मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून राज्यात सातत्याने चर्चेत व वादाच्या पडलेल्या बीड जिल्ह्यातील भाजपातील नेत्यांमधील सुंदोपसुंदी आता उघडपणे चव्हाट्यावर आली आहे. मंत्री पंकजा मुंडे आणि आष्टीचे आमदार सुरेश धस यांच्यात आत्तापर्यंत अंतर्गत सुरू असलेला कलहाने आता उघड स्वरूप घेतले आहे. सुरेश धस हे जाणीवपूर्वक आपली आणि पक्षाची सातत्याने बदनामी करत असून त्यांना पक्षश्रेष्ठींनी समज द्यावी, अशी मागणी मुंडे यांनी केली. तर धस यांनी मुंडे या आपल्यावर खोटे आरोप करत असून विधानसभेत त्यांनी पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार केला होता.त्यांच्याबाबत आपण पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले.(Pankaja V/s Dhas)
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे बीड जिल्हा गेल्या तीन महिन्यापासून सातत्याने वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिकी कराड यांच्याशी असलेले घनिष्ठ संबंध व अन्य विविध भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राजीनामा द्यावा लागला. त्यासाठी सुरेश धस हे सातत्याने पाठपुरावा करत होते. धनंजय मुंडे यांच्याबरोबरच त्यांची बहीण व मंत्री पंकजा मुंडे यांच्यावरही त्यांची अप्रत्यक्ष टीका करत होते. मात्र पंकजा मुंडे यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सुरेश धस यांच्यावर उघडपणे टीका केली. (Pankaja V/s Dhas)
धस यांनी जाणीवपूर्वक माझी, परळी मतदारसंघ आणि पक्षाची बदनामी सुरू केली आहे, असा आरोप पंकजा यांनी केला आहे. देशमुख प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी सखोल तपासाचे ग्वाही दिली असतानाही सातत्याने हे प्रकरण धस यांनी माध्यमांमध्ये चर्चेत ठेवले. त्यामुळे पक्षाची आणि जिल्ह्याची बदनामी झाली आहे त्या विरोधात पक्षश्रेष्ठीकडे तक्रार केली असून त्यांनी त्यांना समज द्यावी ,अशी मागणी केली असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. नेहमी कॅमेऱ्यावाल्यांना सोबत घेऊन फिरणाऱ्या धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट गुपचूपपणे का घेतली होती ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. (Pankaja V/s Dhas)
त्यांच्या टीकेवर सुरेश धस यांनीही विधिमंडळाच्या आवारात पत्रकारांशी बोलताना जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, ‘मी पंकजा किंवा अन्य कुणाचीही बदनामी करत नाही. तर बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक गुन्हेगारी, खंडणी, खून, मारामारीचे प्रकार हे परळीमध्येच घडत आहेत. त्यामुळे तेथील गुन्हेगारीला लगाम घालणे,जरुरी आहे. त्याच्या पाठीशी असणाऱ्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे, अशी आपली मागणी आहे. देशमुख हत्याप्रकरणातील आरोपींना फासावर लटकवेपर्यंत आपली लढाई चालूच राहणार आहे.’
ते म्हणाले की पंकजा यांनी विधानसभेत पक्षाच्या उमेदवाराऐवजी शिट्टी चिन्ह असलेल्या उमेदवाराचा प्रचार केला होता. मी आत्तापर्यंत संयम बाळगला होता, पण आता त्यांच्याविरोधात पक्षश्रेष्ठीकडे तक्रार करणार आहे, असेही सांगितले. तर पंकजा मुंडे यांनी मी जर विधानसभेत त्यांचा प्रचार केला नसता तर ते निवडून आले नसते, असे सांगत त्यांनीच लोकसभा निवडणुकी वेळी आपल्याला मदत केली नसल्याचा आरोप केला. (Pankaja V/s Dhas)
जिल्ह्यातील संघर्ष चव्हाट्यावर
पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांच्यात सुरू असलेल्या अंतर्गत संघर्षामुळे सत्ताधारी भाजपाचे पंचाईत झाली आहे. अधिवेशनात जनतेचे प्रश्न हाताळायचे असताना दोन्ही नेते जिल्ह्यातील राजकारण चव्हाट्यावर आणत एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करत आहेत. त्यामुळे विरोधकांना आयते कोलीत मिळाले आहे यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य वरिष्ठ नेते या दोघांनी त्यांची कशी समजूत काढतात?, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
हेही वाचा :
‘शक्तिपीठ’विरोधात शेतकऱ्यांचा एल्गार