दुबई : ऑस्ट्रेलियाचा बदली कर्णधार स्टीव्ह स्मिथने बुधवारी आंतरराष्ट्रीय वन-डे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यामध्ये स्मिथच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलिया संघाला भारताकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर त्याने निवृत्तीची घोषणा केली. (Steve Smith)
वन-डेतून निवृत्त होणार असलो, तरी आंतरराष्ट्रीय कसोटी आणि टी-२० क्रिकेटमध्ये खेळणे सुरू ठेवणार असल्याचे स्मिथने सांगितले. “ऑस्ट्रेलिया वन-डे संघासोबतचा प्रवास खूप सुंदर होता आणि मी या कारकिर्दीतील प्रत्येक क्षण पुरेपूर अनुभवला. या प्रवासात खूप आनंददायी प्रसंग वाट्याला आले आणि खूप छान आठवणी जमल्या. दोन वर्ल्ड कप विजेत्या संघाचा भाग असणे आणि गुणवान संघसहकाऱ्यांसोबत खेळायला मिळणे ही माझ्या कारकिर्दीतील ठळक वैशिष्ट्ये होती,” असे स्मिथने म्हटले. आता २०२७ च्या वर्ल्ड कपसाठी तयारीला लागण्याची हीच संधी आहे. त्यामुळे, नव्या खेळाडूंसाठी जागा मोकळी करून देणे हे मला योग्य वाटते, असेही त्याने सांगितले. (Steve Smith)
कसोटी क्रिकेटला माझे प्राधान्य राहिले आहे आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्यास मी उत्सुक आहे. त्याचबरोबर वेस्ट इंडिज दौरा आणि मायदेशातील इंग्लंडविरुद्धची मालिका खेळण्याचीही आतुरतेने वाट बघतो आहे. कसोटी क्रिकेटमध्ये मी अद्याप योगदान देऊ शकेन, असे मला वाटते, असे स्मिथने नमूद केले.(Steve Smith)
२०१० साली वेस्ट इंडिजविरुद्ध वन-डे पदार्पण करणाऱ्या स्मिथने १७० सामन्यांच्या कारकिर्दीमध्ये ५,८०० धावा केल्या. यामध्ये १२ शतके आणि ३५ अर्धशतकांचा समावेश असून त्याच्या नावावर २८ वन-डे विकेटही जमा आहेत. २०१५ आणि २०२३ मध्ये वन-डे वर्ल्ड कप विजेत्या ऑस्ट्रेलिया संघामध्ये त्याचा सहभाग होता. त्याने ६४ वन-डे सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्वही केले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वीच ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मार्कस स्टॉइनिसने वन-डेतून निवृत्ती जाहीर केली होती. त्यामुळे स्मिथच्या निवृत्तीमुळे ऑस्ट्रेलियाच्या वन-डे संघास महिन्याभरात दुसरा धक्का बसला आहे.
https://twitter.com/cricketcomau/status/1897168227740057819
हेही वाचा :