Home » Blog » संकटातही शेअर बाजाराची उसळी

संकटातही शेअर बाजाराची उसळी

गुंतवणूकदारांच्या मनावरील मळभ हटले

by प्रतिनिधी
0 comments
Stock market file photo

मुंबई : वृत्तसंस्था : भारतीय शेअर बाजाराला गेल्या काही दिवसांपासून हुडहुडी आणि ताप भरला आहे. बाजार सुरळीत होत असताना पुन्हा काही तरी घटना घडते आणि बाजार घसरतो. त्यात परदेशी पाहुणे तळ्यात-मळ्यात करत असल्याने शेअर बाजाराला मोठी झेप घेता आलेली नाही. त्यातच आता गेल्या दोन दिवसांपासून गौतम अदानी यांच्या अमेरिकेतील वादाने बाजाराचे उरल सुरले अवसान काढून घेतले; पण आज बाजाराने कशाचीच पर्वा केली नाही. अदानी शेअरसोबतच बाजाराने पुन्हा फिनिक्स भरारी घेण्याचा प्रयत्न केला. सेन्सेक्स १००० अंकांनी उसळला. त्यामुळे अखेरच्या व्यापारी सत्रात गुंतवणूकदारांच्या मनावरील मळभ हटले. बाजाराला पुन्हा भरते आल्याने गुंतवणूकदार धन्य झाले.

भारतीय बाजारावर गेल्या दोन दिवसांपासून अदानी-अमेरिका वादाचे सावट दिसले. अदानीच्या शेअरमध्ये मोठी पडझड झाली. भारतीय उद्योजकावर अशा प्रकारचे गंभीर आरोप झाल्याने बाजारात एक वेगळीच भीती निर्माण झाली होती; पण शुक्रवारी बाजाराने सर्व मळभ दूर केले. बाजाराला तेजीचे भरते आले. अदानी समूहातील जवळपास सर्वच शेअरने मोठा पल्ला गाठला. सेन्सेक्स १०३४.७६ अंकांनी वधारला. तो दुपारी ७८१९०.५५ अंकावर पोहचला, तर दुसरीकडे निफ्टी २३,६७९.०५ अंकावर व्यापार करत होता. या दमदार कामगिरीमुळे बीएसईच्या एकूण भांडवलात अजून ५ लाख कोटी रुपयांची भर पडली. बँकिंग, आर्थिक, आयटी आणि ऊर्जा क्षेत्रातील शेअरनी मोठी झेप घेतली.

या क्षेत्रातील कंपन्यांनी बाजार तोलून धरलाच नाही तर बाजाराला उभारी दिली. या सेक्टरमधील शेअरने दमदार कामगिरीच्या जोरावर सेन्सेक्स वरच्या दिशेला ओढला. अदानी समूहावर अमेरिकेत लाचखोरी आणि फसवणुकीचे आरोप झाल्याने देशात एकच खळबळ माजली. समूहाने या प्रकरणी हात झटकले आहेत. आज समूहाची कामगिरी चांगली राहिली. कालच्या घसरणीनंतर अम्बुजा सिमेंट ६ टक्क्यांनी तर एसीसी सिमेंटने जवळपास ४ टक्क्यांची वसुली केली. फ्लॅगशिप कंपनी अदानी एंटरप्राईजेस २.५ टक्क्यांनी वधारला, तर अदानी ग्रीन एनर्जी, अदानी पोर्टस्‌, अदानी पॉवर आणि अदानी टोटल गॅसमध्ये आज १-२ टक्क्यांची उसळी दिसली.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00