर्चा आहे. पहलगाम हल्ल्याच्या वेळेस असे ट्रॅपिंग करणारे लोकं केंद्र सरकारने पकडले होते. अशा हनी ट्रॅपमुळे राज्याची प्रशासकीय स्तरावरील गुप्त माहिती व महत्त्वाच्या फाइल बाहेर गेल्याची माहिती आहे. ठाणे आणि नाशिकमध्ये पोलिसांकडून याबाबत चौकशी झाली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.