Home » Blog » धमाल संहिता पण निरस सादरीकरण

धमाल संहिता पण निरस सादरीकरण

६३ वे महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धा

by प्रतिनिधी
0 comments
State Drama Competition

-प्रा. प्रशांत नागावकर : जयसिंगपूरच्या नाट्य शुभांगी या संस्थेने ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेत करमणूक प्रधान असे ‘चल, थोडं ॲडजेस्ट करू’ हे नाटक सादर केले. दिग्दर्शन केले होते शिरीष यादव यांनी. (State Drama Competition)

नाट्य शुभांगी जयसिंगपूरमधील एक प्रतिष्ठित सांस्कृतिक संस्था. नाटक, गायन या अनुषंगाने अनेक उपक्रम सातत्याने राबवत असते. ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ हे पूर्ण लांबीचे नाटक. साजू, गिऱ्हाईक, आदी काही एकांकिकेचे सादरीकरण त्यांनी यापूर्वी केले आहे.

‘चल थोडं ॲडजेस्ट’ करमणूक प्रधान, निखळ मनोरंजन करणारे नाटक.

वरद आणि स्वानंदी या दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. वरदला लग्न करायचे आहे. कारण तो अनेक वर्षे एकटाच राहतो.  पण स्वानंदी वडिलांच्या आजारपणामुळे वरदला नकार देत असते. स्वानंदीच्या वडिलांना ‘स्किझोफ्रेनिया’ हा मानसिक आजार जडलेला असतो. अशावेळी स्वानंदी आपल्या वडिलांपासून दूर होऊ शकत नाही. कारण तिचेही तिचीही आई ती दहा वर्षाची असताना वारलेली असते. यामुळे ती वरदला लग्नासाठी नकार देत असते. वरद सातत्याने मी तुझ्या वडिलांना सांभाळतो.  आपण तिघेही एकत्र राहू, असे सांगत असतो. पण स्वानंदी सांगते की, ‘त्यांचा आजार खूप विचित्र स्वरूपाचा आहे. तुला ते सहन होणार नाही. नंतर विभक्त होण्यापेक्षा आत्ताच वेगळे झालेले मला चालेल.’ पण वरद तिला सांगतो की, ‘तू महिनाभरासाठी बाबांना घेऊन इथे माझ्या घरी राहायला ये. यादरम्यान मी बाबांना समजून घेईन, त्यांची नीट काळजी घेईन. मी त्यांच्याशी कसा वागतो आणि तुझ्यावर किती प्रेम करतो हे त्यानंतर तुला समजून येईल. मग तुझा विश्वास निर्माण झाला की आपण दोघे लग्न करू.’ स्वानंदी तयार होते. एके दिवशी बाबांना घेऊन ती वरच्या घरी राहायला येते. (State Drama Competition)

स्वानंदीचे बाबा घरी आल्यानंतर त्यांच्या वागण्याने जे काही घडते ते धमाल आणणारे असेच असते. त्यांच्या वागण्यामुळे वरदचा प्रचंड गोंधळ उडतो. तो बाबांना जास्तीत जास्त समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. पण बऱ्याच वेळेला त्याचा संयम सुटत असतो.  एके दिवशी त्याचा पूर्णपणे संयम सुटतो आणि वरद आणि स्वानंदीच्या बाबांना तो नको नको ते बोलतो. अशावेळी स्वानंदी येथे येते. सगळं ऐकते. बाबांना परत घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेते. अशा वेळेला वरदला आपली चूक लक्षात येते. तो दोघांचीही माफी मागतो. मला तुम्हा दोघांशिवाय कोणीही नाही. तुमच्या दोघांची गरज आहे. मी पुन्हा असे वागणार नाही, असे सांगतो. त्यावेळी स्वानंदी आणि तिचे बाबा दोघेही राहायला तयार होतात.  स्वानंदी लग्नालाही तयार होते. ‘आपण थोडं ॲडजेस्ट करू,’ असे दोघेही ठरवतात.

कथानक सविस्तर देण्यामागचे कारण म्हणजे त्याशिवाय नाटकाची धमाल आणि विनोदाची कल्पना येणे अशक्य आहे. हे नाटक थोडे करमणूकप्रधान, थोडे विनोदी आहे. पण ते ज्या पद्धतीने सादरीकरण होणे अपेक्षित होते तसे झाले नाही. अभिनय आणि दिग्दर्शन या दोन्ही पातळीवर नाटक काहीसे नीरस ठरले.

वरद आणि स्वानंदी यांच्या व्यक्तिरेखा वरुण पुजारी आणि श्रुती धनवडे यांनी साकारल्या आहेत. पण ते अभिनयात खूपच कमी पडलेले दिसले. त्या मानाने संदीपकुमार नेजकर यांनी बऱ्यापैकी बाबा उभा केला आहे. अभिनयात शारीरिक लवचिकतेबरोबर मिश्किल संवादफेकीतही ते बहुतांशी यशस्वी झाले आहेत. खूप सहजपणा नसला तरी अभिनयात आत्मविश्वास जाणून येत होता. (State Drama Competition)

सतीशच्या छोट्याशा भूमिकेत सुनील पाटील यांनी रंगतदारपणा आणला आहे.

तांत्रिक बाजूंमध्ये नेपथ्यातील चकचकीतपणा आकर्षित करणारा होता. नेपथ्यकाराने जणू नुकताच रेडीमेड फ्लॅट विकत घेतला की काय? अशी शंका मनात डोकावत होती.

प्रकाश योजनेत खूप काही करण्यासारखे नव्हते. पण दोन प्रवेशांमध्ये ब्लॅकआऊट विनाकारण लांबत होते. अर्थात इथे दिग्दर्शकीय कौशल्य दिसायला हवे होते. पण संपूर्ण नाटकात ते कुठेही जाणवले नाही.

एकूण करमणूक प्रधान नाटक ज्या पद्धतीने रंगयला पाहिजे होते, तितके ते रंगले नाही. मात्र प्रेक्षकांनी ते एन्जॉय केले.

नाटक : चल थोडं ॲडजेस्ट करु

सादरकर्ते : नाट्य शुभांगी, जयसिंगपूर

लेखक : संकेत विजय तांडेल

दिग्दर्शक : शिरीश यादव

प्रकाश योजना : रवींद्र ताडे, सुनील पाटील, प्रेम कोळी

नेपथ्य : दशरथ शेट्ये, दीपक अणेगिरीकर, भरत पाटील

पार्श्वसंगीत : भरत खिचडे

वेशभूषा : रमेश यळगूडकर, कुमार हत्तळगे

रंगभूषा : शशांक लिमये

भूमिका आणि कलावंत

वरद : वरुण पुजारी

स्वानंदी : श्रृती धनवडे

सतिश : सुनील पाटील

बाबा : संदीपकुमार नेजकर

सुजीत : ओंकार कुलकणी

हेही वाचा :

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00